Police quarters in poor condition | परतुरात पोलिसांची खिळखिळी घरे

लोकमत न्यूज नेटवर्क
परतूर : येथील पोलीस निवास्थानांमधील घरे पूर्णपणे खिळखिळी झाली आहेत. एकही घर राहण्योग्य नसताना पोलीस कुटुंबियांना नाईलाजास्तव येथे राहावे लागत आहे.
परतूर पोलीस वसाहतीमधील या घरांची ठिकठिकाणी पडझड झाली आहे. स्वच्छता गृहाची दुरवस्था, फुटलेल्या नाल्या, सांडपाण्याची व्यवस्था नसणे, खिडक्यांची फुटलेली काच, मोडलेले दरवाजे, त्याला ठिकठिकाणी गेलेले तडे, पावसाळ्यात छताला लागणारी गळती आदी समस्यांना या ठिकाणी राहणारे पोलीस कुटुंब तोंड येत आहेत. या वसाहतीतील एकही घर राहण्यायोग्य राहिले नाही. या ठिकाणी असलेल्या सार्वजनिक स्वच्छता गृहाची तोड-फोड झाली आहे. अनेक ठिकाणी दरवाजे गायब झाले आहेत. ही स्वच्छतागृह पूर्णत: निकामी झाली आहेत. निवासस्थानांचे दरवाजेही पूर्णत: तुटले आहेत. फरशा फुटल्या आहेत. भिंतींना मोठमोठे तडे गेले आहेत. पावसाळ्यात छतातून पाणी येत असल्याने पोलीस कुटुंबियांना रात्र जागून काढावी लागते.
परिसरातील रस्त्यांची दुरावस्था झाली आहे. पावसाळ्यात चिखल तर उन्हाळ्यात धुळीचा सामना येथील पोलीस कुटुंबियांना करावा लागत आहे. अनेकदा या निवासस्थानांची तात्पुरती व आवश्यक डागडुजी कर्मचारी स्वत: करत असतात. त्याचा खर्चही कर्मचा-यांना मिळत नाही. पूर्ण निवासस्थानेच जीर्ण झाली असल्याने दुरुस्तीचाही उपयोग होत नाही. या निवासस्थानांचा नवीन प्रस्ताव पाठवण्यात आल्याचे सूत्रांनी सांगितले. मात्र प्रत्यक्षात अनेक वर्षापासून काहीच कार्यवाही झाली नाही. तरी या निवास्थानाच्या प्रश्नाकडे पोलिस प्रशासनासह सार्वजनिक बांधकाम विभागाने लक्ष देण्याची गरज आहे.


Web Title: Police quarters in poor condition
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.