विगो : दारूचे दुष्परिणाम सर्वांनाच ठावूक आहेत. दारूमुळे कॅन्सरसारखे गंभीर आजार होण्याचा धोका असतो; परंतु तुम्हाला ऐकून आश्चर्य वाटेल की, स्पेनमधील एक व्यक्ती पाण्याऐवजी दारू पिऊन तब्बल १०७ वर्षे जगली.
दारू न पिणारी व्यक्ती आपण उभ्या आयुष्यात दारूच्या थेंबाला शिवलो नसल्याचे मोठ्या अभिमानाने सांगते. पण विगो शहरातील अ‍ॅन्टोनियो डोकॅम्पो गार्सिया यांच्याबाबत बोलायचे झाल्यास असे म्हणता येईल की, ते उभ्या आयुष्यात कधी पाण्याच्या थेंबाला शिवले नाहीत.
अ‍ॅन्टोनियो तहान लागली की, पाण्याऐवजी सेंद्रिय रेड वाईन पीत. दिवसभरात त्यांना ४ लिटर रेड वाईन लागे. ते १०७ वर्षे जगले. अ‍ॅन्टोनियो यांच्या दीर्घायुष्याचे कदाचित हेच रहस्य असावे. त्यांचे अलीकडेच निधन झाले. अ‍ॅन्टोनियो दरवर्षी ६० हजार लिटर रेड वाईन तयार करीत.
तीन हजार लिटर स्वत:साठी ठेवून उर्वरित वाईनची ते विक्री करीत होते. ही रेड वाईन पूर्णपणे रसायनविरहित आणि सेंद्रिय असे. रेड वाईन आरोग्यवर्धक असते. तिच्या नियमित सेवनाने कोलेस्ट्रॉल पातळी सामान्य राहते, असे इटलीचे लोक मानतात.