आमच्याकडे गर्दी बघून होतो निर्णय, राम रहीमला शिक्षा सुनावल्यानंतर पाकिस्तानकडून भारतीय न्यायव्यवस्थेचं कौतुक

By शिवराज यादव | Published: August 30, 2017 12:19 PM2017-08-30T12:19:03+5:302017-09-28T17:15:52+5:30

न्यायालयाने राम रहीमला 20 वर्षांची शिक्षा सुनावल्यानंतर पाकिस्तानी मीडियाने भारतीय न्यायव्यवस्थेचं प्रचंड कौतुक केलं आहे. सर्व न्यूज चॅनेल्सवर निर्णयाचं विश्लेषण होत आहे. 

We are watching the rush of the crowd; After the punishment for Ram Rahim, the Indian jurisdiction appreciated by Pakistan | आमच्याकडे गर्दी बघून होतो निर्णय, राम रहीमला शिक्षा सुनावल्यानंतर पाकिस्तानकडून भारतीय न्यायव्यवस्थेचं कौतुक

आमच्याकडे गर्दी बघून होतो निर्णय, राम रहीमला शिक्षा सुनावल्यानंतर पाकिस्तानकडून भारतीय न्यायव्यवस्थेचं कौतुक

Next

मुंबई, दि. 30 - डेरा सच्चा सौदाचा प्रमुख गुरमीत राम रहीमला न्यायालयाने शिक्षा सुनावल्याने पुन्हा एकदा भारतीय न्यायव्यवस्थेने लोकांचा विश्वास सार्थ ठरवला आहे. न्यायालयाच्या निर्णयामुळे लोकांनी न्यायव्यवस्था आणि न्यायाधीशांचं कौतुक केलं आहे. गुरमीत राम रहीमवरील बलात्काराच्या आरोपाची सुनावणी सुरु झाल्यापासून वातावरण हिंसक होऊ लागल्याने भारतीय मीडियासहित पाकिस्तानी मीडियाचंही सुनावणीकडे लक्ष लागून होतं. न्यायालयाने राम रहीमला 20 वर्षांची शिक्षा सुनावल्यानंतर पाकिस्तानी मीडियाने भारतीय न्यायव्यवस्थेचं प्रचंड कौतुक केलं आहे. सर्व न्यूज चॅनेल्सवर निर्णयाचं विश्लेषण होत आहे. 

अशाच एका पाकिस्तानी न्यूज चॅनेलवर अँकरने न्यायालयाच्या निर्णयाचं कौतुक करताना कशाप्रकारे पाकिस्तानात गर्दी पाहून निर्णय दिले जातात यावरुन खडे बोल सुनावले आहेत. अँकरने सांगितलं की, कशाप्रकारे न्यायालयाने एका इतक्या प्रभावशाली व्यक्तीला शिक्षा दिली आणि त्यानंतर त्याच्या समर्थकांनाही निर्णय मान्य करावा लागला. इतकी हिंसा झाल्यानंतरही प्रशासन अजिबात आपल्या निर्णयावरुन मागे हटलं नाही याचंही अँकरने कौतुक केलं आहे. अँकरचा थेट इशारा आपल्या देशातील कट्टरपंथी नेता आणि समुदायांकडे होता, जे न्यायालयाने थोडीशी जरी कडक भूमिका घेतली तर आपल्या समर्थकांना घेऊन रस्त्यावर उतरतात आणि न्यायालयावर दबाव आणण्याचा प्रयत्न करतात. एकाप्रकारे पाकिस्तानच्या या अँकरने आपल्या देशाला आरसा दाखवण्याचं काम केलं आहे. 

डेरा सच्चा सौदाचा प्रमुख गुरमीत राम रहीमला बलात्काराच्या दोन्ही प्रकरणांमध्ये न्यायालयाने 20 वर्षांच्या कारावासाची शिक्षा सुनावली आहे.  शुक्रवारी न्यायालयाने बाबा राम रहीमला दोषी ठरवलं होतं.  दोषी ठरवल्यानंतर झालेला हिंसाचार लक्षात घेता तुरुंगातच न्यायालय भरवून शिक्षा सुनावण्यात आली. निकाल सुनावण्यासाठी न्यायाधीशांना विशेष हेलिकॉप्टरने रोहतकच्या तुरुंगात आणण्यात आलं होतं. राज्यातही प्रचंड बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. राम रहीम याला बलात्काराच्या दोन्ही प्रकरणांमध्ये प्रत्येकी 10 वर्षे याप्रमाणे 20 वर्षांच्या कारावासाची शिक्षा न्यायलयाने सुनावली असल्याचे सीबीआयचे प्रवक्ते अभिषेक दयाल यांनी सांगितले. याचबरोबर, राम रहीमला न्यायालयाने दोन्ही प्रकरणांमधे प्रत्येकी 15 लाख रुपये याप्रमाणे 30 लाख रुपयांचा दंड ठोठावला आहे. तसेच, या दंडाच्या रकमेतील दोन्ही पीडितांना प्रत्येकी 14 लाख रुपये देण्याचे न्यायालयाने आदेश दिले आहेत. दरम्यान, राम रहीम कोर्टरुममध्ये हात जोडून उभा असून दयेसाठी याचना करत होता. इतकंच नाही तर रडूही लागला होता.

बाबा गुरमीत राम रहीमला साध्वी बलात्कारप्रकरणी विशेष सीबीआय कोर्टाने दोषी ठरवल्यानंतर त्याला कोर्टाच्या आवारातून पळवून नेण्याचा कट होता अशी माहिती समोर आली आहे.  एकूण सातजणांनी मिळून राम रहीमला पळवून नेण्याचा कट आखला होता. धक्कादायक बाब म्हणजे यामध्ये हरियाणाच्याच काही पोलिसांचाही समावेश होता. तर इतर दोनजण खासगी सुरक्षा रक्षक होते. मात्र या सातजणांची तिथे तैनात असलेल्या इतर पोलिसांशी बाचाबाची झाली. त्यानंतर पोलिसांना कटाचा अंदाज आल्यामुळे  राम रहीमला पळवण्याचा प्लॅन फसला. इकॉनॉमिक टाइम्सने याबाबत वृत्त दिलं आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, एकूण सात जणांचा बाबाला पळवून नेण्याचा कट होता. यामध्ये पाच हरियाणा पोलिसांचाही समावेश होता. हे पाचजण  गेल्या 5 ते 6 वर्षांपासून बाबाच्या झेड प्लस सुरक्षेचा हिस्सा होते. याशिवाय इतर दोन जण हे खासगी सुरक्षा रक्षक होते.  हेड कॉन्स्टेबल अजय, कॉन्स्टेबल राम सिंह, हेड कॉन्स्टेबल विजय सिंह, सब इन्स्पेक्टर बलवान सिंह आणि कॉन्स्टेबल किशन कुमार या पाच हरियाणा पोलिसांचा यामध्ये समावेश होता. तर प्रितम सिंह आणि सुखबीर अशी इतर खासगी सुरक्षा रक्षक असलेल्यांची नावं आहेत. 
 

 

 

 

 

 

Web Title: We are watching the rush of the crowd; After the punishment for Ram Rahim, the Indian jurisdiction appreciated by Pakistan

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.