ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. 20 - एखादा सामना जिंकल्यानंतर देण्यात येणा-या विजयी भाषणात खेळाडूंची काही वाक्ये ठरलेली असतात. म्हणजे या विजयासाठी मी माझ्या कुटुंबाचे आभार मानतो. खंबीरपणे माझ्या पाठीशी उभे राहणारे माझे मित्र वैगेरे वैगेरे....त्यातल्या त्यात क्रिकेटमध्ये 'बॉयज प्लेड वेल' असं एक वेगळं वाक्य म्हणण्याची तेवढीच आपली मुभा मिळते. हा झाला विनोदाचा भाग. पण घानामधील फुटबॉलपटू मोहम्मद अनास याने या भाषणात काहीतरी वेगळं करायचा विचार केला असावा. या महाशयांनी भाषण देताना आपल्या पत्नीसोबत गर्लफ्रेंडचेही आभार मानून टाकले. त्याच्या या वेगळ्या भाषणामुळे एका रात्रीत त्याला सोशल मीडियाचा हिरो करुन टाकला आहे. 
 
मोहम्मद अनासने अॅजॅक्स केप टाऊनविरोधात खेळताना केलेल्या गोल्सनंतर त्याला 'मॅन ऑफ द मॅच' म्हणून निवडण्यात आलं. पुरस्कार स्विकारण्यासाठी आलेल्या मोहम्मदने यावेळी आभारप्रदर्शन सुरु केलं. आणि यावेळी बोलताना त्याने पत्नीसोबत गर्लफ्रेंडचेही आभार मानून टाकले. आपण भयंकर चूक केली असल्याचं लक्षात येताच मोहम्मदने सॉरी म्हणत चूक सुधारण्याचा प्रयत्न केला. 

 
'पुरस्कारासाठी आभार, मी माझे चाहते, पत्नी आमि गर्लफ्रेंडचे आभार मानतो', असं म्हटल्यानंतर मोहम्मदला चूक लक्षात आली आणि तो म्हटला 'माफ करा माझ्या पत्नीचे आभार मानतो'. आता घरी गेल्यावर मोहम्मदला कोणत्या परिस्थितीचा सामना करावा लागला असेल ते त्यालाच माहित. पण त्याच्या या वाक्यामुळे तो सोशल मीडियावर हिरो ठरला असून व्हायरल झाला आहे.