बाप्पा आले...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 14, 2018 12:48 AM2018-09-14T00:48:28+5:302018-09-14T00:48:39+5:30

जालना शहर व जिल्ह्यात विघ्नहर्ता गणेशाचे परंपरागत उत्साहात गुरूवारी आगमन झाले.

Bappa came ... | बाप्पा आले...

बाप्पा आले...

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
जालना : जालना शहर व जिल्ह्यात विघ्नहर्ता गणेशाचे परंपरागत उत्साहात गुरूवारी आगमन झाले. सकाळपासूनच घरगुती आणि सार्वजनिक गणेश मंडळाने गणेश मूर्ती आणताना गुलालांची उधळण आणि ढोल ताशांच्या गजरात मिरवणूक काढून मूर्तींची स्थापना केली.
जालना शहरात गणेश चतुर्थीनिमित्त सकाळपासूनच बच्चे कंपनींसह युवकांनी मोठी गर्दी केली होती. नवीन आणि जुना जालना भागातील शनि मंदिर, बाजार चौकी पोलीस ठाणे, गांधी चमन, महात्मा फुले मार्केट, नरीमन रोड आदी भागांमध्ये गणपती मूर्ती खरेदीसाठी गर्दी झाली होती. गुलालाची उधळण करत आणि ढोल-ताशांच्या गजरामुळे वातावरणात जल्लोष भरला होता. अनेक भक्तीगीते, भावगीतांमुळे वातावरण भक्तीमय झाले होते. नवीन जालना भागातील काद्राबाद परिसरात मानाच्या गणपतीची सायंकाळी अध्यक्ष राजेंद्र आबड आणि गणेश मंडळाच्या पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत स्थापना करण्यात आली. जालना नगर परिषदेमध्येही गणपती स्थापना विधीवत करण्यात आली. विनायक महाराज फुलंब्रीकर, विजय फुलंब्रीकर यांच्या मंत्रोच्चारात नगराध्यक्षा संगीता गोरंट्याल यांनी श्रींची स्थापना केली. यावेळी माजी आ. कैलास गोरंट्याल यांच्यासह मुख्याधिकारी संतोष खांडेकर तसेच पालिकेतील अन्य विभागप्रमुख, नगरसेवकांची उपस्थिती होती. बडीसडक, शिवाजी पुतळा परिसरात रात्री उशिरापर्यंत गणेशाच्या मोठ-मोठ्या
मूर्तींचे वाजत गाजत स्वागत करण्यात आले. गणेशोत्सवानिमित्त पोलिसांनीही कडक बंदोबस्त ठेवला होता. काही भागांतून वाहतुकीची वेगळी व्यवस्था करण्यात आली होती.

मंत्रोच्चारात राजुरेश्वराची महापूजा
राजूर : गणेश चतुर्थीनिमित्त जिल्हाधिकारी रवींद्र बिनवडे, राजूर गणपती संस्थानचे अध्यक्ष तथा तहसीलदार संतोष गोरड व गजानन पुंगळे यांच्याहस्ते १३ सप्टेंबर रोजी सकाळी ९ वाजता राजुरेश्वराची मंत्रोच्चारात महापूजा करण्यात आली. यावेळी जोरदार पावसासाठी राजूरेश्वराला साकडे घालण्यात आले. जिल्हाधिकारी रवींद्र बिनवडे यांच्याहस्ते श्रीस मुकुट, वस्त्रालंकार चढवून महाआरती करण्यात आली.

जालना जिल्ह्यात यावर्षी ८९६ गणपतीची स्थापना करण्यात आली आहे. जिल्हाभरातून यासाठी १ हजार २५ अर्ज आले होते. त्यापैकी ८९६ मंडळांना परवागी देण्यात आली. यातील ८ मंडळांची परवागी रद्द करण्यात आली. ८३ जणांना परवगी देणे बाकी असल्याची माहिती पोलिसांनी दिली.
गणेश उत्सवानिमित्त विविध गणेश मंडळांनी लाऊडस्पीकर तसेच ढोल ताशांच्या ठेक्यावर युवकांनी चांगलाच ताल धरल्याचे दिसून आले. आया है राजा... लागो रे लोगो... देवा श्री गणेशा.. या गाण्यासह अनेक हिंदी, मराठी गीतांनी श्रींचे स्वागत करण्यात आले.
परंपरागत वेशभूषा
गणपतीची स्थापना करण्यासाठी अनेकांनी परंपरागत वेशभूषा केली होती. मूर्ती आणण्यासाठी प्रथम मूर्तीची आरती फेटा आणि टोपी घालून करण्यात येत होती. मकर सजावटीनेही अनेकांचे लक्ष वेधले होते.

 

 

Web Title: Bappa came ...

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.