काश्मीर मुद्द्यावर पाकिस्तान नरमलं, आता म्हणतात चर्चेने काढू शकतो तोडगा

By ऑनलाइन लोकमत | Published: September 9, 2017 09:17 AM2017-09-09T09:17:27+5:302017-09-09T09:24:11+5:30

पाकिस्तानचे लष्कर प्रमुख कमर जावेद बाजवा यांनी काश्मीर मुद्द्यावर राजकीय आणि राजनयिक स्तरावर तोडगा काढला पाहिजे असं वक्तव्य केलं आहे

Pakistan is soft on the Kashmir issue, now the negotiations can be resolved | काश्मीर मुद्द्यावर पाकिस्तान नरमलं, आता म्हणतात चर्चेने काढू शकतो तोडगा

काश्मीर मुद्द्यावर पाकिस्तान नरमलं, आता म्हणतात चर्चेने काढू शकतो तोडगा

Next
ठळक मुद्देपाकिस्तानचे लष्कर प्रमुख कमर जावेद बाजवा यांनी काश्मीर मुद्द्यावर राजकीय आणि राजनयिक स्तरावर तोडगा काढला पाहिजे असं वक्तव्य केलं आहे याआधी कधीच पाकिस्तानच्या कोणत्याही लष्कर प्रमुखाने काश्मीर मुद्द्यावर शांततेच्या मार्गाने तोडगा काढण्याचा उल्लेख केला नव्हता'दोन्ही देशात राहणा-या लाखो लोकांचं भलं व्हावं असं वाटत असेल तर स्थायी शांतता गरजेची आहे', असं कमर बाजवा बोलले आहेत

इस्लामाबाद, दि. 9 - पाकिस्तानचे लष्कर प्रमुख कमर जावेद बाजवा यांनी काश्मीर मुद्द्यावर राजकीय आणि राजनयिक स्तरावर तोडगा काढला पाहिजे असं वक्तव्य केलं आहे. एकीकडे वारंवार युद्धाची धमकी देणा-या पाकिस्तानची भूमिका नरमली असल्याने आश्चर्य व्यक्त केलं जात आहे. आंतरराष्ट्रीय स्तरावर दहशतवादाविरोधात कडक पाऊल उचलण्यासाठी सर्व देशांनी एकत्र येण्याचा निर्धार केल्यानंतर लष्कर प्रमुख कमर जावेद बाजवा यांचं हे वक्तव्य आलं आहे. विशेष म्हणजे याआधी कधीच पाकिस्तानच्या कोणत्याही लष्कर प्रमुखाने काश्मीर मुद्द्यावर शांततेच्या मार्गाने तोडगा काढण्याचा उल्लेख केला नव्हता. कमर बाजवा यांनी संरक्षण दिवसाच्या निमित्ताने आयोजित कार्यक्रमात बोलताना हे मत व्यक्त केलं आहे. 

दोन दिवसांपुर्वी पाकिस्तानचे परराष्ट्र मंत्री ख्वाजा मोहम्मद यांनी दहशतवादी संघटनांना पाकिस्तानच्या धरतीवर आश्रय मिळाल्याची कबुली दिली असतानाच कमर बाजवा यांचं हे वक्तव्य समोर आलं आहे. विकासासाठी शांतता गरजेची आहे यावर कमर बाजवा यांनी जोर दिला. 'दोन्ही देशात राहणा-या लाखो लोकांचं भलं व्हावं असं वाटत असेल तर स्थायी शांतता गरजेची आहे', असं कमर बाजवा बोलले आहेत. पुढे त्यांनी सांगितलं की, 'पाकिस्तानवर टीका करणे आणि काश्मिरींवर लष्कराचा वचक ठेवण्यापेक्षा भारताने या मुद्द्यावर राजकीय आणि राजनयिक स्तरावर तोडगा काढल्यास जास्त चांगलं होईल'.

कमर बाजवा यांनी थेट भारताचा उल्लेख न करत शेजारी देश असं म्हणत सांगितलं की, 'दक्षिण आशियात अणुबॉम्ब घेऊन आम्ही आलेलो नाही. आमचे अणुबॉम्ब शांतता प्रस्थापित करण्याची हमी देतात. हे आमच्या शेजारी राष्ट्राला उत्तर आहे, जो आमच्यापेक्षा ताकदवान आहे. हा तोच देश आहे, जो दक्षिण आशियात पारंपारिक युद्द घेऊन आला आहे'.

जनरल कमर बाजवा यांनी पुढे बोलताना सांगितलं की, 'सुपर पॉवरच्या माध्यमातून सुरु केलेल्या युद्धाची किंमत आम्ही दहशतवाद, आर्थिक नुकसानाच्या माध्यमातून दिली आहे. आम्ही आमच्या धोरणावर ठाम आहोत, आणि आमच्या देशातील जमिनीचा वापर दुस-या देशाविरोधात होऊ देणार नाही. दुस-या देशांकडूनही आम्ही हीच अपेक्षा ठेवतो'.

दहशतवादाविरोधात सर्व देशांनी कठोर भूमिका घेत दोन हात करण्याची तयारी दाखवली असल्याने पाकिस्तानचे लष्कर प्रमुख नरमले असल्याचं बोललं जात आहे. त्याचमुळे कदाचित त्यांच्यात परिवर्तन होत असावं. आपल्या जमिनीवर दहशतवाद्यांना आश्रय दिल्यामुळे अमेरिकेसोबत इतर देशांकडून पाकिस्तानला विचारणा केली जात असून, टार्गेट केलं जात आहे. यामुळे गेल्या काही दिवसांत पाकिस्तान आपल्या धोरणांमध्ये बदल करताना दिसत आहे.
 

Web Title: Pakistan is soft on the Kashmir issue, now the negotiations can be resolved

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.