‘सुई- दो-या’ने सांधली स्वप्न आनंदाची...., चाळीसगावात ३२ महिलांची ‘हम क्रांती’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 8, 2018 12:21 PM2018-03-08T12:21:38+5:302018-03-08T12:21:38+5:30

उभी राहिली मोडून पडलेली कुटूंबे, जैन उद्योग समुहाचेही पाठबळ

32 women's 'we-Kranti' in Chalisgaon | ‘सुई- दो-या’ने सांधली स्वप्न आनंदाची...., चाळीसगावात ३२ महिलांची ‘हम क्रांती’

‘सुई- दो-या’ने सांधली स्वप्न आनंदाची...., चाळीसगावात ३२ महिलांची ‘हम क्रांती’

googlenewsNext
ठळक मुद्दे संकटे...अन् मार्ग गवसलाअनेकींच्या मुलांची थांबलेली शाळावारीही पुन्हा सुरु

आॅनलाइन लोकमत
चाळीसगाव, जि.जळगाव, दि. ८ - कौटुंबिक कलहातून होणारी मारझोड, उडणारे खटके, काडीमोड घेण्याचे प्रसंग...तर अर्ध्यावरती मोडलेला संसाराचा डाव...प्रत्येकीची कहाणी ‘दर्दभरी.’  वाटेवरच्या अशा काचा हटवून त्यांनी सुई - दो-याच्या पंखाने नवी उडान घेतलीयं. ३२ कुटुंबे सावरली आहेत. स्वत: शंभर टक्के दिव्यांग असणा-या मिनाक्षी निकम यांनी घटस्फोटीत, विधवा, परितक्त्या आणि गरजू महिलांमध्ये नव्याने जगण्याची उर्मी प्रज्वलीत केली आहे. 'हम उद्योगिनी' महिला परिवाराने अवघ्या दहा महिन्यात स्त्रीशक्तिची अनोखी क्रांती पेटवली आहे. 
शोभा विजय पाटील, राणी सतिष काळे, रेखा सुभाष सोनवणे, शैला आबा सूर्यवंशी, दुर्गा कौतिक चौधरी, रुपाली विसपुते.... अशा ३२ महिलांचे मोडून पडलेले आयुष्ये आणि संसारही नव्याने उभा राहिले आहे. दहा महिन्यापूर्वी शाहु नगरस्थित  गजानन कन्शस्ट्रशन मध्ये हम उद्योगिनी परिवाराची पणती मिनाक्षी निकम यांनी पेटवली. गत दहा महिन्यात ३२ गरजू महिला स्वालंबी झाल्या असून त्यांनी स्वत:ची कुटूंबे उभी केली  आहेत. अनेकींच्या मुलांची थांबलेली शाळावारीही पुन्हा सुरु झालीयं. 
 संकटे...अन् मार्ग गवसला
मिनाक्षी निकम या गरजू महिलांना मोफत शिवणकाम शिकवतात. मात्र शिवकाम शिकलेल्या महिलांना कायमस्वरुपी रोजगार मिळत नसल्याने त्यांचा संघर्ष अधिक तीव्र व्हायचा. किमान ५०० गरजू महिलांना पुर्णत: स्वालंबी करण्याचा चंग बांधूनच मिनाक्षी निकम 'हम महिला उद्योगिनी परिवार' सुरु करण्याच धाडस केलं. त्यात त्या यशस्वी झाल्या आहेत. वृक्षमित्र अरुण निकम यांच्या इमारतीत हमचे बीजारोपण झाले आहे. 
  उंच माझा झोका ग
आपली करुण कहानी सांगतांना या महिलांना हुंदका अनावर व्हायचा. सहानभुतीचे कोरडे चार शब्द त्यांच्या पदरात पडायचे. मात्र परिस्थितीचे हे दिव्यांग झुगारुन पुन्हा उभे राहण्याचा मंत्र मिनाक्षी निकम यांनी त्यांना दिला. एकुण ११ प्रकरात कामाची विभागणी करुन ६४ हातांना कामाचे बळ मिळाले. सकाळी १० वाजता गणवेशात येणा-या ३२ महिला 'तू तेज दे' ही प्रार्थना म्हणून शिलाई यंत्रांना गती देतात. सायंकाळी यंत्रांची चाके प्रार्थनेचे सूर आळवूनच थांबतात. कापड कटींग, कॉलर प्रेसिंग, शोल्डर, मोंढा (शर्टची बाही), पॉकीट, साईड फिटींग, काचबटन, फिनिशींग, प्रा?पर फिनिशींग आणि प?कींग अशा अकरा प्रकरात ३२ महिलांची कुशल व अकुशल कारागिर अशी विभागणी केली आहे. कुशल कारागिर असणा-या महिलेला दरमहा पाच तर अकुशल महिलेला तीन हजार रुपये वेतन दिले जाते. उद्योग परिवारात या महिला एकमेकींच्या चांगल्या मैत्रिणीही झाल्या आहेत. वाढदिवस साजरा करणे, हितगुज साधणे असे मनोरंजनाचे उपक्रम होतात. 
 जैन उद्योग समुहाचे पाठबळ
जळगावच्या एका कार्यक्रमात महसुल मंत्री व जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी मिनाक्षी निकम यांची जैन उद्योग समुहाचे अध्यक्ष अशोक जैन यांच्याशी ओळख करुन दिली. मिनाक्षी निकम यांनी जैन यांना हम महिला उद्योगिनी परिवाराची संकल्पना सांगितली. अशोक जैन यांनी त्याचवेळी हम परिवाराला जैन उद्योग समुहातील कर्मचा-यांसाठी लागणा-या गणवेश (शर्ट) शिवणाचे काम दिले. यामुळे ३२ महिलांच्या हाताला मोठे काम मिळाले आहे. 

गरजू आणि परिस्थितीला शरण गेलेल्या महिलांची वेदना अंगावर काटा आणायची. शिवणकाम शिकवून महिलांचे आयुष्यं उभे राहणार नव्हते. त्यांना स्वत:च्या पायावर उभे करुन सन्मानाने जगण्याचे आत्मभान देण्यासाठी 'हम महिला उद्योगिनी' परिवाराची सुरुवात केली आहे. ३२ महिलांचे रडवेले चेहरे आता आनंदाने उजळून गेले आहेत. अर्थात ही सुरुवात आहे. संघर्ष अजून संपलेला नाही. मदतीचे हात पुढे आले तर ही वाट सोपी होईल.
-मिनाक्षी निकम, संस्थापिका हम महिला उद्योगिनी परिवार, चाळीसगाव.

Web Title: 32 women's 'we-Kranti' in Chalisgaon

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.