Education essintial for society's progress | समाजाची प्रगती करायची असेल तर शिक्षण घेणे गरजेचे
समाजाची प्रगती करायची असेल तर शिक्षण घेणे गरजेचे

लोकमत न्यूज नेटवर्क
जालना : कुमावत समाजाची प्रगती करायची असेल तर प्रत्येक व्यक्तीने शिक्षण घेणे आवश्यक आहे. जीवनात शिक्षणाचे मोठे महत्व आहे. समाज हा शिक्षणाने घडत असतो, त्यामुळे क्षत्रिय कुमावत समाजाचा उद्धार झाल्याशिवाय राहणार नाही, असे प्रतिपादन अखिल महाराष्ट्र कुमावत संघटनेचे महाराष्ट्र राज्य अध्यक्ष साहेबराव कुमावत यांनी केले.
जालना येथे अखिल महाराष्ट्र कुमावत समाजाच्या मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. या मेळाव्याचे उद्घाटन बारा बलुतेदार महासंघाचे राज्याध्यक्ष कल्याण दळे यांच्या हस्ते झाले. यावेळी बलुतेदार महासंघाचे मराठवाडा अध्यक्ष राजेंद्र खंडेलवाल, अधिव्याख्याता डॉ. प्रमोद कुमावत, अहमदनगर जिल्हा अध्यक्ष गणेश छल्लारे, संतोष परदेशी, गणेश राजवाल, प्रमोद कुमावत, तुकाराम लोदवाल, भाऊसाहेब नारनवले, गणेश मोहोरे, प्रभा बारवाल यांची उपस्थिती होती.
यावेळी कुमावत म्हणाले, क्षत्रिय कुमावत हा समाज शिक्षणाची कास धरून प्रगती करत आहे. समाज बांधवांच्या विविध अडचणी सोडवण्याचे काम संघटना करत आहे. बांधकाम क्षेत्रातील काम करणाऱ्यांनी सर्व योजनेचा लाभ घ्यावा, असे त्यांनी सांगितले.
यावेळी डॉ. प्रमोद कुमावत म्हणाले, कुमावत समाजाच्या उद्धारासाठी आपण शिक्षण व पैसे ही दोन्ही माध्यमे कशी मिळवता येईल, याचा विचार करावा. व्यसनांपासून दूर राहून आपण आरोग्य व पैसा दोन्ही वाचवू शकतो. यातूनच आपला विकास होईल, असे त्यांनी सांगितले.
तसेच सरला कामे यांनी मनोगत व्यक्त केले. यावेळी अखिल महाराष्ट्र कुमावत संघटनेच्या जिल्हा अध्यक्षपदी राजू छल्लारे यांची नियुक्ती करण्यात आली. याच वेळी जालना जिल्ह्याची कार्यकारणी जाहीर करण्यात आली. यावेळी समाज बांधवांची उपस्थिती होती.


Web Title: Education essintial for society's progress
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.