कुरापतखोर पाकनं सिंध प्रांतात हवाईतळ उभारून तैनात केली लढाऊ विमानं, भारताच्या चिंतेत वाढ

By ऑनलाइन लोकमत | Published: July 9, 2018 08:51 PM2018-07-09T20:51:16+5:302018-07-09T20:53:29+5:30

पाकिस्तान पुन्हा एकदा गुजरातच्या सौराष्ट्रला लागू असलेल्या नियंत्रण रेषेवर सक्रिय झाला

pakistan developing airbase along the gujarat border | कुरापतखोर पाकनं सिंध प्रांतात हवाईतळ उभारून तैनात केली लढाऊ विमानं, भारताच्या चिंतेत वाढ

कुरापतखोर पाकनं सिंध प्रांतात हवाईतळ उभारून तैनात केली लढाऊ विमानं, भारताच्या चिंतेत वाढ

googlenewsNext

नवी दिल्ली- गेल्या काही दिवसांपासून पाकिस्तानच्या नियंत्रण रेषेवरील कुरापती वाढत चालल्या आहेत. भारताच्या अनेक सीमावर्ती भागात पाककडून काही ना काही कुरघोड्या सुरूच असतात. पाकिस्तान पुन्हा एकदा गुजरातच्या सौराष्ट्रला लागू असलेल्या नियंत्रण रेषेवर सक्रिय झाला आहे. पाकिस्तानच्या सैन्यानं सिंध प्रांतातील हैदराबाद भागातल्या भोलारी येथे एक अत्याधुनिक हवाईतळ विकसित केलं आहे.

या क्षेत्रात पाकिस्तानच्या हवाई दलानं चीनकडून प्राप्त केलेली जेएफ-17 ही लढाऊ विमानं तैनात केली आहेत. सूत्रांच्या माहितीनुसार, पाकिस्तानातल्या सिंधमधलं हे हवाई क्षेत्र आधीपासूनच अस्तित्वात होतं. परंतु हल्लीच त्याचा लढाऊ विमानांच्या सरावासाठी वापर करण्यात येत आहे. पाकिस्तान स्वतःच्या पूर्व भागात भारतीय हवाईदलाशी मुकाबला करण्यासाठी मोठ्या संख्यानं चीन निर्मित जेएफ-17 विमानं तैनात करत आहे. पाकिस्तानच्या हैदराबादमधील तळावर पाकिस्तानी मरिन एसएसजी कमांडोंनी स्वतःचा तळ तयार केला आहे. त्या तळावरून एसएसजी कमांडोंकडून लष्कर-ए-तय्यबाच्या दहशतवाद्यांना समुद्रीमार्गे हल्ला करण्याची ट्रेनिंग दिली जाते. पाकिस्तानच्या या कुरापती लक्षात घेता संरक्षण मंत्री निर्मला सीतारामण यांनी गुजरातमधल्या सौराष्ट्रमध्ये  एक नवीन हवाईतळ विकसित करण्यास हिरवा कंदील दाखवला आहे.

भारताच्या या हवाईतळावरून पाकिस्तानकडून होणा-या संभाव्य हल्ल्यांना प्रत्युत्तर देता येणार आहे. परंतु याच्या निर्माणासाठी तीन ते चार वर्षं लागण्याची शक्यता आहे. सुरक्षा प्रकरणात निर्णय घेणा-या मंत्रिमंडळ समितीनं यंदाच गुजरातमधील सौराष्ट्रमध्ये नवीन हवाईतळ बनवण्याच्या प्रस्तावाला मंजुरी दिली आहे. पाकिस्तानच्या हवाई दलानं गेल्या वर्षीच 16 नवी जेएफ-17 थंडर विमानं हवाई दलात समाविष्ट केली होती. या लढाऊ विमानांना पाकिस्ताननं चीनच्या मदतीनं विकसित केलं आहे. पाकिस्तानकडे पहिल्यांदा 70हून अधिक जेएफ-17 थंडर विमानं होती. जेएफ-17 लढाऊ विमानं ही भारतातल्या लढाऊ विमानं तेजसच्याच तोडीची आहेत. त्यामुळे भारताच्या चिंता वाढल्या आहेत. 

Web Title: pakistan developing airbase along the gujarat border

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.