शंभर पोलीस कर्मचाऱ्यांना मिळणार निवासी प्रशिक्षण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 21, 2019 12:20 AM2019-07-21T00:20:54+5:302019-07-21T00:21:54+5:30

पोलीस नाईक, पोलीस हेडकॉन्स्टेबल म्हणून बढतीस पात्र असलेल्या जिल्हा पोलीस दलातील १०० पोलीस कर्मचाऱ्यांना मुख्यालयात निवासी प्रशिक्षण देण्यात येणार आहे.

Residential Training to get 100 police personnel | शंभर पोलीस कर्मचाऱ्यांना मिळणार निवासी प्रशिक्षण

शंभर पोलीस कर्मचाऱ्यांना मिळणार निवासी प्रशिक्षण

Next

विजय मुंडे ।
लोकमत न्यूज नेटवर्क
जालना : पोलीस नाईक, पोलीस हेडकॉन्स्टेबल म्हणून बढतीस पात्र असलेल्या जिल्हा पोलीस दलातील १०० पोलीस कर्मचाऱ्यांना मुख्यालयात निवासी प्रशिक्षण देण्यात येणार आहे. वरिष्ठ स्तरावरून संबंधित कर्मचा-यांची यादी तयार करण्यात आली आहे.
पोलीस दलातील अधिकारी, कर्मचा-यांची तोकडी संख्या आणि इतर अतिरिक्त कामामुळे गुन्ह्यांच्या तपासावर मोठा परिणाम होताना दिसत आहे. दाखल होणा-या गुन्ह्याचा तपासाधिका-याला चांगल्या पध्दतीने उलगडा करता यावा, यासाठी पोलीस दलाच्या वतीने नियमित सेवांतर्गत प्रशिक्षण दिले जाते. पोलीस दलाने यापुढेही एक पाऊल टाकत बढतीसाठी पात्र असलेल्या कर्मचा-यांनाही प्रशिक्षण देण्याचा निर्णय घेतला आहे. पोलीस महानिरीक्षकांच्या सूचनेनुसार पोलीस अधीक्षक एस. चैतन्य यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा पोलीस दलातील पोलीस नाईक व पोलीस हेडकॉन्स्टेबल म्हणून बढतीसाठी पात्र असलेल्या कर्मचा-यांना प्रशिक्षण देण्यात येणार आहे.
प्रशिक्षणासाठी जिल्ह्यातील १०० पोलीस कर्मचा-यांची यादी तयार करण्यात आली आहे. पोलीस मुख्यालयात निवासस्थानासह भोजनाची व्यवस्था केली जाणार असून, पहाटेपासून रात्रीपर्यंत गुन्ह्याचा तपास, तणावमुक्त कामकाज, आधुनिक शस्त्रास्त्रे, कायद्यातील बदल, न्यायालयाचे निर्णय, शरीर स्वास्थ्यासाठी योगा व यासह इतर बाबींवर प्रशिक्षण दिले जाणार आहे.
अधिका-यांना नियमित प्रशिक्षण
जिल्हा पोलीस दलात कार्यरत असलेल्या अधिका-यांनाही नियमित प्रशिक्षण दिले जाते. यासाठी औरंगाबाद येथे अधिका-यांच्या तुकड्या पाठविल्या जात असून, कायद्यातील बदल, आधुनिक शस्त्रांसह इतर बाबींचे प्रशिक्षण अधिका-यांना दिले जात आहे.

Web Title: Residential Training to get 100 police personnel

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.