तू मारल्यासारखे कर, मी रडल्यासारखे करतो... !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 8, 2018 12:29 AM2018-06-08T00:29:47+5:302018-06-08T00:29:47+5:30

लोकसभेच्या निवडणुका अद्याप दूर असल्यातरी राजकीय मशागत आतापासून केल्यास त्यावेळी लगीनघाई होणार नाही. ही काळजी घेत भाजपचे प्रदेशाध्यक्ष खा. रावसाहेब दानवे तसेच राज्यमंत्री अर्जुन खोतकर यांच्यातील आरोप- प्रत्यारोप म्हणजे एक प्रकारे साखर पेरणीच असल्याचे बोलले जात आहे.

Do as you are hitting, I will cry ... | तू मारल्यासारखे कर, मी रडल्यासारखे करतो... !

तू मारल्यासारखे कर, मी रडल्यासारखे करतो... !

Next

संजय देशमुख।
लोकमत न्यूज नेटवर्क
यंंदा कधी नव्हे तो जून मध्येच चांगला पाऊस पडण्याची शक्यता असल्याने बळीराजा खरीप हंगामाच्या पेरणीसाठीच्या तयारीत गुंतला आहे. तर दुसरीकडे लोकसभेच्या निवडणुका अद्याप दूर असल्यातरी राजकीय मशागत आतापासून केल्यास त्यावेळी लगीनघाई होणार नाही. ही काळजी घेत भाजपचे प्रदेशाध्यक्ष खा. रावसाहेब दानवे तसेच राज्यमंत्री अर्जुन खोतकर यांच्यातील आरोप- प्रत्यारोप म्हणजे एक प्रकारे साखर पेरणीच असल्याचे बोलले जात आहे.
भाजप आणि शिवसेना युती बाबत अद्याप वरिष्ठ पातळीवर कुठलाच निर्णय झालेला नाही. आणि उमेदवार कोण असतील हा प्रश्न तर अद्याप पक्षाच्या पटलावरही नाही. मात्र, गेल्या दोन दिवसांतील दानवे आणि खोतकर यांच्यातील शाब्दिक युध्द टोकाला पोहोचले आहे. यामुळे ज्या प्रमाणे मुंबई महानगर पालिका तसेच पालघर निवडणुकीत शिवसेना आणि भाजपाने एकमेकांच्या विरोधात दंड थोपटून निवडणुका लढवल्या. त्यामुळे तेथे काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांचा विषयही जनतेसमोर आला नाही. त्याच धर्तीवर जालना लोकसभा मतदार संघात दानवे व खोतकरांकडून रणनीती आखली जात आहे की, काय असा प्रश्न निर्माण झाला आहे. २००९ मध्ये अर्जुन खोतकरांना शिवसेनेने घनसावंगी विधानसभा मतदार संघातून उमेदवारी दिली होती, त्यावेळी देखील खोतकरांनी तेथे आक्रमक प्रचार करून राजेश टोपे यांना मोठी टक्कर दिली होती. त्यानुसारच आता खोतकर हे आक्रमकपणे दानवेंवर तुटून पडत असल्याचे दिसून येत आहे. त्यातून कोणाचा किती फायदा होणार हे येणारा काळच ठरवेल.
युतीचा निर्णय न होताच दानवे आणि खोतकरांमध्येच निवडणूक होणार हे जनतेच्या मनावर बिंबवण्याचे काम आतापासून माध्यमांच्या माध्यमातून होत आहे. या दोघांनी जे एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप केले आहेत, त्यात त्यांनी यापूर्वी कधीही कुठल्या जबाबदार शासकीय यंत्रणेकडे एकमेकांच्या विरोधात कधी पुरावे दिल्याचे समोर येत नाही. त्यामुळे मूळ यंत्रणेला बाजूला ठेवून, केवळ माध्यमातून आम्ही दोघे किती एकमेकांच्या विरोधात उभे राहिलो आहेत, हे चित्र पध्दतशीरपणे रंगवले जात आहे. त्यामुळे जनतेतून काँग्रेसकडून कोण उभे राहणार, कोणाला उमेदवारी मिळणार या बाबत विचार करण्यास वेळच दिला जाऊ नये हा ही हेतू या आरोप-प्रत्यारोपातून साध्य केला जात असल्याचे वास्तव आहे.
एकूणच जालना बाजार समितीची निवडणूक आणि त्यानंतर झालेली जिल्हा परिषदेच्या निवडणुकीतून दानवे व खोतकर यांच्यातील वादाला जास्त धार आली. बाजार समितीच्या संचालक मंडळाच्या जागावाटपावरूनही बराच खल या दोन नेत्यांमध्ये झाला होता. त्यात तडजोड होऊन युती करून ही निवडणूक लढवली आणि सभापती ऐवजी उपसभापती पदावर रावसाहेब दानवे यांचे चुलत बंधू भास्कर दानवे यांना देऊन येथे समेट झाली. नंतर झालेल्या जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत भाजपने सर्वाधिक जागा जिंकूनही शिवसेनेने काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस सोबत हातमिळावणी करून अध्यक्षपदी अनिरूध्द खोतकर आणि उपाध्यक्ष पदी राष्ट्रवादीचे सतीश टोपे यांना संधी मिळाल्याने तर भाजपचा तीळपापड झाला होता.
या मुद्यांसह रस्ते विकासाचा शुभारंभ असो की नगराध्यक्षाची निवडणूक; यातून दानवे आणि खोतकरांमधील मतभेद वाढतच गेले. आणि आता तर, त्या दोघांनी एकमेकांच्या ‘अर्थपूर्ण’ उन्नतीचे स्त्रोत सांगून मोठा राजकीय धुरळा उडवून दिला आहे.

Web Title: Do as you are hitting, I will cry ...

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.