धुरकटले शहर, गुदमरला श्र्वास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 23, 2019 12:29 AM2019-01-23T00:29:20+5:302019-01-23T00:29:57+5:30

बियाणे, स्टीलची राजधानी म्हणून नाव लौकिक असलेल्या जालन्याने प्रदूषणातही आघाडी घेतली आहे. ही बाब जालनेकरांची चिंता वाढवणारी आहे.

A scared town, chubby breathing | धुरकटले शहर, गुदमरला श्र्वास

धुरकटले शहर, गुदमरला श्र्वास

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
जालना : बियाणे, स्टीलची राजधानी म्हणून नाव लौकिक असलेल्या जालन्याने प्रदूषणातही आघाडी घेतली आहे. ही बाब जालनेकरांची चिंता वाढवणारी आहे. धूलिकणांपासून संरक्षण करण्यासाठी आता मुलींप्रमाणेच माणसांनाही दुचाकीवरून जाताना तोंडाला रूमाल बांधणे आवश्यक बनले आहे. एकीकडे उद्योगांनी येथे मोठी प्रगती केली आहे. त्यांच्या कारखान्यातून निघालेल्या धुरावर नियंत्रण ठेवण्यासाठी महाराष्ट्र राज्य तसेच केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाने जे निकष घालून दिले आहेत. त्यांचे तंतोतंत पालन केले जात असल्याचा दावा जालना येथील प्रदूषण नियंत्रण मंडळाचे उपप्रादेशिक अधिकारी व्ही. पी. शेळके यांनी नमूद केले आहे.
जालन्यात केवळ उद्योगाच्या धुरातूनच प्रदूषण होत नसून, मुंबई, पुणे तसेच अन्य शहरांतून बाद झालेल्या रिक्षा तसेच अन्य वाहनांची जालन्यात राजरोसपणे चलती आहे. त्यातच इंधनातील भेसळ हा देखील प्रदूषण वाढीत महत्वाचा घटक ठरत आहे. त्यातच सुरू असलेली बांधकामे, रस्त्यावरील धूळ आणि कुठल्याही कामासाठी खोदण्यात येत असलेला रस्ता यातून धुळीचे प्रमाण जालन्यात क्षमतेपेक्षा जास्त वाढल्याचे दिसून येत आहे. अनेकवेळा कचरा पेटवून दिल्याने देखील धुराचे लोट उठतात. या धूळ आणि धुरामुळे मानवाच्या श्वसन प्रक्रियेवरच हल्ला होतो. धुळीचे कण अतिसूक्ष्म असल्याने ते तोंडाला रूमाल बांधूनही फुफ्फुसात जातात. त्यामुळे शरीराची मोठी हानी होते. ही हानी होत असताना ती अत्यंत मंद गतीने त्याचे परिणाम दिसून येतात. त्यामुळे प्रत्येकाने खबरदारी घेणे हाच एक यावरील प्रभावी इलाज असल्याचे तज्ज्ञांचे म्हणणे आहे.
काळजी घेणे हेच आपल्या हाती
४शहरातील विविध भागांत सुरू असलेली बांधकामे ही अविरत सुरू राहणार आहेत. तसेच उद्योग म्हटल्यावर त्यातून धूर हा निघणारच आहे. परंतु हे सर्व होत असताना जालन्यातील धुळीचे प्रमाण कमी करण्यावर भर देण्याची गरज आहे. यासाठी प्रत्येकाने काळजी घेतली पाहिजे. सर्व काही सरकार करेल ही भूमिका चुकीची आहे. जालन्यातील प्रदूषणात नायट्रोजन आॅक्साईड, सल्फरडाय आॅक्साईड मोठ्या प्रमाणावर वातावरणात पसरत आहे. त्याचे अतिसूक्ष्म कण हे मानवी शरीरात केव्हा प्रवेश करतात हे समजतही नाही. त्यामुळे प्रदूषणापासून वाचण्यासाठी सरकारसह नागरिकांनी देखील कमीतकमी अस्वच्छता पसरविण्याची गरज आहे. वृक्षारोपणाच्या नावाखाली केवळ दिखावा न करता त्यांची अंमलबजावणी होणे गरजेचे आहे. उद्योगांसोबतच वृक्षांचे तेवढे आच्छादनही महत्त्वाचे ठरते. - डॉ. राजेश सेठिया, जालना
