वाळू उपशाने घेतला दोघांचा बळी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 25, 2019 12:29 AM2019-03-25T00:29:26+5:302019-03-25T00:29:43+5:30

अवैधपणे वाळूचा उपसा करत असताना वाळूच्या ढिगाऱ्याखाली दबल्याने दोन युवकांचा गुदमरुन जागीच मृत्यू झाल्याची घटना शनिवारी रात्री घडली.

2 dead while sand digging | वाळू उपशाने घेतला दोघांचा बळी

वाळू उपशाने घेतला दोघांचा बळी

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
भोकरदन : अवैधपणे वाळूचा उपसा करत असताना वाळूच्या ढिगाऱ्याखाली दबल्याने दोन युवकांचा गुदमरुन जागीच मृत्यू झाल्याची घटना शनिवारी रात्री घडली. अनिकेत विक्रम तराळ (१७), योगेश कोंडीबा तराळ (२१) असे मृत युवकांची नावे आहेत. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे.
तालुक्यात मोठ्या प्रमाणात अवैधपणे वाळूचा उपसा करण्यात येत आहे. परिणामी तालुक्यातील प्रमुख नद्यांची चाळणी झाली आहे. याकडे महसूल प्रशासनाचे सर्रासपणे दुर्लक्ष होत आहे. शनिवारी २३ मार्च रोजी अशाच प्रकारे ट्रॅक्टर घेऊन वाळूचा उपसा करण्यासाठी मयत रात्री ९ वाजेच्या दरम्यान भोकरदन तालुक्यातील गोकुळ गावच्या लगत असलेल्या केळणा नदीच्या पात्रातून ट्रॅक्ट्ररमध्ये वाळू भरण्यासाठी गेले होते. पात्रातील वाळूच्या खड्यात अनिकेत विक्रम तराळ व योगेश कोंडीबा तराळ हे दोघे खड्ड्यातून वाळू भरून वर देत होते. तर उभे असलेले त्यांचे साथीदार वाळूने भरलेले टोपले ट्रॅक्ट्ररमध्ये टाकण्याचे काम करीत होते. ट्रॅक्टर भरत असतानाच पात्रातील खड्डयावरील बाजू अचानक कोसळल्याने अनिकेत तराळ व योगेश तराळ हे दोघे चुलत भाऊ खड्ड्यात दबले गेले. अचानक घडलेल्या या घटनेमुळे खड्ड्याच्यावर असलेल्या त्यांच्या तीन साथीदारांनी घाबरुन नदीपात्रातून घराकडे धूम ठोकली. घडलेल्या घटनेची माहिती ग्रामस्थांना दिली. ग्रामस्थांनी तातडीने नदीपात्रात जाऊन वाळूच्या ढिगाऱ्याखाली दबलेल्या तराळ बंधूना बाहेर काढले, ग्रामस्थांच्या मदतीने दोघांना भोकरदन येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासून दोघांना मृत घोषित केले. या घटनेची माहिती मिळताच पोलीस निरीक्षक चंदन इमले, सहायक पोलीस निरीक्षक लक्ष्मण सोन्ने, पोलीस उपनिरीक्षक अमन सिरसाठ, कर्मचारी नागरगोजे यांनी घटनास्थळी जाऊन घटनेचा पंचनामा केला. या घटनेची भोकरदन पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले.
नदीपात्र : कपारे ठरताहेत मजुरांसाठी कर्दनकाळ
तालुक्यात मोठ्या प्रमाणात रात्री वाळूची तस्करी करण्यात येत आहे. यामुळे केळणा, गिरजा, पूर्णा या नदीपात्रात मोठे कपारे पडले आहेत. या कपा-याच्या आत चांगल्या दर्जाची वाळू मिळत असल्याच्या हव्यासापोटी वाळू माफिया रात्रं - दिवस मजुरांच्या माध्यमातून उपसा करत आहेत. त्यामुळे कपार कोसळण्याची भीती अधिक असते. गेल्या वर्षी देखील कोदोली शिवारात केळणा नदीच्या पात्रात अशाच प्रकारे एका मजुराचा मृत्यू झाला होता. रात्रीच्या वेळी मजुरांना जास्तीचा मोबदला मिळतो. त्यामुळे जीव धोक्यात घालून अनेक मजूर काम करतात. मात्र महसूल व पोलीस यंत्रणेचे दुर्लक्ष होत असल्याने नागरिकांनी संताप व्यक्त केला.

Web Title: 2 dead while sand digging

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.