ऑनलाइन लोकमत
इस्लामाबाद, दि. 11 - भारतीय नौसेनेतील माजी अधिकारी कुलभूषण जाधवांना न्यायालयानं फाशीची शिक्षा सुनावल्यानंतर पाकिस्तानी मीडियाला आनंदाचं भरतं आलं आहे. जाधवांना न्यायालयानं फाशीच्या शिक्षेचा दिलेला निर्णय हा अभूतपूर्व असल्याचा पाक मीडियानं म्हटलं आहे.

तर तज्ज्ञांच्या मते, या कृतीमुळे पाकिस्तानचं राजकीयदृष्ट्या वजन वाढलं आहे. पाकिस्तानच्या लष्करी न्यायालयानं हेरगिरी केल्याचा ठपका ठेवत जाधवांना फाशीची शिक्षा सुनावली आहे. त्यानंतर पाकिस्तानी मीडियानंही या शिक्षेचं जोरदार समर्थन करणं सुरूच ठेवलं आहे. पाकिस्तानमधील इंग्रजी भाषेतील वृत्तपत्र असलेल्या द नेशननं पहिल्या पानावर "हेरगिरी करण्यासाठी मृत्यू" ही शिक्षा असल्याचं छापलं आहे.

राजकीय आणि संरक्षण विश्लेषक डॉ. हसन अन्सारी यांच्यामते, या निर्णयामुळे दोन्ही देशांमधील तणावामध्ये वाढ होणार असून, पाकिस्ताननं या गुन्ह्यासाठी गंभीर शिक्षा दिल्याचंही द नेशननं छापलं आहे. हेरगिरी आणि विघातक कृत्ये केल्याचा आरोप ठेवून वर्षभरापूर्वी बलुचिस्तानमध्ये अटक केलेल्या कुलभूषण सुधीर जाधव यांना पाकिस्तानच्या लष्करी कोर्टानं काल फाशीची शिक्षा सुनावली आहे. त्याचे तीव्र पडसाद देशभरात उमटत असून ठिकठिकाणी शिक्षेविरोधात निदर्शनं सुरू आहेत.

कोण आहेत कुलभूषण ?

कुलभूषण जाधव हे भारतीय नौदलाचे कमांडर दर्जाचे माजी अधिकारी होते. ते भारताच्या रिसर्च अ‍ँड अ‍ॅनलिसिस विंग’ (रॉ) या गुप्तहेर संस्थेसाठी पाकिस्तानात हेरगिरी आणि विघातक कृत्यांची तयारी करत असताना पकडले गेले होते, असा पाकिस्तानचा दावा आहे. पाकिस्तानच्या म्हणण्यानुसार, जाधव यांना गेल्या वर्षी 3 मार्च रोजी बलुचिस्तानात मश्केल येथे अटक केली होती. त्या वेळी त्यांच्याकडे सापडलेल्या पासपोर्टवर त्यांचे नाव हुसेन मुबारक पटेल असे दाखवले होते. त्यावर ते सांगलीचे रहिवासी असून, ठाणे कार्यालयाने त्यांना 12 मे 2014 रोजी पासपोर्ट दिल्याचा उल्लेखही आहे. पाकिस्तानने या आरोपाच्या समर्थनार्थ त्याच्या पासपोर्टची प्रतही प्रसिद्ध केली आहे.