कारखान्यांनी उपाययोजना केल्या
४जालन्यात स्टील तसेच अन्य उद्योग आहेत. त्यातून निघणारा धूर हा उंच चिमणीव्दारे आकाशात सोडण्यात येतो. त्यासाठी आवश्यक त्या सूचना सर्व कारखान्यांना दिल्या असून, त्यांनी ते निकष पाळले आहेत का, याची तपासणी केली जाते, त्यात निकष पाळले असल्यासच त्यांना कारखाना चालविण्याची परवानगी देण्यात येते. येथील बहुतांश कारखान्यांनी याचे पालन केले आहे. शहरातील वाढती धूळ कमी करण्यासाठी जालना पालिकेला सूचना दिल्या असून, लवकरच कृती आराखडा तयार करण्यात येणार आहे. - व्ही.पी. शेळके,
उपप्रादेशिक अधिकारी, प्रदूषण नियंत्रण मंडळ, जालना,
उपाय योजनांची गरज
शहरात प्रदूषण असल्यामुळे तोंडाला रुमाल बांधून चालावे लागत आहे. तसेच काही दिवसांपूर्वीच न.पच्यावतीने कचरा उचलण्यासाठी घंटागाड्या सुरु करण्यात आल्या आहे. मात्र, शहरातील नागरिकच या गाड्यांमध्ये कचरा टाकत नाही. नागरिकांनी जागृत होऊन कचरा गाड्यांमध्ये टाकावा. व नगर परिषदेने प्रदूषणासाठी उपाय योजना राबव्यात.
- नारायण शेळके, विद्यार्थी
न.प.ने लक्ष द्यावे
शहरातील औद्योगिक वसाहत परिसरात सांयकाळी मोठ्या प्रमाणात प्रदूषण वाढते. या परिसरातून सांयकाळी येतांना श्वास घेण्यासही अडचण येते. यावर उपाय म्हणून प्रशासनाच्यावतीने झाडांची लागवड करण्यात यावी. जेणेकरुन काही प्रमाणात तरी प्रदूषण कमी होईल. तसेच शहरातील नागरिकांनी जागृत होऊन प्रदूषणाविरोध रस्त्यावर उतरले पाहिजे.
- सोनाली कोलते, विद्यार्थिंनी
नागरिकांचे आरोग्य धोक्यात
जालना शहराची अवस्था बिकट असून, शहरातील रस्त्यावरुन चालतांना तोडाला रुमाल बांधून चालावे लागत आहे. शहरात काही महिन्यापूर्वीच रस्ते तयार करण्यात आले. परंतु, रस्त्यावरील धूळ मात्र तशीच आहे. यामुळे नागरिकांच्या आरोग्यास धोका निर्माण झाला आहे. याकडे दुर्लक्ष असलेल्या प्रशासने लक्ष देण्याची गरज आहेत.
- शिवानी सिरसाट, विद्यार्थिनी
श्वास घेण्यास त्रास
शहर व परिसरात मोठ्या प्रमाणात प्रदूषणात वाढ झाली आहे. यामुळे नागरिकांना श्वास घेण्यासही त्रास होतो. प्रदूषणामुळे शहरातील नागरिकांच्या आरोग्यास धोका निर्माण झाला असून, यासाठी नागरिकांनीच पुढाकार घ्याला व्हावा.
- सुरज धबडकर, नागरिक

Web Title: A scared town, chubby breathing

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.