And tears of joy in mother's eyes ... | अन् आईच्या डोळ्यात तरळले आनंदाश्रू...
अन् आईच्या डोळ्यात तरळले आनंदाश्रू...

लोकमत न्यूज नेटवर्क
परतूर : शहरातील बोलता न येणाऱ्या दोन चिमुकल्या खेळता खेळता अंगणातून गायब झाल्या. शोधाशोध सुरू असतानाच शहरातील एका गल्लीत आढळून आल्या. चिमुकल्यांना पाहताच आईने आनंदाश्रूंना वाट मोकळी करून दिली.
परतूर शहरातील अंबा रोड काजी गल्लीत राहणारे काझी सय्यद हमीद यांच्या दोन जुळया मुली ईल्मा सय्यद व निदा सय्यद वय अडीच वर्ष, ज्यांना काहीच बोलता येत नाही, सांगता येत नाही. या आज मंगळवारी सकाळी नऊ वाजेच्या दरम्यान अंगणात खेळता - खेळता रोडवरील वडीलांच्या गॅरेजकडे गेल्या. मात्र त्या ठिकाणी न जाता दुसरीकडेच शहरात रस्ता चुकल्या.
बराच शोध घेवूनही सापडत नव्हत्या कोणी घेवून गेले काय अशी शंका उपस्थित करीत सर्वच नातेवाईक त्यांचा शोध घेवू लागले. मात्र, शोध घेवूनही सापडत नसल्याने शेवटी परतूर पोलिसात याप्रकरणी तक्रारही देण्यात आली. नंतर सहा तासांनी या दोन जुळया चिमुकल्या शहरातीलच कुंभार गल्लीत फिरतांना आढळून आल्या.
या मुलींना घरी आणण्यात आले तेव्हा आपल्या चिमुकल्यांना सुखरूप पाहून रडणाऱ्या आईच्या डोळयातील आश्रूचे रूपांतर आनंदाश्रूत झाले. आईने मुलींना कवेत घेूवन आनंदाश्रूला वाट मोकळी करून दिली. या प्रसंगाने उपस्थित सर्वांनाच गहिवरून आले होते.


Web Title: And tears of joy in mother's eyes ...
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.