१६ महिन्यापूर्वी हॉटेलमध्ये रचला विनोद चांदणेच्या खूनाचा कट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 28, 2019 10:25 PM2019-03-28T22:25:11+5:302019-03-28T22:29:00+5:30

जामनेर तालुक्यातील वाकडी येथील विनोद लक्ष्मण चांदणे या ग्रामपंचायत सदस्याचा खून करण्याचा कट १६ महिन्यापूर्वी म्हणजे १९ नोव्हेंबर २०१७ रोजी एका हॉटेलमध्ये रचण्यात आला होता. याबाबत पोलिसांना लेखी माहिती देऊनही त्याकडे दुर्लक्ष केले गेल्याचा आरोप मृत विनोदचा भाऊ राजू चांदणे याने गुरुवारी पत्रकार परिषदेत केला.

16 months ago Vinod Chandane's bloodline cut in hotel | १६ महिन्यापूर्वी हॉटेलमध्ये रचला विनोद चांदणेच्या खूनाचा कट

१६ महिन्यापूर्वी हॉटेलमध्ये रचला विनोद चांदणेच्या खूनाचा कट

Next
ठळक मुद्देगिरीश महाजनांवरही आरोप दहा दिवसानंतर विहिरीत आढळला मृतदेहमृतदेह ताब्यात न घेण्याचा पवित्रा घेतल्यानंतर मुख्य आरोपीला अटक

जळगाव : जामनेर तालुक्यातील वाकडी येथील विनोद लक्ष्मण चांदणे या ग्रामपंचायत सदस्याचा खून करण्याचा कट १६ महिन्यापूर्वी म्हणजे १९ नोव्हेंबर २०१७ रोजी एका हॉटेलमध्ये रचण्यात आला होता. याबाबत पोलिसांना लेखी माहिती देऊनही त्याकडे दुर्लक्ष केले गेल्याचा आरोप मृत विनोदचा भाऊ राजू चांदणे याने गुरुवारी पत्रकार परिषदेत केला.
विनोद हा १९ मार्चपासून बेपत्ता झाला. त्याची हत्या करण्यात आली. या प्रकरणातील मुख्य आरोपी चंद्रशेखर पद्माकर वाणी हा जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांचा जवळचा असून तेच त्याला संरक्षण पुरवित आहेत.पोलीस यंत्रणा महाजनांच्या दबावाखाली काम करीत असल्याचाही आरोप त्याने केला.१९ नोव्हेंबर २०१७ रोजी वाणी व त्याचे मित्र एका हॉटेलवर गेले होते. तेथेच विनोद याचा घातपात करण्याचा निर्णय घेण्यात आला. याच लोकांमधील एक विनोद सुरेश देशमुख याने दुसºया दिवशी रागाच्या भरात आम्ही तुला संपवणार आहोत, तु जास्त दिवस राहणार नाही, असे धमकावले होते. संभाव्य धोका लक्षात घेता विनोद याने १७ नोव्हेंबर २०१७ रोजी पोलिसांकडे लेखी तक्रार केली. मुख्यमंत्री, पोलीस अधीक्षक यांनाही तक्रारीची प्रत दिली, मात्र यंत्रणेने कोणतीच दखल घेतली नाही. त्याचवेळी दखल घेतली असती तर आज विनोद जीवंत राहिला असता असेही त्याचा भाऊ राजू म्हणाला. पत्रकार परिषदेला राष्ट्रीय लहूसेनेचे अध्यक्ष रमेश कांबळे, रामचंद्र मोरे, स्वप्निल सपकाळे, सुरेश आंभोरे,रामचंद्र मगरे, मातंग संघर्ष समितीचे सल्लागार डी.बी.खरात, बहुजन रयत परिषदेचे प्रकाश बोसले, नाना भालेराव आदी उपस्थित होते.

१० दिवसानंतर विहिरीत आढळला मृतदेह
१९ रोजी गायब झालेला विनोद याचा मृतदेह गुरुवारी सकाळी मोहाडी, ता.पाचोरा शिवारात रमेश रामसिंग पाटील यांच्या शेतात आढळून आला. विनोदचे हातपाय बांधलेले होते तर कमरेला २० किलोचा दगड बांधलेला होता. कुजलेल्या अवस्थेत हा मृतदेह होता. घटनास्थळाचा पंचनामा केल्यानंतर मृतदेह जिल्हा रुग्णालयात आणण्यात आला. दरम्यान, यावेळी वाणीच्या अटकेशिवाय मृतदेह ताब्यात न घेण्याचा पवित्रा नातेवाईकांनी घेतला, त्यामुळे पोलिसांची गोची झाली होती. यावेळी मोठा बंदोबस्त लावण्यात आला होता.
दरम्यान, नातेवाईकांची समजूत काढत असतानाच वाणी याला अटक केल्याची माहिती पोलिसांनी दिली. दहा दिवसात त्याला अटक झाली नाही मग मृतदेह ताब्यात न घेण्याचा निर्णय घेतल्यानंतर लगेच कशी अटक झाली असा सवाल नातेवाईकांनी विचारला. वाणीला अटक केल्याची खात्री पटल्यानंतर सायंकाळी मृतदेह ताब्यात घेण्यात आला. दरम्यान, वाणीला पंढरपूर येथून अटक केल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेचे निरीक्षक बापू रोहोम यांनी ‘लोकमत’ ला दिली.
मंत्री महाजनांच्या विरोधात घोषणा
महाराष्ट्र काँग्रेस कमेटी अनुसूचित जाती जमातीचे प्रदेशाध्यक्ष विजय आंभोरे यांनी जिल्हा रुग्णालयात समाजबांधवांची भेट घेवून माहिती जाणून घेतली. त्याच्यासोबत डॉ. उल्हास पाटील, जिल्हाध्यक्ष संदीप पाटील, शहराध्यक्ष डॉ. राधेशाम चौधरी उपस्थित होेते. यावेळी समाजबांधवासह कॉग्रेसच्या पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांचा निषेध करत मंत्री महाजन मुदार्बाद, चंद्रशेखर वाणी मुदार्बादच्या घोषणा दिल्या. 
गुन्ह्यात कलम वाढविले
विनोद चांदणे बेपत्ता असल्याने यापूर्वी अपहरण व कट रचल्याचा गुन्हा दाखल झाला होता. आता त्याचा मृतदेह सापडल्याने खून व पुरावा नष्ट करण्याचे कलम वाढविण्याचा अर्ज तपासाधिकारी ईश्वर कातकाडे यांनी न्यायालयात केला. त्यावर न्या.एस.जी.ठुबे यांनी हा अर्ज मंजूर केला. दरम्यान, अटकेतील महेंद्र शामलाल राजपूत, विनोद सुरेश देशमुख, नामदार गुलाब तडवी व प्रदीप संतोष परदेशी या चौघांच्या पोलीस कोठडीत १ एप्रिलपर्यंत वाढ करण्यात आली. जिल्हा सरकारी वकील केतन ढाके यांनी सरकारतर्फे बाजू मांडली.

Web Title: 16 months ago Vinod Chandane's bloodline cut in hotel

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.