छत्रपतींच्या जयघोषाने दुमदुमली जालनानगरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 20, 2018 12:36 AM2018-02-20T00:36:43+5:302018-02-20T00:37:34+5:30

जालना शहरासह जिल्ह्यात छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती सोमवारी विविध कार्यक्रमांनी उत्साहात साजरी करण्यात आली. ठिकठिकाणी काढण्यात आलेल्या मिरवणुका, शोभायात्रा जयंतीचे विशेष आकर्षण ठरल्या.

 Chhatrapati Shivaji Maharaj birth anniversary celebreted | छत्रपतींच्या जयघोषाने दुमदुमली जालनानगरी

छत्रपतींच्या जयघोषाने दुमदुमली जालनानगरी

googlenewsNext

जालना : जालना शहरासह जिल्ह्यात छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती सोमवारी विविध कार्यक्रमांनी उत्साहात साजरी करण्यात आली. ठिकठिकाणी काढण्यात आलेल्या मिरवणुका, शोभायात्रा जयंतीचे विशेष आकर्षण ठरल्या. सर्वपक्षीय सार्वजनिक जयंती उत्सव समितीच्या वतीने गांधी चमन चौकापासून शिवाजी महाराजांच्या पुतळ्यापर्यंत पारंपरिक पद्धतीने भव्य मिरवणुकीचे आयोजन करण्यात आले होते. दिवसभरात निघालेल्या मिरवणुका, शोभा यात्रा, दुचाकी रॅली यामुळे छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयघोषाने अवघी जालनानगरी दुमदुमली.
सार्वजनिक जयंती उत्सव समितीच्या मिरवुणकीला गांधी चमन चौकातून सायंकाळी पाच वाजता सुरुवात झाली. यावेळी पालकमंत्री बबनराव लोणीकर, राज्यमंत्री अर्जुन खोतकर यांनी सजविलेल्या रथात छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेला पुष्प अर्पण करून अभिवादन केले. माजी आ. कैलास गोरंट्याल, माजी आ. अरविंद चव्हाण, आ. नारायण कुचे, सेना जिल्हाप्रमुख भास्कर अंबेकर, भाजपचे जिल्हाध्यक्ष रामेश्वर भांदरगे, पोलीस अधीक्षक रामनाथ पोकळे, उपजिल्हाधिकारी राजेश जोशी, तहसीलदार विपिन पाटील, अंकुशराव राऊत, ब्रह्मानंद चव्हाण, एकबाल पाशा, संजय देठे, संतोष गाजरे, जगन्नाथ काकडे, अरविंद देशमुख, विष्णू पाचफुले, रवींद्र राऊत, पोलीस निरीक्षक राजेंद्रसिंह गौर, संतोष पाटील, शैलेश देशमुख यांच्यासह उत्सव समितीच्या पदाधिका-यांची प्रमुख उपस्थिती होती.
मिरवणुकीत सर्वात पुढे बैलगाडीतून वाजणा-या सनई-चौघड्यामुळे वातवारण मंगलमय झाले होते. पारंपरिक मंगल वाद्य, ढोल पथक, लेझीम पथक, घोडे व उंटावर ऐतिहासिक वेशभूषेत स्वार झालेले मावळे, डोक्यावर भगवा फेटा बांधून मिरवणुकीत सहभागी झालेले विविध पक्ष, संघटना, सामाजिक संस्थांचे प्रतिनिधी, ज्येष्ठ नागरिक, युवक, युवती यामुळे संपूर्ण वातावरण शिवछत्रपतीमय झाल्याचे दिसून आले. हत्ती रिसाला समितीच्या बैलगाडीतील हत्तीवर विराजमान छत्रपती शिवरायांच्या वेशभूषेतील सजीव देखाव्याने सर्वांचे लक्ष वेधले.
मिरवणुकीच्या प्रारंभी मत्स्योदरी अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी शिवकालीन व आजची स्थिती या विषयावर पथनाट्य सादर केले. मिरवणूक मस्तगड, मुथा बिल्डिंग, मामा चौकमार्गे सायंकाळी आठ वाजता सावरकर चौकात पोहोचली. पारंपरिक वाद्यांबरोबरच डीजेवरील शिवरायांच्या शौर्य गाथा आणि गर्दीत उंच फडकणारा भगवा झेंडा यामुळे मिरवणुकीत सहभागी तरुणाईचा उत्साह शिगेला पोहोचला होता. शहरातील विविध भागांतून काढण्यात आलेल्या मिरवणुका सायंकाळी मामा चौकात मुख्य मिरवणुकीत सहभागी झाल्या. यावर्षी रथातून निघालेल्या मिरवणुकांची संख्या दुपटीने वाढल्याचे दिसून आले. सावरकर चौक, फूलबाजारमार्गे रात्री नऊच्या सुमारास मुख्य मिरवणूक उडपी कॉर्नरजवळ पोहोचली. त्यानंतर बडी सडकमार्गे रात्री उशिरा शिवाजी महाराज पुतळा चौकात समारोप करण्यात आला. यात राजकीय पदाधिका-यांसह, शासकीय अधिकारी, पक्ष, संघटनांच्या कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला. कुठलाही अनुचित प्रकार होऊ नये म्हणून शहरात चोख बंदोबस्त लावण्यात आला होता.
--------------
छत्रपती संभाजी उद्यानासमोर पालकमंत्री बबनराव लोणीकर यांच्या हस्ते सकाळी दहा वाजता छत्रपती शिवरायांच्या मूर्तीचा अभिषेक करण्यात आला. त्यानंतर शिवरायांची पालखी मिरवणूक व शिवभक्तांच्या दुचाकी रॅलीचा लोणीकर यांच्या हस्ते शुभारंभ करण्यात आला. शिवसंस्कृती प्रतिष्ठान व राहुल लोणीकर मित्रमंडळ, शिवतेज प्रतिष्ठान, सिंहगर्जना ढोलताशे मंडळ, सिद्धी विनायकनगर वारकरी प्रबोधन मंडळ, बाजी उम्रद गावकरी मंडळ, एम. राज मित्र मंडळ, शंकर मोहिते मित्रमंडळ यांच्या वतीने काढण्यात आलेल्या रॅलीत युवकांनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला. सिद्धीविनायकनगर वारकरी प्रबोधन मंडळाने ट्रॅक्टरमध्ये ठेवलेली शिवरायांची सिंहासनारुढ प्रतिमा, बैलगाडी समोर टाळ-मृदंगाच्या गजरात पावले खेळणारे बाल वारकरी सर्वांचे आकर्षणाचे केंद्र ठरले. इंदेवाडी व लक्ष्मीकांतनगरमधील मिरवणुका दुपारी २ वाजेच्या सुमारास शहरात दाखल झाल्या.
-------------
घराघरात शिवजयंतीचा उत्साह
यावर्षी सकल मराठा समाज, मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने घरा-घरात शिवजयंती साजरी करण्याचे आवाहन करण्यात आले होते. त्यास उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाल्याचे दिसून आले. गृहिणींनी सकाळीच सडा-रांगोळी काढली. बहुतांश घरांमध्ये पाटावर शिवरायांची प्रतिमा अथवा मूर्ती ठेवून पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.
सोशल मीडिया शिवमय
व्हॉटस्अप, फेसबुक, इंस्टाग्राम, ट्विटर यावर आठवडाभरापासून शिवजयंतीचे संदेश झळकत होते. सोमवारी तर सोशल मीडिया शिवमय झाला होता.

Web Title:  Chhatrapati Shivaji Maharaj birth anniversary celebreted

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.