lok sabha election 2019 : खोतकरांच्या माघारीने ‘कहीं खुशी कहीं गम’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 19, 2019 08:09 PM2019-03-19T20:09:48+5:302019-03-19T20:11:07+5:30

जी आश्वासने त्यांना देण्यात आली, नंतर ती भाजपकडून पाळलीच जातील का, याबाबत शंका उपस्थित केली जात आहे. 

Lok Sabha Election 2019 : 'Kabhi Khushi Kabhi Gum' In Jalana constituency due to Arjun Khotkar's return | lok sabha election 2019 : खोतकरांच्या माघारीने ‘कहीं खुशी कहीं गम’

lok sabha election 2019 : खोतकरांच्या माघारीने ‘कहीं खुशी कहीं गम’

googlenewsNext

- संजय देशमुख 

जालना : गेल्या तीन महिन्यांपासून भाजपचे प्रदेशाध्यक्ष खा.रावसाहेब दानवे यांच्या विरोधात दंड थोपटणारे राज्यमंत्री अर्जुन खोतकर यांनी माघार घेतल्याचे परिणाम हे युतीसाठी सकारात्मक आहेत. यातून खोतकरांनी बरेच काही पदरात पाडून घेतले असले तरी जी आश्वासने त्यांना देण्यात आली, नंतर ती भाजपकडून पाळलीच जातील का, याबाबत शंका उपस्थित केली जात आहे. 

खोतकरांच्या माघारीने काँग्रेसही अप्रत्यक्षपणे अडचणीत सापडल्याचे वास्तव आहे. खोतकरांनी माघार न घेता दानवेंशी दोन हात करावेत, अशी अनेकांची इच्छा होती. ही इच्छा खोतकरांनी चांगलीच तापतही ठेवली होती. शेवटपर्यंत आपण काय करणार, हे त्यांनी गुलदस्त्यात ठेवले होते. खऱ्या अर्थाने सहकारमंत्री सुभाष देशमुख हे मुख्यमंत्र्यांचे विश्ोष दूत म्हणून आल्यावरच खोतकरांची तलवार म्यान झाली होती. मात्र अचानकपणे आपण माघार घेत असल्याचे जाहीर केले असते तर ते शिवसैनिकांसाठी क्लेशकारक ठरले असते. त्यामुळे त्यांनी माघारीचा मुद्दा चांगलाच ताणून धरला होता. मात्र, आता हा सर्व इतिहास झाला असून मनोमिलन होताच खोतकर यांनी सोमवारी रावसाहेब दानवे यांची त्यांच्या भोकरदन येथील निवासस्थानी जाऊन भेट घेतली. तसेच त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छाही दिल्या. त्यामुळे खोतकरांमधील हा बदल निश्चित चर्चेचा विषय ठरला. खोतकरांनी ज्या मुद्यांवर माघार घेतली, त्यात आगामी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत उमेदवारी मिळावी म्हणून फासे टाकले आहेत. तसेच जालना कृषी उत्पन्न बाजार समिती, तूर घोटाळा, दुकानांचे झालेले लिलाव आणि रामनगर सहकारी साखर कारखान्याची जमीन हे हुकमी पत्ते भाजपकडे अर्थात रावसाहेब दानवेंकडे होते. त्यामुळे जास्त न ताणता खोतकर यांनी माघारीचे अस्त्र स्वीकारले. 

काँग्रेससमोर पेच
खोतकरांच्या माघारीने काँग्रेसमध्येही चलबिचल झाली आहे. खोतकर येणार-येणार अशा गोबेल्स नीतीचा सक्षमपणे उपयोग करून काँग्रेसच्या नेतृत्वालाही त्यांनी गाफील ठेवल्याची जोरदार चर्चा आता सुरू आहे. खोतकरांचे आणि काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांचे दृढ संबंध सर्वश्रुत आहेत. त्यातच आता माजी आ. कल्याण काळे यांना उमेदवारी देण्याचे प्रयत्न काँग्रेसकडून केले जात आहेत. मात्र, त्यांची इच्छा नसल्याने नवीन पेच काँग्रेससमोर निर्माण झाला आहे.  

हे नवे नाही...
खोतकरांच्या माघारीबद्दल माजी आ. कैलास गोरंट्याल यांना विचारले असता ते म्हणाले की, हा युतीचा अंतर्गत प्रश्न आहे. त्यामुळे त्यावर आपण भाष्य करणार नाही. एवढे करूनही जर आगामी विधानसभेत ते माझ्या विरोधात उभे राहिले तर हे काही माझ्यासाठी नवीन नसल्याचे गोरंट्याल म्हणाले.  

Web Title: Lok Sabha Election 2019 : 'Kabhi Khushi Kabhi Gum' In Jalana constituency due to Arjun Khotkar's return

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.