- ऑनलाइन लोकमत
लंडन, दि. 16 - दुस-या महायुद्धानंतर गायब झालेल्या सोन्याने भरलेल्या नाझींच्या ट्रेनचा आपण शोध लावला असल्याचा दावा पोलंडमधील दोन स्थानिकांनी केला आहे. पोलंडमधील स्थानिक वृत्तवाहिन्यांनी यासंबंधी वृत्त दिलं आहे. दुस-या महायुद्धानंतर सोनं, हि-यांनी भरलेली ट्रेन गायब झाली होती असं म्हटलं जातं. 1945 मध्ये जेव्हा रशियन सैन्य आगेकूच करत होतं तेव्हा ही ट्रेन पोलंडमधील व्रोक्ला शहरात गायब झाली होती असा समज आहे. संशोधकांनी मंगळवारपासून खोदकामाला सुरुवात केली आहे. 35 स्वयंसेवक या खोदकामात मदत करणार आहेत.
 
दक्षिण - पश्चिम पोलंडमधील वकिलांनी माहिती दिली आहे की दोन व्यक्तींनी त्यांच्यांशी संपर्क साधला आहे. त्यांनी या ट्रेनचा शोध लावल्याचा दावा केला आहे. स्थानिक वृत्तवाहिन्यांनी दिलेल्या वृत्तानुसार या दोन्ही व्यक्तींनी ट्रेनमध्ये असलेल्या मुद्देमालामधील 10 टक्के भागीदारी मागितली आहे. विशेष म्हणजे ट्रेनचा शोध लागल्याचा दावा करणा-यांची माहिती आणि ट्रेन हरवल्याची गोष्ट यामधील काही गोष्टींमध्ये साम्य असून तथ्य असण्याची शक्यता आहे. 
 
रॉयटर्सने दिलेल्या वृत्तानुसार वकिल, लष्कर, पोलीस आणि अग्निशमन दलाशी संबंधित लोक या दाव्यांमधील तथ्य शोधण्याचा प्रयत्न करत आहे. वालब्रजिचमधील या ठिकाणी कधीच खोदकाम करण्यात आलेलं नाही. त्यामुळे याठिकाणी काय सापडेल याची कल्पना नसल्याचं एका अधिका-याने सांगितलं आहे. 
 
'ट्रेन एका बोगद्यात गायब झाली होती अशी अफवा आहे. त्यामध्ये सोनं आणि धोकादायक गोष्टी होत्या', असं इतिहासकार जोएना लेम्प्रास्का यांनी रेडिओ व्रोक्लाशी बोलताना सांगितलं आहे. 'या परिसरात अगोदरही शोधकार्य करण्यात आलं आहे, मात्र हाती काहीच लागलं नसल्याचंही', त्यांनी सांगितलं आहे.