उन्हाचा चटका; त्यात अवकाळीचा फटका...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 16, 2019 12:50 AM2019-04-16T00:50:40+5:302019-04-16T00:51:00+5:30

जालना शहरात सोमवारी सायंकाळी वादळी वाऱ्यासह हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस झाला. यावेळी विजांचे तांडव दिसून आले

Rains in Jalana district | उन्हाचा चटका; त्यात अवकाळीचा फटका...

उन्हाचा चटका; त्यात अवकाळीचा फटका...

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
जालना : जालना शहरात सोमवारी सायंकाळी वादळी वाऱ्यासह हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस झाला. यावेळी विजांचे तांडव दिसून आले. मेघगर्जनेसह झालेल्या पावसा दरम्यान मंठा मार्गावरील प्रियंका रेसिडेंसी परिसरात असलेल्या चार झाडावंर साडेसहा वाजेच्या दरम्यान वीज पडून त्या झाडांना अचानक आग लागली.
या आगीमुळे परिसरात एकच खळबळ उडाली होती. वीज पडल्याने त्या परिसरात कानठळ्या बसविणारा आवाज होऊन ही वीज झाडांवर कोसळली.
काही क्षणात मोठ्या प्रमाणावर आगीच्या ज्वाळा परिसरात दिसल्या. आग लागल्याची माहिती तातडीने वीज वितरण कंपनीला देण्यात आली. त्यावेळी वीजपुरवठा बंद करण्यात आल्याची माहिती प्रत्यक्षदर्शी कृषी विज्ञान केंद्रातील शास्त्रज्ञ अजय मिटकरी यांनी सांगितले. या वादळी वाऱ्यांमुळे काही भागात वीजपुरवठाही खंडित झाला होता. जोरदार वा-यामुळे अनेकांच्या घरावरील पत्रे उडून गेल्याचे सांगण्यात आले.
दरम्यान संध्याकाळी झालेल्या जोरदार वा-यामुळे औद्योगिक वसाहतीतील एका स्टील कंपनीच्या उच्चदाब वीज वाहिनीची तार कमी दाबाच्या विजेच्या तारांवर पडल्याने मोठे घर्षण होऊन वीज पुरवठा खंडित झाला होता. तो रात्री अथक प्रयत्न करून वीज वितरण कंपनीच्या अधिकारी, कर्मचा-यांनी पूर्ववत केला. सोमवारी जालन्यासह जाफराबाद तालुक्यातही वादळी वा-यासह पाऊस पडला. घनसावंगी तालुक्यातही वादळी वा-यासह पाऊस झाला. यामुळे अनेक भागांतील वीजपुरवठा खंडित झाला होता. भोकरदन तालुक्यातील केदारखेडा परिसरातही हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस आणि जोरदार वादळ आले होते. एकूणच या अवकाळी पावसाचा मोठा फटका आंब्याला बसला असून, मोठ्या प्रमाणावर वा-यामुळे कै-या गळून पडल्या आहेत. यामुळे कै-यांचे भाव कोसळले आहेत.
कुंभार पिंपळगाव : घनसावंगी तालुक्यातील कुंभार पिंपळगाव येथे सोमवारी सायंकाळी साडेसहा वाजेच्या सुमारास वादळी वा-यासह पाऊस झाला.या मुळे उसतोड कामगारांच्या झोपडीवरील पत्रे उडून गेल्याने कामगारांच्या कुटुंबियांची धावपळ झाली होती.
चार दिवसापासून परिसरात ढगाळ वातावरण आहे. सोमवारी देखील परिसात वादळी वा-यासह तुरळक ठिकाणी हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस झाला जोराच्या वा-यामुळे परिसरात उसतोडणीसाठी आलेल्या कामगारांच्या झोपड्या उडून गेल्या. कामगारांची गैरसोय झाली होती. अवकाळी पावसामुळे आंब्याला आलेल्या कै-या गळून पडल्याने नुकसान झाले आहे.
वीज पडून दोन बैल दगावले
जालना : जाफराबाद तालुक्यातील माहोरा येथे रविवारी सायंकाळी अचानक वीज कोसळून दोन बैल दगावले तसेच एक म्हैस भाजल्याने शेतकरी गौतम किसन बोर्डे यांचे मोठे नुकसान झाले आहे. तलाठी सहाणे यांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला. चार दिवसापासून परिसरात नियमित ढगाळ वातावरण तयार होत आहे. तसेच वादा सायंकाळच्या वेळेला वादळही सुटत आहे. यामुळे अवकाळी पावसाच्या भीतीने फळबाग आणि भाजीपाला उत्पादक शेतकरी चिंतेत आहेत. रविवारी सायंकाळी सहा वाजेच्या सुमारास जनावरांच्या गोठ्यावर वीज कोसळल्याने गोठ्यामध्ये बांधलेले दोन बैल जागीच दगावले तर एक म्हैस गंभीररीत्या भाजली आहे. तसेच गोठ्यातील चा-यासह इतर साहित्य जळून गेल्याने तब्बल ३ लाख रुपयांचे नुकसान झाल्याचा अंदाज आहे. घटनेची माहिती मिळताच जि.प. सदस्य संतोष लोखंडे, सरपंच डॉ. रवींद्र कासोद, सभापती साहेबराव कानडजे, सभापती भाऊसाहेब जाधव, पं. स . सदस्य दगडूबा गोरे, गजानन लहाने, अनिल चौतमोल, माजी सरपंच भानुदास बोर्डे, नंदू बोर्डे, सैय्यद शब्बीर आदींनी भेट दिली.

Web Title: Rains in Jalana district

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.