तीन भारतीय भावंडांचा अमेरिकेतील भीषण आगीत होरपळून मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Published: December 27, 2018 05:46 AM2018-12-27T05:46:39+5:302018-12-27T05:46:55+5:30

एका घराला नाताळाच्या दोन दिवस आधी लागलेल्या भीषण आगीत घरमालकिणीसह तीन किशोरवयीन भारतीय भावंडे होरपळून मरण पावली

 Three Indian siblings die in a blaze in the US | तीन भारतीय भावंडांचा अमेरिकेतील भीषण आगीत होरपळून मृत्यू

तीन भारतीय भावंडांचा अमेरिकेतील भीषण आगीत होरपळून मृत्यू

Next

वॉशिंग्टन : अमेरिकेच्या टेनेसी राज्यातील कॉलिएरव्हिले गावातील एका घराला नाताळाच्या दोन दिवस आधी लागलेल्या भीषण आगीत घरमालकिणीसह तीन किशोरवयीन भारतीय भावंडे होरपळून मरण पावली.
गावातील बायबल चर्चने प्रसिद्ध केलेल्या निवेदनानुसार ही आग गावातील क्वाड्रिएट कुटुंबाच्या घराला २३ डिसेंबर रोजी सकाळी ११ च्या सुमारास लागली. अग्निशमन कर्मचारी येण्याआधीच शेजाऱ्यांनी सुमारे अर्धा तासात आग विझविली; पण तोपर्यंत ते संपूर्ण लाकडाचे असलेले घर जळून खाक झाले. चर्चने मृतांची नावे अशी दिली : श्रीमती कॅरी क्वाड्रिएट (५५ वर्षे), शेरॉन नाईक (१७), जॉय नाईक (१५) आणि अ‍ॅरॉन नाईक (१४).
घरमालक डॅनी क्वाड्रिएट व त्यांचा ११ वर्षांचा मुलगा कोल हे पेटत्या घराच्या खिडक्यांमधून उड्या टाकून बाहेर पडल्याने सुदैवाने वाचले. दोघेही गंभीर भाजले होते; पण आता त्यांच्या प्रकृतीचा धोका टळला आहे.
डॅनी व कॅरी क्वाड्रिएट कॉलिएरव्हिले बायबल चर्चचे संचालन करीत व चर्चच्या जवळच त्यांचे घर होते.
स्थानिक माध्यमांनी दिलेल्या वृत्तानुसार आग कशी लागली व चौघांचा मृत्यू होईपर्यंत कोणाला कळले कसे नाही, हे स्पष्ट झालेले नाही. नंतर अग्निशमन अधिकाºयांनी तपासणी केली असता घरातील आगीची पूर्वसूचना देणारी यंत्रणा बंद पडली अस्लयाचे आढळून आले. (वृत्तसंस्था)

अभागी दाम्पत्य तेलंगणाच्या नलगोंडा जिल्ह्यातील

आगीत दुर्दैवी मृत्यू झालेली तिन्ही भावंडे श्रीनिवास आणि सुजाता नाईक या भारतीय दाम्पत्याची मुले आहेत. हे दाम्पत्य भारतात तेलंगणाच्या नलगोंडा जिल्ह्यातील गुरुपुथंडा गावातील आहे. बायबल चर्चच्या आर्थिक मदतीने नाईक दाम्पत्य ख्रिस्ती धर्मप्रसाराचे काम करतात. तिन्ही मुलांच्या मृत्यूचे वृत्त कळताच ते तातडीने अमेरिकेला येण्यासाठी रवाना झाले.

श्रीनिवास नाईक हे अमेरिकेत पूर्वी चर्चमध्ये पॅस्टर म्हणून काम करायचे. गेल्या वर्षीच ते पत्नीसह भारतात परत गेले; मात्र तिन्ही मुले मिसिसिपी राज्यातील फ्रेंच कॅम्प अकादमीमध्ये शिकत असल्याने ते त्यांना अमेरिकेतच ठेवून गेले होते.
ही तिन्ही भावंडे नाताळ साजरा करण्यासाठी कॉलिएरव्हिले येथे क्वाड्रिएट कुटुंबाकडे पाहुणे म्हणून राहायला आली होती. दुर्दैवाने तेथेच मृत्यूने त्यांच्यावर घाला घातला.

Web Title:  Three Indian siblings die in a blaze in the US

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.