खजुराला फळाच्या दर्जासाठी हालचाली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 19, 2018 11:43 AM2018-10-19T11:43:44+5:302018-10-19T11:45:51+5:30

शेतीवाडी :बागेश्वरी साखर कारखान्याच्या परिसरात बहरलेल्या ‘खजुरा’ला इतर फळांसारखा दर्जा देण्यात यावा, या मागणीने जोर धरला आहे 

a movement for giving 'fruit' status to Dates | खजुराला फळाच्या दर्जासाठी हालचाली

खजुराला फळाच्या दर्जासाठी हालचाली

Next

- शेषराव वायाळ (परतूर जि.जालना)परतूर  

येथील बागेश्वरी साखर कारखान्याच्या परिसरात बहरलेल्या ‘खजुरा’ला इतर फळांसारखा दर्जा देण्यात यावा, या मागणीने जोर धरला असून, स्व. वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाने खजुराला फळाचा दर्जा मिळण्यासाठीचा प्रस्ताव शासनाकडे पाठविला. येथील दहा एकरांवर हे ‘खजुरा‘चे पीक बहरले आहे. गत वर्षीपासून या झाडाला खजूर लगडू लागले.

हे फळ तसे या भागात अपरिचितच! मात्र, खजुराची खऱ्या अर्थाने ओळख करून दिली ती ‘बागेश्वरी’चे चेअरमन शिवाजीराव जाधव यांनी. खजुरामुळे एकरी दीड लाख सुरुवातीला, दुसऱ्या वर्षी अडीच लाख उत्पन्न मिळाले. जशी झाडांची वाढ होईल, तसे हे उत्पन्न एकरी ५ ते ६ लाखांपर्यंत उत्पादन वाढत जाते. पीक रोगाला फारसे बळी न पडणारे, कमी पाणी व अल्प मेहनतीवर येणारे आहे, केवळ रोपांचा खर्च शेतकऱ्यांना न परवडणारा आहे. एका रोपाची किंमत जवळपास ३ हजार रुपये आहे. त्यामुळे खजुराचा आंबा, चिकू, पेरू, बोर, डाळिंब, मोसंबीसारख्या इतर फळांत समावेश करून शासनाने शेतकऱ्यांना ‘फळबाग’ योजनेप्रमाणे अनुदान दिल्यास खजुराची लागवड मोठ्या प्रमाणात होऊ शकते.

खजूर खाण्यास चवदार आहे. व्हिटॅमिनचे प्रमाणही उत्तम आहे. खजुराचे रोप ‘दुबई’हून मागविण्यात आले. हे रोप ‘टिश्यू कल्चरचे’ आहेत. या झाडांना शेणखत व उसाच्या मळीचा अधिक वापर करण्यात आला. रासायनिक खतांचा वापर नसल्याने हे फळ चवदार, गोड व आकर्षक दिसते. झाडाची जसजशी वाढ होत जाईल तसतसे उत्पन्न वाढते. यावर्षी एका झाडाला शंभर ते दीडशे किलो खजूर निघाले, पुढे हे उत्पन्न एका झाडाला अडीचशे किलोपर्यंत जाईल, अशी माहिती शिवाजीराव जाधव यांनी दिली. कुलगुरू डॉ. अशोक धवन यांनीही खजुराच्या फळबागाला भेट देऊन पाहणी केली आहे.

Web Title: a movement for giving 'fruit' status to Dates

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.