New generation in politics | जालना जिल्ह्यात युवा पिढीची राजनीती; आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर वाढली सक्रियता

- राजेश भिसे

जालना : शहरासह जिल्ह्यात विविध राजकीय पक्षांचे युवा सेल आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सक्रिय झाले असून, विभाग, शहर आणि जिल्हा शाखांच्या बैठकांना वेग आला आहे. एकूणच ‘युवा’ राजकारणाच्या माध्यमातून पक्षाला आणि संभाव्य उमेदवारास बळकटी देण्याचा सर्वपक्षीय नेत्यांचा प्रयत्न सुरू आहे.

आजचा कार्यकर्ता हा उद्याचा त्या त्या राजकीय पक्षाचा नेता असतो. युवा कार्यकर्त्यांना अनुभवी आणि अभ्यासू नेत्यांकडून दिल्या जाणा-या प्रशिक्षण, मार्गदर्शनाच्या माध्यमातून त्यांची राजकीय कारकीर्द घडवली जाते. युवकांनी राजकारणात यावे यासाठी काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना, भाजप या प्रमुख पक्षांसह इतर राजकीय पक्षांनी युवा सेल निर्माण केले. वक्तृत्व कला अवगत असलेले, अभ्यासू आणि राजकारणाची आवड असलेल्या युवकांना जिल्ह्यात सर्वच पक्षांनी संधी दिल्याचे दिसते. कार्यकर्ते घडवून पक्षाला बळकटी देण्याचा नेत्यांचा नेहमीच प्रयत्न राहिलेला आहे. अनुभवी व ज्येष्ठ नेत्यांची युक्ती आणि युवकांची शक्ती व उत्साह या आधारे राजकीय पक्ष आपला जनाधार वाढवत असतात. तसेच पक्षाला मजबूत करण्यात या दोन्ही घटकांचे तेवढेच योगदान पक्षांसाठी महत्त्वाचे असते. लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीचे पडघम वाजू लागले आहेत. आतापासून याची तयारी राजकीय पक्षांच्या नेतृत्वाकडून सुरू झाली आहे.

शिवसेनेने युवा सेनेच्या माध्यमातून ग्रामीण भागात जोमाने काम सुरू केले आहे. राज्यमंत्री अर्जुन खोतकर यांचे चिरंजीव अभिमन्यू यांची राजकारणात एण्ट्री झाली असून युवा सेनेच्या उपसचिवपदी काही दिवसांपूर्वीच त्यांची निवड झाली आहे. राजकारणाचे बाळकडू घरातूनच मिळाले असल्याने आगामी निवडणुकीत ते राजकारणात सक्रिय राहतील, असे दिसते. त्याचबरोबर युवा सेनेचे राज्य कार्यकारिणी सदस्य जगन्नाथ काकडे, जिल्हाध्यक्ष भाऊसाहेब घुगे, अमोल ठाकूर, दुर्गेश कठोठीवाले यांच्यासह संपूर्ण कार्यकारिणी काही दिवसांपासून जिल्ह्यात आक्रमक झाली असून, विभागनिहाय बैठका घेऊन कार्यकर्त्यांमध्ये चैतन्य निर्माण केले जात आहे. राष्ट्रवादी युवक काँग्रेसकडूनही जिल्हाध्यक्ष कपिल आकात, पंकज बोराडे, जयमंगल जाधव, संजय काळबांडे यांच्यासह स्थानिक नेतृत्वाला संधी देत राजकीय वातावरण निर्माण करण्याचा प्रयत्न केला जात आहे.

भाजपाकडून राहुल लोणीकर, किरण खरात, रवींद्र राऊत, सुनील खरे, आशिष चव्हाण आदींच्या माध्यमातून पक्षीय मोर्चेबांधणी आणि जनाधार वाढविण्यासाठी प्रयत्न केला जात आहे. तर काँग्रेसने मतदार संघनिहाय निवड केली आहे. जालना लोकसभा मतदारसंघातील युवक काँग्रेसचे अध्यक्षपद हे अब्दुल समीर अब्दुल सत्तार यांना दिले आहे. तर जालना विधानसभा मतदारसंघात अ‍ॅड. संजय खडके, बदनापूरमध्ये मोबीन खान आणि भोकरदनमध्ये राहुल देशमुख यांच्याकडे अध्यक्षपद देण्यात आले आहे. मतदारसंघनिहाय निवड करण्यात आल्याने या युवकांना याचा बारकाईने अभ्यास करण्याची संधी मिळाली आहे. ज्यातून गाव व बूथनिहाय अभ्यास केला जात आहे. राजकीय समीकरणे समाजकारणातून गणिते मांडली जात आहेत. यातून जनाधार वाढविण्यासह सूक्ष्म अभ्यासाद्वारे पक्षाच्या स्थितीचा अंदाजही पक्षांचे ज्येष्ठ नेते घेत आहेत. एकूणच काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना आणि भाजपसह इतर पक्षांतील नेत्यांकडून युवा सेलच्या माध्यमातून युवकांना संधी दिली जात आहे. या युवा कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करुन राजकीयदृष्ट्या त्यांना तयार केले जात आहे. लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्वपक्षीय नेत्यांसह युवा पदाधिकारी आणि कार्यकर्ते कामाला लागले असून, ज्येष्ठ अनुभवी नेत्यांची युक्ती आणि युवांची शक्ती यातून निवडणुकीचे काय निकाल हाती येतात, हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.

सद्य:स्थितीत निवडणुकीचे वारे वाहत नसले तरी मतदारसंघांचा अभ्यास सुरु करण्यात आला आहे. ज्येष्ठ आणि अनुभवी नेत्यांकडून मतदारसंघनिहाय अभ्यास केला जात आहे. त्यानंतर निवडणुकीची व्यूहरचना आखून त्यावर युवकांना अंमलबजावणी करण्यास सज्ज ठेवले जाणार असल्याचे राजकीय वर्तुळात बोलले जात आहे. जिल्ह्यात शिवसेनेची युवा सेना आणि भारतीय जनता युवा मोर्चाचे पदाधिकारी काही दिवसांपासून ग्रामीण भागात सक्रिय झाले आहेत. विकास कामांसह वेगवेगळ्या विषयांवर आक्रमक भूमिका मांडली जात आहे. तसेच बैठका आणि मार्गदर्शन शिबिरांतून युवकांना ‘बौद्धिक’ दिले जात आहे. तर राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसमध्ये वातावरण थंड असल्याचे दिसून येत आहे. या दोन्ही पक्षांच्या युवा सेलचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते आगामी काळात सक्रिय होतील, अशी चिन्हे आहेत.


Web Title: New generation in politics
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.