Treat your daughter-in-law as your daughter | सुनेला मुलीप्रमाणे वागविण्याचे आवाहन
सुनेला मुलीप्रमाणे वागविण्याचे आवाहन

लोकमत न्यूज नेटवर्क
जालना : घरात येणा-या सुनेला सासरकडील व्यक्तींनी आपल्या मुलीप्रमाणे वागवावे, असे आवाहन जिल्हा परिषद अध्यक्ष अनिरुद्ध खोतकर यांनी केले. जिल्हा परिषद महिला बालकल्याण विभाग व ग्रामीण विकास यंत्रणा यांच्यावतीने जागतिक महिला दिनानिमित्त गुरुवारी नगरपालिका क्रीडा संकुलाच्या मैदानावर अस्मिता सॅनिटरी नॅपकीन विक्री योजनेचा शुभारंभ मान्यवरांच्या उपस्थिती करण्यात आला. त्या वेळी ते बोलत होते.
जिल्हा परिषद अध्यक्ष सतीश टोपे, मुख्यकार्यकारी अधिकारी नीमा अरोरा, सभापती जिजाबाई कळंबे, सुमनबाई घुगे, ग्रामीण विकास यंत्रणेचे सुरेश बेदमुथा, उपजिल्हाधिकारी पी. बी. खपले महिला व बालविकास अधिकारी संगीता लोंढे, अप्पर पोलीस अधीक्षक लता फड आदींची या वेळी प्रमुख उपस्थिती होती.
खोतकर म्हणाले, की मुलगा किंवा मुलगी यांच्यात भेदवान न करता मुलीच्या जन्माचे प्रत्येक कुटुंबाने स्वागत करावे. ग्रामीण भागात आजही लग्न सोहळ्यांमध्ये महिलांचे मानपान नाट्य रंगतात. यावरून घरात येणा-या सुनेला सासूकडून त्रास देण्याच्या घटनाही घडतात. परंतु महिलांनी मनाचा मोठेपणा दाखवून सुनेला चांगले वागावे. आर्थिक परिस्थितीमुळे ग्रामीण भागात महिला आरोग्याकडे दुर्लक्ष करतात. त्यामुळे त्यांना गंभीर आजार जडतात. त्यांच्यासाठी आरोग्य विभागामार्फत तपासणी करून आवश्यक उपचारासाठी सहकार्य केले जाईल, असेही त्यांनी सांगितले. उपाध्यक्ष टोपे म्हणाले, की आज मुली प्रत्येक क्षेत्रात पुरुषांबरोबर कामे करत आहेत. त्यामुळे मुलगा-मुलगी यांच्यात भेदभाव करू नये. अन्य मान्यवरांनी या वेळी आपले मनोगत व्यक्त करत महिला दिनाच्या शुभेच्छा दिल्या. दीपप्रज्ज्वलन करून कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यात आले. अस्मिता सॅनिटरी नॅपकिन योजनेचा शुभारंभ मान्यरांच्या हस्ते करण्यात आला. जिल्हाभरातून आलेल्या महिला, अंगणवाडी सेविका, मदतनीस, बचत गटांच्या महिला, अधिकारी, कर्मचारी यांची उपस्थिती होती.


Web Title: Treat your daughter-in-law as your daughter
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.