पाच वर्षात ६ हजार रुग्ण झाले टीबीमुक्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 24, 2019 12:37 AM2019-03-24T00:37:25+5:302019-03-24T00:38:03+5:30

भारतात दर ३ मिनिटाला २ क्षयरुग्णांचा मृत्यू होतो. दिवसाकाठी हजार रुग्णांचा मृत्यू होतो.

In the past five years, 6,000 patients were treated TB-free | पाच वर्षात ६ हजार रुग्ण झाले टीबीमुक्त

पाच वर्षात ६ हजार रुग्ण झाले टीबीमुक्त

Next

दीपक ढोले।
लोकमत न्यूज नेटवर्क
जालना : भारतात दर ३ मिनिटाला २ क्षयरुग्णांचा मृत्यू होतो. दिवसाकाठी हजार रुग्णांचा मृत्यू होतो. भारतात ४० टक्के लोकसंख्या या क्षयरोगाने संसर्गित आहे. या रोगावर नियंत्रण मिळविण्यासाठी तब्बल ५३ वर्षांपासून क्षयरोग नियंत्रण कार्यक्रम राबविण्यात येत आहे. यात रुग्णाच्या आकडेवारीत घट झाली असली तरी कार्यक्रमाला पाहिजे तसे यश मिळाले नसल्याचे दिसून येते. मागील पाच वर्षात जालना जिल्ह्यात ३५० रुग्णांचा मृत्यू झाला असून, पाच दिवसाला एका टीबी रुग्णाचा मृत्यू होतो. तर पाच वर्षात ६ हजार १२६ जणांना टीबीतून मुक्त करण्यात यश आले आहे.
क्षयरोग हा मायकोबॅक्टेरियम ट्युबरक्लुलोसिस या जंतूपासून होणारा रोग आहे. हे जंतू वातावरणातील हवेत असतात व श्वसनाद्वारे फुफ्फुसामध्ये ओढले जाऊन शरीरात संसर्ग होतो. हा रोग हवेतून पसरत असल्याने याची काळजी घेणे अत्यंत गरजेचे आहे. म्हणून शासनाने १९६२ मध्ये राष्ट्रीय क्षयरोग नियंत्रण कार्यक्रम राबविण्यास सुरुवात केली.
परंतु यात त्रुटी आढळून आल्याने १९९३ पासून सुधारित राष्ट्रीय क्षयरोग नियंत्रण कार्यक्रम हाती घेण्यात आला. हा रोग बरा होण्याची जबाबदारी रुग्णावर असण्यापेक्षा आरोग्य कार्यकर्त्यांवर अधिक आहे. या कार्यकर्त्यांमार्फत रुग्णांना डॉट्स हे प्रभावी औषध दिले जाते. परंतु या कार्यक्रमातही अनेक त्रुटी असल्याचे तज्ज्ञांचे म्हणणे आहे.
दरम्यान, जिल्हा टीबी मुक्त करण्यासाठी जिल्हा क्षयरोग नियंत्रण समितीतर्फे प्रयत्न करण्यात येत आहे.
गेल्या पाच वर्षात ६ हजार रुग्णांना टीबी मुक्त करण्यात आले आहे. तर २०१८ मध्ये १४४३ रुग्ण टीबीशी लढा देत असून, जिल्हा टीबी मुक्त करण्यासाठी जिल्हा क्षयरोग अधिकारी डॉ. अनंत सोळुंके, वैद्यकीय अधिकारी डॉ. योगेश सुरडकर, डॉ. जहागीरदार, एस. एस. खंडागळे, एस. व्ही. यादव, डी. एस. जावळे, गोपाळ राऊत, अमोल निकाळ, वैजीनाथ मुंडे, रवि जावळे आदी परिश्रम घेत आहेत.
