इस्लामाबाद- दहशतवादी संघटनांचा स्वतःच्या फायद्यासाठी वापर करून घेऊन त्यांच्यावर कारवाई न करण्याच्या आरोपांनी घेरलेल्या पाकिस्तानवर आता अमेरिकेनं मोठ्या प्रमाणात दबाव टाकला आहे. पाकिस्तानसुद्धा अमेरिकेच्या दबावापुढे काहीसा झुकताना पाहायला मिळतोय. पाकिस्ताननं अफगान तालिबानशी संबंधित असलेली दहशतवादी संघटना हक्कानी नेटवर्कच्या ताब्यातून अमेरिकी- कॅनेडियन कुटुंबाला सुरक्षित वाचवण्यासाठी मदत केली आहे.

दहशतवादाच्या मुद्द्यावर अमेरिकेच्या दबावाखाली असल्यानंच पाकिस्ताननं ही कारवाई केल्याची चर्चा आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी गुरुवाती अमेरिकी नागरिक व त्यांचे कॅनेडियन पती यांच्या सुरक्षितरीत्या सुटका होणार असल्याचं जाहीर केलं होतं. दोघांनाही 2012पासून हक्कानी नेटवर्कनं ओलीस ठेवलं होतं. या दहशतवादी संघटना हक्कानी नेटवर्कला अमेरिकेनं आयएसआयची सहाय्यक संघटना म्हणून संबोधित केलं होतं. पाकिस्तान सरकारसोबत मिळून आम्ही बॉयले-कोलमॅन यांची सुटका सुनिश्चित केल्याचं ट्रम्प यांनी सांगितलं होतं. तसेच ट्रम्प यांनी पाकिस्तानचे आभारही मानले आहेत.

परंतु ट्रम्प यांनी याबाबत सविस्तर माहिती देण्यास नकार दिला आहे. विशेष म्हणजे 2012पासून ओलीस ठेवण्यात आलेल्या अमेरिकी- कॅनेडियन दाम्पत्यानं तीन मुलांनाही जन्म दिला आहे. गेल्या काही दिवसांपूर्वी अमेरिकेच्या दौ-यावर असलेल्या पाकिस्तानच्या परराष्ट्र मंत्र्यांनीही दहशतवाद्यांनी उद्ध्वस्त करण्याचं जाहीर केलं होतं. अमेरिकेनं दहशतवादी संघटना हक्कानी नेटवर्कविरोधात पुरावे दिल्यास आम्ही त्यांना नष्ट करू, असं विधान पाकिस्तानचे परराष्ट्र मंत्री ख्वाजा आसिफ यांनी केलं होतं. अमेरिकेनं पुरावे दिल्यास आम्ही अमेरिकेसोबत हक्कानी नेटवर्कवर संयुक्त कारवाई करू, असंही आसिफ म्हणाले होते. 

अफगाणिस्तानमध्ये अमेरिकी सैनिकांच्या मृत्यूस कारणीभूत ठरलेल्या हक्कानी नेटवर्कला पाकिस्तान सरकारचा पाठिंबा आहे. त्यामुळे अमेरिकेच्या आर्थिक सहाय्याच्या बळावर अमेरिकेच्याच सैनिकांच्या मृत्यूस कारणीभूत ठरायचं, असा हा पाकिस्तानचा एकूण प्रकार होता. त्याला चाप लावण्याचा प्रयत्न ट्रम्प प्रशासन करत आहे. त्या पार्श्वभूमीवरच ख्वाजा आसिफ यांनी हे वक्तव्य केलं होतं.