Merchants should follow up for the reconstruction of Phule market | फुले मार्केट उभारणीसाठी व्यापा-यांनी पाठपुरावा करावा

लोकमत न्यूज नेटवर्क
जालना : जालना शहराच्या प्रतिष्ठेचा प्रश्न बनलेल्या महात्मा फुले मार्केटची उभारणी लवकरात लवकर करण्यासाठी व्यापारी बांधवांनी लोकप्रतिनिधींसह शासनस्तरावर पाठपुरावा करावा, असे आवाहन व्यापारी महासंघाचे जिल्हाध्यक्ष हस्तिमल बंब यांनी बुधवारी येथे केले.
व्यापारी महासंघाची वार्षिक सभा जैन भवन येथे नुकतीच पार पडली. यावेळी बंब म्हणाले की, दहा वर्षापूर्वी महात्मा फुले मार्केट जमीनदोस्त करण्यात आले. गाळेधारकांना अत्याधुनिक सुविधांयुक्त मार्केट उभारून दुकाने देण्यात येईल, असे आश्वासन दिले होते. मात्र, पूर्तता झालेली नाही. या भागात अस्वच्छतेसह अतिक्रमणाचा प्रश्न गंभीर बनला आहे. बैठकीस उपाध्यक्ष सुखदेव बजाज, कोषाध्यक्ष दिलीप अग्रवाल, सीता मोहिते, अ‍ॅड. सुब्रमण्यम अय्यर, राम मोहिते, रमेश दळवी, विश्वनाथ हारेर, जगन्नाथ थोटे, नारायण टकले यांच्यासह सिंधी काळेगाव, रोहिलागड, माहोरा, अंबड, मंठा, शहागड, तीर्थपुरी, बदनापूर, राजूर, जाफराबाद, कुंभार पिंपळगाव, दाभाडी, भोकरदन, घनसावंगी, परतूर इ. भागांतील व्यापारी उपस्थित होते.
लहान व्यापा-यांना संघटनेत समाविष्ट करुन गावा-गावात दौरे करुन संघटनेची बांधणी करण्याचा निर्णय बैठकीत घेण्यात आला. महिला आघाडीच्या अध्यक्षा सीता मोहिते यांनी आगामी काळात जिल्हाभर दारुबंदी जनआंदोलन करण्यात येईल, असे सांगितले.