ठळक मुद्दे​​​​​​​राजीनाम्याबाबत प्रीती पटेल यांनी पंतप्रधान मे यांना पत्र लिहिल्यानंतर थेरेसा मे यांनीही पटेल यांना पत्राद्वारे उत्तर दिले. इंग्लंड आणि इस्रायल हे एकमेकांचे चांगले मित्र आहेत, दोघांनी एकत्र काम करण्याची गरज आहे मात्र ते सर्व औपचारिक पातळीवर योग्य मार्गाने होणे आवश्यक असल्याचे या पत्रात नमूद केले आहे.

 लंडन- इस्रायलमधील राजकीय नेते आणि अधिकाऱ्यांशी गुप्त बैठका घेतल्याबद्दल आणि त्याबद्दल चुकीची माहिती दिल्याबद्दल इंग्लंडच्या आंतरराष्ट्रीय विकास मंत्रालयाच्या भारतीय वंशाच्या मंत्री प्रीती पटेल यांना राजीनामा द्यावा लागला आहे. काल पंतप्रधान थेरेसा मे यांनी आफ्रिकेत दौऱ्यावर असणाऱ्या पटेल यांना तातडीने बोलावून घेतले तेव्हाच त्यांची गच्छंती अटळ असल्याचे सर्वांना समजले होते. एका आठवड्यात दोन मंत्र्यांना मंत्रिमंडळातून काढावे लागल्यामुळे थेरेसा मे यांच्यावर चांगलीच नामुष्की ओढावली आहे.

प्रीती पटेल यांनी ऑगस्ट महिन्यामध्ये इस्रायलभेटीमध्ये काही राजकीय व्यक्तींबरोबर बैठका घेतल्या अशी माहिती वर्तमानपत्रांनी प्रसिद्ध केली होती. या भेटीनंतर पटेल यांनी इस्रायली सैन्याद्वारे गोलन हाईटसमध्ये चालवलेल्या मानवतेच्या दृष्टीकोनातून चालवलेल्या मोहिमेत इंग्लंड मदत करेल असे संकेत दिले होते. याबाबत पटेल यांना स्पष्टीकरण द्यावे लागले होते. त्यानंतर इंग्लंडचे परराष्ट्रमंत्री बोरीस जॉन्सन यांना आपल्या भेटींबाबत माहिती होती अशी आपण चुकीची माहिती दिल्याचेही पटेल यांनी कबूल केले. त्यानंतर पुन्हा सप्टेंबर महिन्यात सरकारला अंधारात ठेवून पटेल यांनी इस्रायली राजकीय नेते व अधिकाऱ्यांची भेट घेतल्याचे स्पष्ट झाले. त्यामुळे पटेल यांच्यावर मंत्र्यांनी पाळायची सभ्यता व नियम तोडल्याचा ठपका ठेवण्यात आला.काल राजीनामा देताना पंतप्रधान थेरेसा मे यांना लिहिलेल्या पत्रामध्ये पटेल यांनी आपण आवश्यक खुलेपणा आणि पारदर्शकता राखण्यात कमी पडलो असे नमूद केले आहे.

विरोधी पक्षांची जोरदार टीका
प्रीती पटेल यांनी नियमांचा भंग केल्यानंतर थेरेसा मे यांच्या सरकारवर विरोधी पक्ष तुटून पडले आहेत. प्रीती पटेल या सुटीवर असताना ब्रिटिश अधिकाऱ्यांना भेटल्या होत्या अशी माहिती आपल्याला मिळाल्याचे मजूर पक्षाचे उपनेते टॉम वॅटसन यांनी थेरेसा मे यांना पाठवलेल्या पत्रात लिहिले आहे. "पटेल इस्रायलला गेल्या असताना जेरुसलेममध्ये ब्रिटिश महावाणिज्यदूतावासातील अधिकाऱ्यांना भेटल्या होत्या अशी माहिती मला मिळाली आहे, पण त्याबाबत कोणतीही माहिती प्रसिद्ध करण्यात आली नाही. जर हे असं घडलं असेल तर पटेल यांच्या भेटीबाबत परराष्ट्र खाते आणि राष्ट्रकूल कार्यालयाला काहीच माहिती नव्हती या विधानाला आधार उरत नाही असे वॅटसन यांनी या पत्रात लिहिले आहेत." पटेल यांच्या या बैठकांमुळे त्यांचे वर्तन आणि त्यांच्या इस्रायल भेटीमागचा उद्देश यावर प्रश्नचिन्ह तयार होते असेही त्यांनी लिहिले आहे.

थेरेसा मे यांच्या कॅबिनेटबद्दल वाद
थेरेसा मे यांनी निवडणुकीनंतर पंतप्रधानपदाची शपथ घेतल्यापासून त्यांच्यावर विविध प्रश्नांवरुन टीका सुरु आहे. मे यांच्या पक्षाचे बहुमत घटल्यावरुनही त्यांच्या पक्षाची लोकप्रियता कमी झाल्याची टीका त्यांच्यावर होत आहे. मंत्र्यांकडून झालेले लैंगिक दुर्वर्तन, ब्रेक्झिट बाबत केलेल्या तडजोडी, मंत्र्यांनी नियमांचा भंग करणे अशा विविध मुद्द्यांवर विरोधी पक्षांनी त्यांच्यावर तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.थेरेसा मे यांचे प्रीती पटेल यांना पत्र
राजीनाम्याबाबत प्रीती पटेल यांनी पंतप्रधान मे यांना पत्र लिहिल्यानंतर थेरेसा मे यांनीही पटेल यांना पत्राद्वारे उत्तर दिले. यामध्ये इंग्लंड आणि इस्रायल हे एकमेकांचे चांगले मित्र आहेत, दोघांनी एकत्र काम करण्याची गरज आहे मात्र ते सर्व औपचारिक पातळीवर योग्य मार्गाने होणे आवश्यक असल्याचे या पत्रात नमूद केले आहे. खुलेपणा आणि पारदर्शकता यांच्या आवश्यकतेवर अधोरेखित करत तू राजीनामा देण्याचा घेतलेला निर्णय योग्य आहे असे मे यांनी या पत्रात लिहिले आहे.

कोण आहेत प्रीती पटेल?
प्रीती पटेल या मूळच्या भारतीय वंशाच्या असून त्यांचा जन्म 29 मार्च 1972 साली इंग्लंडमध्ये झाला. त्यांचे आई-वडिल युगांडामधून आशियाई नागरिकांना हाकलण्याच्या इदी अमिन दादाच्या मोहिमेच्या थोडे आधीच इंग्लंडमध्ये येऊन स्थायिक झाले. पटेल यांना सर्वात प्रथम डेव्हिड कॅमेरुन यांनी कॅबिनेटमध्ये संधी दिली तर थेरेसा मे यांनीही त्यांचे मंत्रिमंडळातील स्थान कायम ठेवले होते.


Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.