तुमची आर्थिक मदत नको म्हणणा-या पाकिस्तानने पुन्हा एकदा अमेरिकेसमोर पसरले हात

By ऑनलाइन लोकमत | Published: February 10, 2018 08:23 AM2018-02-10T08:23:14+5:302018-02-10T12:33:26+5:30

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी फटकारल्यानंतर आर्थिक मदत न घेण्याचा गवगवा करणा-या पाकिस्तानने पुन्हा एकदा अमेरिकेसमोर हात पसरले आहेत

Pakistan ask finacial help from US | तुमची आर्थिक मदत नको म्हणणा-या पाकिस्तानने पुन्हा एकदा अमेरिकेसमोर पसरले हात

तुमची आर्थिक मदत नको म्हणणा-या पाकिस्तानने पुन्हा एकदा अमेरिकेसमोर पसरले हात

Next

इस्लामाबाद - अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी फटकारल्यानंतर आर्थिक मदत न घेण्याचा गवगवा करणा-या पाकिस्तानने पुन्हा एकदा अमेरिकेसमोर हात पसरले आहेत. पाकिस्तानने अफगाणिस्तानच्या सीमेलगत कुंपण उभारण्यासाठी अमेरिकेकडे मदत मागितली आहे. परराष्ट्रमंत्री ख्वाजा मोहम्मद आसिफ यांनी, आर्थिक समस्यांमुळे अफगाणिस्तानला लागून असणा-या 2343 किमी लांब सीमारेषेवर कुंपण उभारण्याचं काम अद्याप पूर्ण होऊ शकलं नसल्याचं सांगितलं आहे. आतापर्यंत फक्त 10 टक्के भागातच कुंपण उभारण्यात आलं आहे. त्यांनी 2019 च्या अखेरपर्यंत हे काम पूर्ण होणं गरजेचं असल्याचं म्हटलं आहे. 

'अमेरिकेला यासाठी जास्त खर्च करावा लागणार नाही. यापेक्षा जास्त खर्च तर युद्दात होतो', असं ख्वाजा आसिफ बोलले आहेत. पाकिस्तान आणि अफगाणिस्तानच्या सीमारेषेवर डोंगर आहेत. यामुळे याठिकाणी कुंपण उभारण्याच्या कामात उशीर होत आहे. 'सीमारेषेवरील भाग सर्वांसाठी खुला आहे. रोज 70 हजार लोक सीमारेषेवरुन ये-जा करत असतात. अशा परिस्थिती दहशतवाद्यांचा धोका असतो', असं ख्वाजा आसिफ यांनी सांगितलं आहे. याशिवाय ख्वाजा आसिफ यांनी अफगाणी शरणार्थींना पुन्हा परत पाठण्यासाठीही मदत मागितली आहे. त्यांनी केलेल्या दाव्याप्रमाणे, सध्या पाकिस्तानात 20 लाखांहून अधिक अफगाण शरणार्थी आहेत. 

दहशतवादाविरोधात लढण्यासाठी पाकिस्तानला अमेरिकेकडून मिळणारी मदत रोखण्यात आली आहे. पाकिस्तानविरोधात अमेरिकेने केलेली ही मोठी कारवाई आहे. पाकिस्तानला खडसावल्यानंतर अमेरिकेनं तातडीनं कारवाई करत पाकिस्तान लष्कराला करण्यात येणा-या 255 दशलक्ष डॉलरची वार्षिक मदत रोखली आहे.  नववर्षाच्या पहिल्याच दिवशी ट्रम्प यांनी आजवर अमेरिकेच्या कोणाही राष्ट्राध्यक्षाने वापरली नाही अशी कडक भाषा वापरत पाकिस्तानला सज्जड इशारा देणारे ट्विट केले. 

दहशतवादाविरुद्ध लढण्यासाठी अमेरिकेने पाकिस्तानला भरभरून मदत केली पण त्याच्या बदल्यात पाकिस्तानकडून अमेरिकेला फक्त खोटारडेपणा आणि फसवणुकच मिळाली, असे खडे बोल सुनावत अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी पाकिस्तानला अमेरिकेकडून दिली जाणारी २५५ दशलक्ष डॉलरची वार्षिक मदत बंद करण्याचे संकेत दिले होते.

गेल्या १५ वर्षांत अमेरिकेने पाकिस्तानला ३३ अब्ज डॉलरहून अधिक आर्थिक मदत करण्याचा मूर्खपणा केला आणि आमचे (अमेरिकेचे) नेते मूर्ख आहेत, असे समजून त्या बदल्यात त्यांच्याकडून आमच्या वाट्याला फक्त खोटारडेपणा आणि फसवणूकच आली. आता बस्स झाले!, असे आक्रमक स्वरुपाचे ट्विट करत डोनाल्ड ट्रम्प यांनी पाकिस्तानला फटकारलं. 

पाकिस्तान दहशतवाद्यांना आश्रय देते असा आरोप करत ट्रम्प यांनी लिहिले की,' शेजारच्या अफगाणिस्तानात अमेरिका ज्या दहशतवाद्यांच्या मागावर आहे त्यांना पकडण्यास मदत करण्याऐवजी पाक त्यांना आश्रय देते'.

 

Web Title: Pakistan ask finacial help from US

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.