दरम्यान, क्षयरोग दिनानिमित्त आज जिल्हाभरात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले असून, याचा लाभ घेण्याचे आवाहन करण्यात आले. ज्या रुग्णांना टीबी आहे. त्यांच्यातही काही प्रमाणात सुधारणा झाली असल्याचे जिल्हा क्षयरोग अधिकाऱ्यांनी सांगितले.
क्षयरोग म्हणजे काय ?
क्षयरोग (टीबी) हा एक संभाव्यत: गंभीर संसर्गजन्य आजार आहे. मायकोबॅक्टेरियम ट्यूबरक्लुलोसिस नावाच्या जीवाणूंच्या गटामुळे हा रोग होतो. बहुतेक रुग्णांमध्ये क्षयरोग फुप्फुसावर परिणाम करतो. त्यामुळे फुप्फुसाचा क्षयरोग आहे असे म्हटले जाते, पण क्षयरोग हा शरीराच्या कोणत्याही भागावर परिणाम करू शकतो.
क्षयरोगाचे निदान कसे केले जाते?
कोणालाही खोकला १५ दिवसांपेक्षा जास्त, ओला खोकला, ताप, खोकल्यातून रक्त येणे, छातीत दुखणे, वजन कमी होणे, भूक कमी होणे, यापैकी कोणतीही लक्षणे आढळून आल्यास क्षयरोगासाठी आवश्यक त्या तपासण्या कराव्यात. डॉक्टरांकडून वैद्यकीय तपासणी, छातीचा एक्स-रे आणि थुंकीची तपासणी करणे आवश्यक आहे.
प्रतिबंधात्मक उपाययोजना
नवजात बालकांचे १०० टक्के बी.सी.जी. चे लसीकरण झाले पाहिजे
आपला आहार संतुलित, प्रथिनेयुक्त असावा, व्यसनापासून दूर राहणे
थुंकी दूषित क्षयरुग्णाला तोंडाल रुमाल बांधणे
संशयित क्षयरुग्णाला शोधून लवकर रोग निदान व औषधोपचार करणे
थुंकी दूषित श्रयरुग्णांच्या घरातील बालके असतील तर त्यांना केमोप्रोफॅ लीक्स उपचार देणे
थुंकी दूषित रुग्ण नियमित डॉटस औषधोपचार घेईल याची काळजी घेणे आवश्यक आहे.
क्षयरोग होऊ नये म्हणून अशी घ्यावी काळजी
क्षयाचे आव्हान मोठे असले तरी योग्य असे पथ्यपाणी, नेमके उपचार आणि नियमित व्यायाम यांनी क्षय जिंकता येतो. प्रत्येक पेशंटने योग्य ती काळजी घेतली तर क्षयाचा प्रसारही आपल्याला थांबवता येईल. टीबी हा आजार केवळ समाजातील निम्न स्तरातील व्यक्तींना होतो. आपल्याला तो होऊ शकत नाही, हा गैरसमज मनातून काढून टाकणे गरजेचे आहे. जीवनशैलीत फार बदल न करताही या रोगापासून दूर राहणे सहज शक्य आहे. आहारात प्रथिनयुक्त पदार्थांचा समावेश आणि समतोल आहार घेतल्यास टीबी विरोधातील पहिला टप्पा यशस्वी होऊ शकतो. सकाळी उपाशीपोटी बाहेर पडण्याची सवय सोडून नाश्त्याचे महत्त्व जाणणे, अत्यंत आवश्यक आहे. खोकताना, शिंकताना तोंडावर रूमाल-फडके घेणे, याची सवयच सर्वांना लागली पाहिजे. दिवसाकाठी पुरेसा आराम, झोप आणि व्यायाम यामुळे शारीरिक स्थिती उत्तम राखण्यात मदत होते. या सर्व बाबींकडे लक्ष दिले तर टीबीवर नियंत्रण मिळवणे अवघड नाही, असे डॉक्टरांनी सांगितले.

Web Title: In the past five years, 6,000 patients were treated TB-free

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.