वॉशिंगटन : एच-१बी व्हिसा कार्यक्रमाची संपूर्ण पुनर्रचना करण्याच्या आदेशावर अमेरिकी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी काल स्वाक्षरी केली. या व्हिसाचा गैरवापर रोखण्यात यावा तसेच सर्वोच्च कुशल आणि सर्वाधिक वेतनधारी विदेशी व्यावसायिकांनाच हा व्हिसा मिळावा, असे ट्रम्प यांच्या आदेशात नमूद करण्यात आले आहे.
‘बाय अमेरिका, हायर अमेरिका’ या धोरणानुसार ट्रम्प यांनी आपला आदेश काढला आहे. या आदेशाचा भारतीय आयटी कंपन्या आणि व्यावसायिकांना मोठा फटका बसणार असल्याचे जाणकारांनी सांगितले. विस्कोन्सिनमधील केनोशा येथे स्नॅप आॅन इंक कंपनीच्या मुख्यालयात ट्रम्प यांनी या आदेशावर स्वाक्षरी केली. तत्पूर्वी त्यांनी तेथे एका सभेला संबोधित केले.
त्यांनी म्हटले की, सध्या लॉटरी पद्धतीने एच-१बी व्हिसा दिले जात आहेत. हे चूक आहे. त्याऐवजी सर्वाधिक कुशल आणि वेतनधारी लोकांना हे व्हिसा दिले जायला हवेत. अमेरिकी नागरिकांना नोकऱ्या नाकारण्यासाठी व्हिसाचा गैरवापर होता कामा नये.