रोहिंग्यांच्या पुनर्वसनासाठी म्यानमार आणि संयुक्त राष्ट्रामध्ये करार

By ऑनलाइन लोकमत | Published: June 6, 2018 02:04 PM2018-06-06T14:04:02+5:302018-06-06T14:04:02+5:30

रोहिंग्याचे पुनर्वसन व्हावे यासाठी म्यानमारवर सर्वच बाजूंनी दबाव येत होता.

Myanmar, UN sign pact on initial steps for Rohingya return | रोहिंग्यांच्या पुनर्वसनासाठी म्यानमार आणि संयुक्त राष्ट्रामध्ये करार

रोहिंग्यांच्या पुनर्वसनासाठी म्यानमार आणि संयुक्त राष्ट्रामध्ये करार

Next

यांगोन-  म्यानमार आणि संयुक्त राष्ट्रे यांनी आज एका करारावर स्वाक्षरी केली. यामुळे म्यानमारमधून पळून गेलेल्या 7 लाख रोहिंग्यांना पुन्हा म्यानमारमध्ये आणण्याच्या योजनेला गती येण्याची शक्यता आहे. गेल्या वर्षी जुलै-ऑगस्ट महिन्यामध्ये म्यानमारच्या रखाइन प्रांतामध्ये रोहिंग्या आणि म्यानमार सुरक्षादले, पोलीस यांच्यामध्ये झालेल्या तणावामुळे या रोहिंग्यांनी घाबरुन देश सोडला होता.

रोहिंग्यांच्या प्रश्नावर तोडगा काढण्यासाठी सहकार्य आणि अत्यंत सुरक्षित व शाश्वत पुनर्वसनासाठी सहकार्य मिळण्याची अपेक्षा या करारातून करण्यात आलेली आहे. म्यानमारच्या सुरक्षा दलांकडून रोहिंग्यावर अत्याचार झाल्याचा आरोप केला जात आहे. रोहिंग्या महिलांवर बलात्कार आणि रोहिंग्यांची हत्या झाल्याचाही आरोप त्यांच्यावर आहे. 

म्यानमारने कारवाई करताना डझनभर रोहिंग्या शिक्षक, वृद्ध लोक, धार्मिक नेत्यांना लक्ष्य करुन त्यांची हत्या केल्याचा आरोप रोहिंग्या करत आहेत. आपल्यावरील अत्याचारांवर बोलणारे सुशिक्षित लोक शिल्लकच राहू नयेत यासाठी त्यांची हत्या केली गेली असे वृत्तसंस्थेशी बोलताना रोहिंग्यांनी सांगितले आहे.

सुमारे १३ लाख लोकसंख्येचा असणारा रोहिंग्या हा एक मुस्लीम संप्रदाय आहे. म्यानमारमधील राखिने प्रांतात यांची सर्वात जास्त वस्ती होती. मात्र म्यानमारने या मुस्लीमांना नागरिकत्व देण्यास नकार दिला. त्याचप्रमाणे म्यानमारमध्ये त्यांच्यावर शिक्षण, विवाह, जमिन अधिग्रहण अशा अनेक क्षेत्रांवर बंधने लादली आहेत. स्थानिक बौद्ध व रोहिंग्या यांचे संबंधही नेहमीच तणावाचे राहिले आहेत. वांशिक आणि भाषिक कारणांमुळे या दोन्ही गटांमध्ये नेहमीच संघर्ष झालेला आहे. 

म्यानमारमधील रखाइन प्रांतातील रोहिंग्या लोक गेल्या वर्षी जीव मुठीत घेऊन बांगलादेशाच्या दिशेने पळाले होते. हत्या आणि अत्याचाराच्या सत्राला घाबरून पळालेल्या रोहिंग्यांचे प्रश्न आजही संपलेले नाहीत. युनीसेफने दोन दिवसांपुर्वी दिलेल्या अहवालामध्ये बांगलादेशात असणाऱ्या रोहिंग्यांच्या छावणीमध्ये 9 महिन्यांमध्ये 16 हजार मुलांचा जन्म झाला आहे. या छावणीमध्ये 7 लाख रोहिंग्या राहात आहेत.म्यानमारमधील नागरिक, तेथील लष्कर आणि रोहिंग्या यांच्यामध्ये झालेल्या तणावात्मक परिस्थितीमुळे रोहिंग्यांना घरेदारे सोडून पळून जावे लागले होते. हे लोक चालत किंवा समुद्रमार्गाने बांगलादेशासह इतर अनेक देशांमध्ये आश्रयासाठी गेले. त्यातील बहुतांश लोक बांगलादेशातील कॉक्स बझार येथे गेले नऊ महिने राहात आहेत. याबाबत बोलताना युनिसेफचे बांगलादेशातील प्रतिनिधी एडुआर्ड बेजर म्हणाले, दिवसाला सुमारे 60 या संख्येने बालकांचा जन्म होत आहे. या बालकांच्या माता छळ, हिंसा, बलात्कार अशा विविध गुन्ह्यांना तोंड देऊन येथे आलेल्या आहेत. तसेच कॅम्पमध्ये नक्की किती बालकांचा जन्म झाला आहे याचा खरा आकडा समजणे कठिण आहे असेही बेजर यांनी सांगितले. सेव्ह द चिल्ड्रेन या अभ्यासानुसार 2018 साली रोहिंग्यांच्या छावण्यांमध्ये 48 हजार मुले जन्मास येतील असा अंदाज व्यक्त केला आहे. इंडिया टुडेच्या वृत्तानुसार बांगलादेशी आरोग्य अधिकाऱ्यांनी 18,300 गरोदर महिला छावणीत असल्याची माहिती मिळालेली होती मात्र ही संख्या 25 हजारही असण्याची शक्यता आहे.

Web Title: Myanmar, UN sign pact on initial steps for Rohingya return

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.