ऑनलाइन लोकमत 
 फ्लोरिडा, दि. 20 - पाऊस किंवा इतर कारणांमुळे अनेकदा खेळांचे सामने थांबवावे लागतात. भारतात तर मैदानात घुसणारे कुत्रे, मधमाशा, प्रेक्षकांचा गोंधळ यामुळे खेळ थांबवावा लागल्याचेही तुम्ही पाहिले असेल. पण अमेरिकेतील फ्लोरिडामध्ये एका वेगळ्याच कारणामुळे टेनिसचा सामना थांबवावा लागला. मात्र सामना थांबण्याचे कारण वाचल्यावर तुम्हाला हसू आवरणार नाही. 
 
त्याचे झाले असे की, फ्लोरिडामधील टेनिस कोर्टवर फ्रान्सिस तियेफो आणि मिचेल क्रूगर यांच्या एटीपी टूर टेनिसचा सामना सुरू होता. दोन्ही खेळाडू एकमेकांवर वर्चस्व गाजवण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा करत होते. प्रेक्षकही खेळ पाहण्यात दंग झाले होते. त्याच दरम्यान कोर्टवर एक आवाज घुमू लागला. तो आवाज पॉर्न व्हिडिओचा किंवा सेक्सचा असल्याचे कळण्यास "सुज्ञां"स वेळ लागला नाही. प्रेक्षकांपैकी कुणी पॉर्न व्हिडिओ पाहत तर नाही ना? याची चाचपणी झाली. आणखी कुठे काही चालू नाही ना हेही तपासण्यात आले. पण आवाज नेमका कुठून येतोय हे कळेना. या गोंधळामुळे खेळही थांबला. 
 
आवाज कायम होता आणि प्रेक्षकांचीही या अनपेक्षित मनोरंजनांमुळे हसून हसून पुरेवाट झाली होती. अखेर हा आवाज शेजारच्या इमारतीतून येत असल्याची माहिती सामन्याचे समालोचन करत असलेल्या समालोचकाने दिली. त्यानंतर सामन्यालाही पुन्हा सुरुवात झाली.