ट्रम्प-किम भेटीच्या पार्श्वभूमीवर रशियाचे परराष्ट्रमंत्री उत्तर कोरियात दाखल

By ऑनलाइन लोकमत | Published: May 31, 2018 02:18 PM2018-05-31T14:18:49+5:302018-05-31T14:18:49+5:30

अमेरिकेचे अध्यक्ष डोनल्ड ट्रम्प आणि उत्तर कोरियाचे शासक किम जोंग उन यांची 12 जून रोजी सिंगापूर येथे भेट होणार आहे.

Russian Foreign Minister Sergei Lavrov in North Korea's Pyongyang | ट्रम्प-किम भेटीच्या पार्श्वभूमीवर रशियाचे परराष्ट्रमंत्री उत्तर कोरियात दाखल

ट्रम्प-किम भेटीच्या पार्श्वभूमीवर रशियाचे परराष्ट्रमंत्री उत्तर कोरियात दाखल

सेऊल- अमेरिकेचे अध्यक्ष डोनल्ड ट्रम्प आणि उत्तर कोरियाचे शासक किम जोंग उन यांची 12 जून रोजी सिंगापूर येथे भेट होणार आहे. गेल्या वर्षी एकमेकांना आव्हाने देणारे हे नेते आता शांततेची बोलणी करण्यास भेटण्याची ही अभूतपूर्व वेळ असेल. त्यामुळे या भेटीकडे जगातील सर्व देशांचे आणि नेत्यांचे लक्ष आहे. त्यापार्श्वभूमीवर आंतरराष्ट्रीय राजकारणात वेगाने हालचाली होत आहेत. रशियाचे परराष्ट्रमंत्री सर्जेई लॅव्रोव एका दिवसाच्या दौऱ्यासाठी उत्तर कोरियात दाखल झाले आहेत.

उत्तर कोरियाचे परराष्ट्रमंत्री री योंग हो यांच्या आमंत्रणावरून सर्जेई लॅव्रोव डेमोक्रॅटिक पिपल्स रिपब्लिक ऑफ चायना (उत्तर कोरिया)मध्ये दाखल झाले आहेत अशी माहिती एसीएनए यावृत्तसंस्थेने दिली आहे. सर्जे लॅव्रोव यांनी उत्तर कोरियाच्या परराष्ट्रमंत्र्यांशी प्योंगयांग (उत्तर कोरियाची राजधानी) मध्ये असेम्ब्ली इमारतीमध्ये चर्चा सुरु केली आहे. मात्र त्याबद्दल कोणतीही माहिती कोरियन वृत्तसंस्थेने दिलेली नाही. 2009 नंतर लॅव्रोव यांची ही पहिलीच उत्तर कोरिया भेट आहे. लॅव्रोव यांनी अमेरिकेचे सेक्रेटरी ऑफ स्टेट माइक पोम्पेओ यांच्याशी काल फोनवरुन चर्चा केली.

उत्तर कोरियाचे उच्चपदस्थ नेते अमेरिकेत
बुधवारी रात्री उत्तर कोरियाचे काही उच्चपदस्थ अधिकारी अमेरिकेचे सेक्रेटरी ऑफ स्टेट माईक पोम्पेओ यांची भेट घेतली. या भेटीमध्ये उत्तर कोरियाचे नेते किम योंग चोल यांचाही समावेश होता. किम योंग चोल हे किम जोंग उन याचे उजवा हात मानले जातात. तसेच गेल्या 18 वर्षांमध्ये अमेरिकेत जाणारे ते सर्वात उच्चपदस्थ वरिष्ठ नेते आहेत. मॅनहॅटन येथे पोम्पेओ यांच्यासोबत त्यांनी जेवण घेतले आणि अर्धा तास चर्चा केली.

आज गुरुवारीही त्यांच्या दोन बैठका होणार आहेत. गेल्या महिन्यात उत्तर कोरियाचे शासक किम जोंग उन आणि दक्षिण कोरियाचे पंतप्रधान मून जाए इन यांची भेट झाली होती. सुमारे 50 वर्षांचा शीतयुद्धाचा काळ दोन्ही देशांनी अनुभवल्यानंतर त्यांच्यामध्ये झालेली ही भेट जागतिक शांततेसाठी महत्त्वाची मानली जाते. या दोन्ही देशांच्या नेत्यांनी आगामी काळामध्ये कोरिया द्वीपकल्पावरुन अण्वस्त्रे नष्ट करण्याचा मनोदय व्यक्त केला आणि त्या दिशेने प्रयत्न करण्याचे आश्वासन दिले होते. याबरोबरच उत्तर कोरियाने आपण नष्ट करत असलेल्या अणूप्रकल्पाच्या स्थळा भेट देण्याची परदेशी पत्रकारांना परवानगीही दिली. 

Web Title: Russian Foreign Minister Sergei Lavrov in North Korea's Pyongyang

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.