श्रीलंका बॉम्बस्फोटातील मृतांचा आकडा चुकविला; ट्रम्प यांनी काही कोटींमध्ये लिहिला

By ऑनलाइन लोकमत | Published: April 22, 2019 10:25 AM2019-04-22T10:25:06+5:302019-04-22T11:59:19+5:30

श्रीलंकेमध्ये ईस्टर संडेला ख्रिश्चन बांधवांना लक्ष्य करीत घडविण्यात आलेल्या साखळी बॉम्बस्फोटांचा अमेरिका, ब्रिटन, रशिया, न्यूझीलंड, पाकिस्तान, बांगलादेश तसेच युरोपातील अन्य देशांनीही तीव्र शब्दांत निषेध केला आहे.

trump once again made a mistake said 138 million people died in explosions in srilanka | श्रीलंका बॉम्बस्फोटातील मृतांचा आकडा चुकविला; ट्रम्प यांनी काही कोटींमध्ये लिहिला

श्रीलंका बॉम्बस्फोटातील मृतांचा आकडा चुकविला; ट्रम्प यांनी काही कोटींमध्ये लिहिला

Next
ठळक मुद्देईस्टर संडेला झालेल्या या बॉम्बस्फोटात आतापर्यंत 290 जणांचा मृत्यू झाला असून 500 हून अधिक जण जखमी झाले आहेत. अमेरिकेचे राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प यांनी श्रीलंकेतील बॉम्बस्फोटाबाबत चुकीचं ट्विट केलं होतं. श्रीलंकेतील स्फोटात 13 कोटी नागरिक ठार झाल्याचं ट्वीट ट्रम्प यांनी केलं होतं.

वॉशिंग्टन - श्रीलंकेच्या कोलंबोमध्ये तब्बल आठ ठिकाणी रविवारी (21 एप्रिल) साखळी बॉम्बस्फोट झाल्याची घटना समोर आली. यातील तीन बॉम्बस्फोट हे चर्चमध्ये तर 3 बॉम्बस्फोट हे हॉटेलमध्ये झाल्याची माहिती मिळाली होती. मात्र त्यानंतर आणखी दोन बॉम्बस्फोट करण्यात आले. सातव्या बॉम्बस्फोटात दोन जणांचा मृत्यू झाला आहे तर आठव्या बॉम्बस्फोटात तीन जणांचा मृत्यू झाला ईस्टर संडेला झालेल्या या बॉम्बस्फोटात आतापर्यंत 290 जणांचा मृत्यू झाला असून 500 हून अधिक जण जखमी झाले आहेत. 

श्रीलंकेमध्ये ईस्टर संडेला ख्रिश्चन बांधवांना लक्ष्य करीत घडविण्यात आलेल्या साखळी बॉम्बस्फोटांचा अमेरिका, ब्रिटन, रशिया, न्यूझीलंड, पाकिस्तान, बांगलादेश तसेच युरोपातील अन्य देशांनीही तीव्र शब्दांत निषेध केला आहे. अमेरिकेचे राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प यांनी श्रीलंकेतील बॉम्बस्फोटाबाबत चुकीचं ट्वीट केलं होतं. श्रीलंकेतील स्फोटात 13 कोटी नागरिक ठार झाल्याचं ट्वीट ट्रम्प यांनी केलं होतं. ट्रम्प यांचं हे चुकीचं ट्वीट सोशल मीडियावर जोरदार व्हायरल झाल्यानंतर तात्काळ हे ट्वीट डिलीट करण्यात आले. 


श्रीलंकेतील लोकांसोबत माझी संवेदना आहे, असं सांगत श्रीलंकेत हॉटेल आणि चर्चमध्ये भयंकर बॉम्बस्फोट झाले. त्यात 13.8 कोटी लोक ठार झाले असून 600 हून अधिक जखमी झाले आहेत. आम्ही श्रीलंकेच्या मदतीसाठी तत्पर आहोत, असं ट्वीट ट्रम्प यांनी केलं होतं. मात्र यूजर्सनी त्यावर तीव्र प्रतिक्रिया दिल्याने ट्रम्प यांनी तात्काळ हे ट्वीट डिलीट करत नव्याने ट्वीट केलं आहे. 

चर्च व हॉटेलमध्ये बॉम्बस्फोट घडवून निरपराध व्यक्तींचा बळी घेणाऱ्या प्रवृत्तींचा तीव्र निषेध करावा तेवढा थोडाच आहे अशी प्रतिक्रिया अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी व्यक्त केली आहे. तसेच श्रीलंकेत चर्च आणि हॉटेलमध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यात 138 लोक ठार झाले असून 600 हून अधिक लोक जखमी झाले आहेत. श्रीलंकन लोकांप्रति आम्ही संवेदना व्यक्त करतो. आम्ही त्यांच्या मदतीसाठी तयार आहोत, असं नवं ट्वीट ट्रम्प यांनी केलं आहे. 


