विकिलिक्सचा संस्थापक ज्युलियन असांजेला अटक; ब्रिटिश पोलिसांची कारवाई

By ऑनलाइन लोकमत | Published: April 11, 2019 03:33 PM2019-04-11T15:33:19+5:302019-04-11T15:40:24+5:30

अमेरिकेची मोठी गुपितं फोडणाऱ्या असांजेला बेड्या

WikiLeaks founder Julian Assange arrested at Ecuadorian embassy | विकिलिक्सचा संस्थापक ज्युलियन असांजेला अटक; ब्रिटिश पोलिसांची कारवाई

विकिलिक्सचा संस्थापक ज्युलियन असांजेला अटक; ब्रिटिश पोलिसांची कारवाई

Next

लंडन: विकिलिक्सचा संस्थापक ज्युलियन असांजेला ब्रिटिश पोलिसांनी अटक केली आहे. त्याला इक्वेडोरच्या दूतावासात अटक करण्यात आली. 2012 पासून ज्युलियननं असांज दूतावासात आश्रय घेतला होता. असांजेवर स्वीडनमध्ये लैंगिक छळाचा आरोप आहे. या प्रकरणात ब्रिटनमधील न्यायालयानं त्याला 2012 मध्ये जामीन दिला. तेव्हापासून तो इक्वेडोरच्या दूतावासात आश्रयाला होता.  




अमेरिकेची अनेक गुपितं फोडल्यानं चर्चेत आलेल्या ज्युलियन असांजेला अटक झाली. आता त्याला स्वीडन सरकारच्या ताब्यात दिलं जाण्याची शक्यता आहे. आपल्याला स्वीडनच्या ताब्यात दिल्यास अमेरिकेकडून अटक केली जाऊ शकते आणि त्यानंतर विकिलिक्सच्या माध्यमातून फोडलेल्या गुपितांबद्दल गुन्हे दाखल केले जाऊ शकतात, अशी भीती असांजेनं व्यक्त केली. वेस्टमिन्स्टर मॅजिस्ट्रेट कोर्टानं दिलेल्या आदेशानंतर असांजेला अटक करण्यात आल्याची माहिती मेट्रोपॉलिटन पोलीस सर्व्हिसनं पत्रकातून दिली. कोर्टाच्या आदेशानंतर इक्वेडोरनं असांजेला दिलेलं संरक्षण काढून घेतलं. यानंतर लगेचच पोलिसांनी त्याला दूतावासातून अटक केली. 

जवळपास सात वर्षे इक्वेडोरच्या दूतावासात आश्रयाला असलेला ज्युलियन असांजे आता पोलिसांच्या ताब्यात आहे, अशी माहिती गृह खात्याचे सचिव साजिद जाविद यांनी दिली. इक्वेडोरनं दिलेल्या सहकार्याबद्दल त्यांचे आभारी आहोत. कोणीही कायद्यापेक्षा मोठा नाही, असं जाविद यांनी सांगितलं. त्याआधी गेल्याच आठवड्यात पत्रकार आणि असांजे समर्थक असलेल्या जॉन पिल्गर यांनी इक्वेडोरच्या दूतावासाबाहेरील रस्त्यावर जमून असांजेसाठी आवाज उठवण्याचं आवाहन केलं होतं. 

असांजेनं फोडलेल्या गुपितांमुळे अमेरिकेला मोठी नाचक्की सहन करावी लागली होती. असांजेमुळे अमेरिकेची अनेक लाजिरवाणं कृत्यं चव्हाट्यावर आली. मात्र अमेरिकेनं कधीही असांजेविरोधात गुन्हा नोंदवल्याचं अधिकृतपणे सांगितलेलं नाही. मात्र नोव्हेंबर 2018 मध्ये या प्रकरणाशी संबंधित नसलेल्या काही कागदपत्रांतून याबद्दलची तयारी अमेरिकेकडून सुरू असल्याचं समोर आलं होतं. ही कागदपत्रं चुकून समोर आली होती. 

Web Title: WikiLeaks founder Julian Assange arrested at Ecuadorian embassy

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.