नवी दिल्ली - एका भारतीय व्यक्तीने केलेल्या भविष्यवाणीमुळे पाकिस्तानमधील सरकारी यंत्रणांची सध्या चांगलीच पळापळ सुरू आहे. या भविष्यवाणीतील उल्लेखाचा गांभीर्याने विचार करत पाकिस्तानमध्ये भूकंपाचा इशारा जारी करण्यात आला आहे.  केरळमधील एका एक्स्ट्रासेंसरी पर्सेप्शन संस्थानाने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पाठवलेल्या एका पत्रामुळे पाकिस्तानमध्ये ही खळबळ उडाली आहे. 
शनिवारी पाकिस्तानमधील भूकंप पुनर्निर्माण आणि पुनर्वास प्राधिकरणाकडून एक पत्र प्रकाशित करण्यात आले आहे. या पत्रामधून आशियामध्ये मोठ्या तीव्रतेचा भूकंप येऊ शकतो, अशी शक्यता वर्तवणाऱ्या आयएसआयकडून प्रसारित करण्यात आलेल्या एका अहवालाचा हवाला देऊन सावधानतेचा इशारा देण्यात आला आहे.  
पाकिस्तानी गुप्तहेर यंत्रणा असलेल्या आयएसआयचा हा अहवाल केरळमधील इएसपी क्षेत्रात काम करणाऱ्या बी. के. रिसर्च असोसिएशनच्या एका पत्रावर आधारित होता. या पत्रामध्ये व्याकरणाच्या अनेक चुका असून, हे पत्र कंपनीचे संचालक बाबू कलाइन यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना लिहिलेले आहे. या पत्रामधून भूकंपाबाबत सावधगिरी बाळगण्याचा इशारा सरकारला देण्यात आला होता. पाकिस्तानमधील एक्स्प्रेस ट्रिब्युनमध्ये प्रकाशित झालेल्या वृत्तानुसार या पत्रामधून 31 डिसेंबरपूर्वी एक मोठा भूकंप येईल, अशी भविष्यवाणी करण्यात आली आहे. 
आशिया खंडात येणाऱ्या या महाभयंकर भूकंपामुळे 11 देशांना फटका बसेल. तसेच भूकंपाच्या तीव्रतेमुळे समूद्राच्या सीमासुद्धा बदलतील, अशी भीती या पत्रातून व्यक्त करण्यात आली आहे. तसेच भूकंपाबरोबरच सीस्मा नावाचे वादळ येईल. त्याचा वेग 120 ते 180 किमी असेल, त्यामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान होईल, अशीही भविष्यवाणी करण्यात आली आहे. 
दरम्यान. कलइन यांच्या फेसबुक अकाऊंटवर करण्यात आलेल्या एका पोस्टनुसार त्यांनी याआधीही अशा शक्यता वर्तवल्या आहेत. तिकडे पाकिस्तानमध्ये शनिवारी आयएसआयच्या अहवालावर तातडीने कारवाई करत भूकंप पुनर्निर्माण आणि पुनर्वास प्राधिकरणाकडून एक पत्र प्रसारित करण्यात आले आहे. ज्यामधून परिस्थितीला सामोरे जाण्यासाठी अधिकाऱ्यांचे एक पथक स्थापित करण्याची सूचन देण्यात आली आहे. तसेच पाकिस्तानचे अमेरिकेतील माजी राजदूत हुसेन हक्कानी यांनीही या पत्राची एक प्रत आपल्या ट्विटरवरून शेअर केली आहे.