ompeg going to celebrate its third anniversary in Oxford | ऑक्सफर्डमध्येे रंगणार OMPEGचा तृतीय वर्धापनदिन
ऑक्सफर्डमध्येे रंगणार OMPEGचा तृतीय वर्धापनदिन

केदार लेले (लंडन)

यूकेतल्या काही धडाडीच्या उत्साही महाराष्ट्रीयन उद्योजकांनी एकत्र येऊन स्थापन केलेल्या ओएमपीईजी संस्थेला यंदा तीन वर्षे पूर्ण होत आहेत. त्यानिमित्त 27 एप्रिलला ऑक्सफर्डमध्ये शानदार कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं आहे. १७५ पेक्षा जास्त लोकांच्या उपस्थितीत हा सोहळा संप्पन होणार आहे.

गतवर्षीच्या कार्याचा आढावा, उल्लेखनीय, नाविन्यपूर्ण आणि व्यवसायव्रुद्धीेत भरीव काम केलेल्या सदस्यांचा सत्कार, पुढील उपक्रम, भेटीगाठी, व्यावसायिक देवाणघेवाण, समविचारी सदस्यांमध्ये नवीन उपक्रम अशा वैविध्याने हा सोहळा रंगणार आहे.

मराठी व्यवसाय विश्वात ओएमपीईजीचं नाव आदराने घेतलं जातं. महाराष्ट्रीयन समाज इंग्लंडमध्ये स्वातंत्र्यपूर्व काळापासून वास्तव्य करून आहे. हा समाज सांस्कृतिक, समाजपयोगी कार्यामध्ये १९३२ पासून कार्यरत आहे. व्यवसाय वृद्धीसाठी OMPEG गेली ३ वर्षे कार्यरत आहे. व्यवसाय वृद्धीसाठी संस्था सुरु झाल्यापासून गेली ३ वर्षे सातत्याने इंग्लंडमधील स्थायिक महाराष्ट्रीयन मंडळींना व्यवसाय करण्यासाठी प्रवृत्त करणे, व्यवसायाच्या वृद्धीसाठी मार्गदर्शन आणि मदत करणे, अनेक नवीन व्यवसायांना विविध उपक्रमांमधून व्यासपीठ उपलब्ध करून देणे, असे सर्व उपक्रम OMPEG ने शक्य करून दाखवले आहेत. जागतिक स्तरावर महाराष्ट्रीयन मंडळींसाठी व्यवसायवृत्ती वृद्धिंगत करण्यास सक्रियपणे काम करणारी अशी ही संस्था आहे.

संस्थेचे १२५ पेक्षा जास्त वर्गणीदार सदस्य आहेत. या मध्ये २५ % महिलांचा समावेश आहे. विषेश म्हणजे सर्व महिला सदस्य व्यवसाय करत आहेत. गेल्या ३ वर्षात संस्थेच्या सदस्यांनी उत्स्फूर्त सहभाग घेऊन ३० पेक्षा अधिक कार्यशाळा आणि विविध चर्चासत्रे आयोजित केली. या विविध कार्यक्रमाद्वारे अंदाजे १००० महाराष्ट्रीयन मंडळी या संस्थेशी जोडली गेली आहेत.

OMPEX २०१८चे यशस्वी आयोजन

संस्थेने गेल्या वर्षी प्रथमच व्यवसाय प्रदर्शन (Business Expo) आयोजित केले होते. स्लाव येथे संपन्न झालेल्या या प्रदर्शनामध्ये २५ व्यावसायिक स्टॉल्स थाटण्यात आले होते. स्लाव मित्र मंडळाच्या मदतीमुळे या शहरातून व आसपासच्या परिसरामधून सुमारे ७०० लोकांनी प्रदर्शनाला भेट दिली. वेळेचा सदुपयोग करून प्रदर्शनाच्या वेळात ४ कार्यशाळा आयोजित केल्या होत्या. १०० पेक्षा अधिक लोकांना या कार्यशाळेमधून विविध विषयांवर मार्गदर्शन करण्यात आले.

OMPEGची वाटचाल अभिमानास्पद 

“एकमेकां साहाय्य करु” हा या संस्थेच्या सदस्यांनी घेतलेला वसा आहे. संस्थेची वेबसाइट , मोबाइल अ‍ॅप असून सर्व सदस्य याचा योग्य वापर करून सोशल मीडियावर सतत प्रसिद्धी व माहिती उपलब्ध करून देत असतात.

कायदेतज्ज्ञ, हॉटेल व्यावसायिक, गृहकर्ज, वित्तीय नियोजन, विमान प्रवास आयोजन, गृह सजावट, crypto currency गुंतवणूक, software सर्विसेस, व्यक्तिमत्व विकास अशा विविध क्षेत्रामध्ये संस्थेचे सदस्य कार्यरत आहेत. 

संस्थेने ३१ डिसेंबर २०२० पर्यंत १००० सदस्य व सदस्यांच्या व्यवसायामधून १०० कोटी पौंड्सची उलाढाल हे लक्ष्य ठेवले आहे. अतिशय उल्लेखनीय बाब म्हणजे व्यवसायिकांबरोबर शिक्षण, सामाजिक इत्यादी क्षेत्रामधील मंडळी पण संस्थेशी संपर्कात असून यथायोग्य मार्गदर्शन करत आहेत.

 


Web Title: ompeg going to celebrate its third anniversary in Oxford
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.