वॉशिंग्टन, दि. 11 - उत्तर कोरियासोबत सुरु असलेल्या वादादरम्यान अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड्र ट्रम्प यांनी हुकूमशहा किम जोंग-उन यांना मोठी धमकी दिली आहे. डोनाल्ड ट्रम्प यांनी ट्विटरच्या माध्यमातून ही धमकी दिली आहे. 'समस्येवर लष्करी तोडगा काढण्यासाठी पुर्ण तयारी करण्यात आली आहे. उत्तर कोरियाचे हुकूमशहा किम जोंग-उन यावर काही अन्य मार्ग काढतील अशी आशा आहे', असं ट्विट डोनाल्ड ट्रम्प यांनी केलं आहे. 

गेल्या काही आठवड्यांपासून अमेरिका आणि उत्तर कोरियामध्ये शाब्दिक चकमक सुरु आहे. काही दिवसांपुर्वीही डोनाल्ड ट्रम्प यांनी ट्विट केलं होतं ज्यामध्ये त्यांनी सांगितलं होतं की, 'जर किम जोंग-उनने अमेरिकेला अशाच प्रकारे धमकी देणं सुरु ठेवलं, तर जगाने कधीच पाहिला नसेल अशा विनाशकारी हल्ल्याला उत्तर कोरियाला सामोरं जावं लागेल'. याआधी डोनाल्ड ट्रम्प यांनी आपल्या निवासस्थानी झालेल्या पत्रकार परिषदेतही किम जोंग-उनला धमकी दिली होती. 'जर उत्तर कोरियाने खोडं काढणं कायम ठेवलं, तर आम्हीदेखील उत्स्फूर्तपणे उत्तर देऊ. जगाने अशी ताकद कधीच पाहिली नसेल, असं उत्तर देऊ', असं ट्रम्प बोलले होते.

दुसरीकडे उत्तर कोरिया लवकरच मध्यम श्रेणीच्या बॅलिस्टिक मिसाइल मोठ्या प्रमाणात बनवण्याच्या तयारीत आहे. आम्ही बनवणा-या मिसाइल जपानवर हल्ला करण्यासाठी सक्षम असून, या मिसाइल अमेरिकन सेनेच्या मुख्य ठिकाणांनाही लक्ष्य करणार असल्याचं उत्तर कोरियानं म्हटलं आहे. उत्तर कोरियानं गेल्या आठवड्यात मिसाइल परीक्षण केलं असून, एका आठवड्यात उत्तर कोरियानं दोनदा मिसाइल परीक्षण केलं होतं. 

सॉलिड-फ्यूल पुकगुकसॉन्ग-2 मिसाइलनं चाचणीदरम्यान 500 किलोमीटरचे अंतर पार करत 560 किलोमीटर उंचावरून मारा केला. त्यानंतर मिसाइल प्रशांत महासागरात प्रवेशकर्ती झाली. या मिसाइलचं परीक्षण किम जोंग ऊन यांच्या देखरेखीखाली झालं. किम जोंग उन हे या मिसाइल परीक्षणामुळे संतुष्ट असून, या प्रकारच्या मिसाइल मोठ्या प्रमाणात बनवण्यात येणार असल्याचंही त्यांनी सांगितलं आहे, असं वृत्त एका स्थानिक वृत्तसंस्थेनं दिलं आहे. KCNAच्या मते, या मिसाइलची लक्ष्य भेदण्याची क्षमता अचूक असून, सॉलिड-फ्यूल पुकगुकसॉन्ग-2 मिसाइलनं आमचं सर्वात यशस्वी सामरिक शस्त्र असल्याचं ते म्हणाले आहेत. 
 


Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.