श्रीलंकेतील हल्ल्याचा जगभरातून तीव्र निषेध

श्रीलंकेतील बॉम्बस्फोट ही अतिशय धक्कादायक घटना असल्याचे ब्रिटनच्या पंतप्रधान थेरेसा मे यांनी म्हटले आहे. या बॉम्बस्फोटांचा ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान स्कॉट मॉरिसन, न्यूझीलंडच्या पंतप्रधान जेसिंडा आड्रेन तसेच पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान, बांगलादेशच्या पंतप्रधान शेख हसीना तसेच बहारिन, कतार, संयुक्त अरब अमिरातीनेही तीव्र निषेध केला आहे. जर्मनीच्या चॅन्सलर एंजल मर्केल यांनी म्हटले आहे की, दहशतवाद समुळ नायनाट करायला हवा. श्रीलंकेतील बॉम्बस्फोटांनी ही बाब पुन्हा अधोरेखित केली आहे. यासह अनेक देशांच्या प्रमुखांनी हल्ल्याचा निषेध केला.


मिळालेल्या माहितीनुसार, जगभरात ईस्टर संडे साजरा होत असताना श्रीलंकेतील कोलंबो साखळी बॉम्बस्फोटांनी हादरले आहे. कोलंबोमधील शँग्रिला आणि सिंनामोन ग्रँड हॉटेलमध्ये तसेच कोलंबो बंदराजवळील सेंट अँथनी चर्च, कोच्चिकेडे चर्च, उत्तलम जवळील सॅबेस्टिअन चर्च या तीन चर्चमध्ये स्फोट झाल्याची माहिती मिळत आहे. रविवारी (21 एप्रिल) स्थानिक वेळेनुसार सकाळी 8.45 वाजण्याचा सुमारास हा स्फोट झाल्याची माहिती काही नागरिकांनी दिली आहे. या साखळी बॉम्बस्फोटात शेकडो लोक मृत्युमुखी, तर अनेक जण जखमी झाले आहेत. या स्फोटांमध्ये किती नुकसान झाले याबाबत माहिती गोळा करण्याचे काम सुरू असल्याचे स्थानिक प्रशासनाचे म्हणणे आहे. 


ईस्टर संडे असल्याने चर्चमध्ये मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते. या बॉम्बस्फोटात आतापर्यंत 290 जणांचा मृत्यू झाला 500 हून अधिक जण जखमी झाले आहेत. जखमींवर उपचार सुरू असून अनेकांची प्रकृती चिंताजनक आहे. मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. जखमी आणि मृतांमध्ये विदेशी पर्यटकांचाही समावेश अधिक असून 35 जणांचा मृत्यू झाला आहे. बॉम्बस्फोटाची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून पुढील तपास सुरू आहे. या स्फोटाची जबाबदारी अद्याप कोणत्याही दहशतवादी संघटनेने स्वीकारलेली नाही.


भारताच्या परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज यांनी कोलंबोतील बॉम्बस्फोटांच्या घटनेवर प्रतिक्रिया दिली आहे. 'कोलंबो येथील भारतीय उच्चायुक्तांच्या संपर्कात आहोत. तेथील परिस्थितीचा आढावा घेतला जात आहे' असं ट्वीट सुषमा स्वराज यांनी केलं आहे. तसेच कोलंबोतील साखळी बॉम्बस्फोटाच्या घटनेनंतर श्रीलंकेतील भारतीय दूतावासाकडून हेल्पलाईन नंबर जारी करण्यात आला आहे. 



कोलंबोतील परिस्थितीवर आम्ही नजर ठेवून असल्याची माहिती देणारे ट्वीट भारतीय दूतावासाने देखील केले आहे. या ट्वीटमध्ये भारतीय नागरिकांसाठी हेल्पलाइन क्रमांक देण्यात आला आहे. कोलंबो आणि बट्टीकालोआमध्ये स्फोट झाल्याची माहिती आम्हाला मिळाली असून आम्ही परिस्थितीवर लक्ष ठेवून असल्याचे ट्वीटमध्ये म्हटले आहे. मदत किंवा इतर माहितीसाठी भारतीय नागरिकांना संपर्क करता यावा साठी क्रमांकही देण्यात आले आहेत. +94777903082,+94112422788,+94112422789, +94112422789 हे संपर्क क्रमांक देण्यात आले आहेत तर श्रीलंकेतील संपर्क क्रमांकाव्यतिरिक्त+94777902082 +94772234176 या  क्रमांकावरही भारतीय संपर्क करू शकतात. 






Web Title: trump once again made a mistake said 138 million people died in explosions in srilanka

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.