सुशिक्षित वर्ग ‘सायबर क्राईम’च्या जाळ्यात..!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 11, 2019 01:05 AM2019-07-11T01:05:27+5:302019-07-11T01:05:49+5:30

सुशिक्षित आता सायबर क्राईमच्या जाळ्यात येत असल्याचे चित्र मागील अडीच वर्षात दाखल गुन्ह्यांवरून दिसते.

The class of educated classes 'cybercrime' ..! | सुशिक्षित वर्ग ‘सायबर क्राईम’च्या जाळ्यात..!

सुशिक्षित वर्ग ‘सायबर क्राईम’च्या जाळ्यात..!

Next

विजय मुंडे ।
लोकमत न्यूज नेटवर्क
जालना : इंटरनेटच्या वाढत्या वापरामुळे आॅनलाईन व्यवहार करण्यावर सुशिक्षितांनी भर दिला. मात्र, हेच सुशिक्षित आता सायबर क्राईमच्या जाळ्यात येत असल्याचे चित्र मागील अडीच वर्षात दाखल गुन्ह्यांवरून दिसते. या कालावधीत १३ जणांच्या बँक खात्याची माहिती घेऊन त्यांना जवळपास १८ लाखांचा चुना चोरट्यांनी लावला आहे.
पूर्वी बहुतांश ग्राहक थेट बँकेत जाऊन व्यवहार करीत होते. मात्र, इंटरनेटचा वाढलेला वापर आणि केंद्र शासनाच्या ‘डिजिटल इंडिया’ कार्यक्रमानंतर आॅनलाईन व्यवहारावर सुशिक्षितांनी मोठा भर दिला. त्यातच विविध कंपन्यांनी आपल्या वेबसाईटवर विविध आॅफर देण्यास सुरू केली. त्यामुळे आॅनलाईन साहित्य खरेदीकडेही कल वाढला आहे. मात्र, आॅनलाईन व्यवहार करताना दक्षता न घेणाऱ्यांची संख्याही वाढू लागली आहे. त्यामुळे सायबर चोरांच्या जाळ्यात असे ग्राहक सहजपणे अडकू लागले आहेत.
२०१७ ते जून २०१९ या कालावधीत दाखल १८ गुन्ह्यांचा तपास सायबर पोलीस ठाण्यातील अधिकारी, कर्मचारी करीत आहेत. दाखल गुन्ह्यांपैकी १३ प्रकरणांमध्ये फेक कॉल करून खोटे आमिष दाखविणे, आॅनलाईन खोट्या जाहिराती देऊन बँक खात्यातून पैसे काढण्याचा प्रकार घडला आहे. २०१७ मध्ये एकाला कमी किमतीच्या आय-फोनच्या मोहात ८ हजार रूपयांना आॅनलाईन चुना लागला आहे. २०१८ मध्ये सायबर क्राईमचे १० गुन्हे दाखल झालेले आहेत. यातील ६ प्रकरणांत आॅनलाईन लूट झालेली आहे. यात १५ हजार ते दीड लाख रूपयापर्यंतची रक्कम लंपास झालेली आहे. तर चालू वर्षात आजवर सायबर क्राईमचे सहा गुन्हे दाखल झालेले आहेत. विशेषत: या सर्व सहा जणांचीही आॅनलाईन फसवणूक झाली आहे. १० हजार ते १२ लाख रूपयांची रक्कम खात्यातून लंपास करण्यात आली आहे. या घटना टाळण्यासाठी नागरिकांनी आॅनलाईन व्यवहार करताना दक्षता घेणे गरजेचे आहे.
फेक कॉलवर दिली जाते ओटीपी, बँक खात्याची माहिती
‘फेक कॉल’द्वारे दिल्या जाणा-या आमिषालाही अनेक जण बळी पडत आहेत. कमी किंमतीत चांगली वस्तू मिळणे असो किंवा नोकरी मिळणे असो हे संबंधितांच्या अंगाशी येत आहे.
ओटीपीसह बँक खात्याची माहिती मागितल्यानंतर सुशिक्षित ग्राहक अनोळखी व्यक्तीला माहिती देत आहेत. त्यामुळे फसवणूक होण्याचे प्रकार वाढले असून, ग्राहकांनी दक्षता घेण्याची गरज आहे.
आक्षेपार्ह मजकूरही अंगलट
व्हाटस् अ‍ॅप, फेसबुक इ. सोशल मीडियाचा वापर वाढला आहे. मात्र, बनावट खाती काढून एखाद्याची बदनामी करणारे किंवा आक्षेपार्ह मजकूर टाकण्याचे प्रमाण वाढले आहे.
अशा मजकुरामुळे कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये, यासाठी पोलीस दलाकडूनच आता सोशल मीडियावर लक्ष ठेवले जात असून, आक्षेपार्ह मजकूर टाकणा-या ६ जणांवर मागील अडीच वर्षात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
२ लाख ८० हजार ‘रिकव्हर’
आजवर दाखल सायबर गुन्ह्यांमध्ये जवळपास १८ लाख ४१ हजार रूपयांचा चुना संबंधितांना लागला आहे. पोलीस अधीक्षक एस. चैतन्य, अपर पोलीस अधीक्षक समाधान पवार यांच्या मार्गदर्शनाखाली पोनि राजेंद्रसिंह गौर व त्यांच्या सहकाऱ्यांनी केलेल्या तपासात जवळपास २ लाख ८० हजार रूपये रक्कम परत मिळविण्यात आली आहे. मात्र, अशा आॅनलाईन व्यवहारात अनेकांची नावे, बँक खाती बनावट असल्याने चोरट्यांचा तपास लागणे मुश्किल होत आहे.

Web Title: The class of educated classes 'cybercrime' ..!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.