अंबड पालिकेची सभा ठरली वादळी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 13, 2018 12:49 AM2018-07-13T00:49:27+5:302018-07-13T00:49:53+5:30

Ambad Municipal Council meeting stormy | अंबड पालिकेची सभा ठरली वादळी

अंबड पालिकेची सभा ठरली वादळी

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
अंबड : नगरपालिकेची बुधवारची सर्वसाधारण सभा अनेक कारणांनी वादळी ठरली. या सभेच्या निमित्ताने सत्ताधारी भाजपामधील अंतर्गत धुसफुशीला तोंड फुटून आगामी काळात सत्ताधारी भाजपातील अंतर्गत संघर्ष टोकाला जाणार असल्याचे स्पष्ट झाले.
अंबड नगरपालिकेमध्ये कायदा धाब्यावर बसवून अनेक गोष्टी केल्या जात असल्याची चर्चा सुरु झाल्याने नैतिकतेचा दावा करणाऱ्या भाजपाच्या नेत्यांना जनतेच्या प्रश्नांना तोंड देण्याची वेळ आली आहे.
बुधवारच्या सर्वसाधारण सभेत स्वच्छतेच्या कंत्राटापोटी सचखंड एजन्सीला देण्यात आलेल्या १९ लाख रुपयांच्या धनादेशाबाबत ठरावावर चर्चेला सुरुवात होताच, सत्ताधारी पक्षाच्या स्वच्छता सभापती गंगाधर वराडे यांनीच यावर जोरदार आक्षेप घेतल्याने सभागृह स्तब्ध झाले. स्वच्छतेचे कंत्राट मार्च अखेरीस संपल्यानंतर पालिकेने स्वच्छतेच्या कंत्राटाची निविदा काढणे गरजेचे होते, मात्र, काही विशेष कारणांनी असे झाले नाही. एप्रिल महिन्यामध्ये पालिकेच्या कर्मचा-यांनी स्वच्छतेचे काम केले, या कर्मचाºयांना पालिकेने वेतन अदा करायला हवे होते मात्र या काळातील.कामाच्या मोबदल्यात खाजगी एजन्सीला १९ लाख रुपयांचा धनादेश अदा करण्याची गरजच काय असा आक्षेप वराडे यांनी घेतला. विरोधी बाकावरील राष्ट्रवादी काँग्रेसचे गटनेते शिवप्रसाद चांगले व माजी नगराध्यक्षांचे पती काकासाहेब कटारे यांनी या सर्व प्रकारात मोठा भ्रष्टाचार झाल्याचा आरोप करत या संपुर्ण प्रकरणाची चौकशी करण्याची मागणी केली.
स्वच्छता सभापती वराडे व राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगरसेवकांनी सदरील विषय उचलून धरल्याने सत्ताधारी भाजपा व नगराध्यक्षा संगीता कुचे यांची कोंडी झाली.
यानंतर आठवडी बाजाराच्या वसुलीचा मुद्दा उपस्थित सदस्यांना मांडला. कंत्राटाची मुदत जून महिनाअखेरीस संपल्यानंतरही सदरील कंत्राटदार बेकायदेशीरपणे आठवडी बाजारात येणाºया व्यापाºयांकडून वसुली करत असल्याची बाब पालिका सदस्यांनी मांडली. विशेष म्हणजे सदर कंत्राटदाराला आठवडी बाजाराची वसुली करण्यासंदर्भात पालिकेच्या जबाबदार पदाधिका-याने अभय दिल्याचा आरोपही सदस्यांनी करताच वातावरण पुन्हा एकदा तापले.
या दोन मुद्यांसह इतर अनेक बाबींविषयी सभागृहात वादळी चर्चा झाली, विरोधी पक्ष राष्ट्रवादी काँग्रेसने पालिकेचा कारभाराचा भ्रष्टाचाराचा कळस गाठल्याची टीका करत, पालिकेत नियमांचे पालन करुन काम करणे एकवेळ कठीण आहे. मात्र, नियमबाह्य कामे लवकर होत असल्याचा आरोप करत पालिकेच्या कारभाराचे वाभाडे काढले.
विशेष म्हणजे काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसच्या काळात पालिकेतील भ्रष्टाचाराने कळस गाठल्याचा आरोप करत भाजपा सत्तेत आली.
मात्र, केवळ दीड वर्षाच्या कार्यकाळातच सत्ताधारी भाजपावर भ्रष्टाचाराचे गंभीर आरोप होऊ लागल्याने पारदर्शक कारभाराचा गवगवा करणाºया भाजपा नेत्यांभोवती संशयाचे वर्तुळ निर्माण झाले आहे.
बुधवारी झालेल्या पालिकेच्या सर्वसाधारण सभेत स्वच्छता सभापती असलेले वराडे यांनी आपली नाराजी उघडपणे व्यक्त केल्याने सत्ताधारी भाजपामध्ये सर्वकाही आलबेल नाही हे स्पष्ट झाले.

Web Title: Ambad Municipal Council meeting stormy

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.