रोहिंग्या प्रश्नाचे वार्तांकन करणाऱ्या दोन पत्रकारांना 7 वर्षांची शिक्षा

By ऑनलाइन लोकमत | Published: September 3, 2018 10:30 AM2018-09-03T10:30:51+5:302018-09-03T10:31:29+5:30

गेल्या वर्षी डिसेंबर महिन्यामध्ये या पत्रकारांना पकडण्यात आले होते. रखाईन प्रांतातील रोहिंग्यांचे हत्याकांड झाल्यावर या दोघांनी त्याचे वार्तांकन केले होते.

Myanmar: Reuters journalists investigating Rohingya killings sentenced to 7 years in prison | रोहिंग्या प्रश्नाचे वार्तांकन करणाऱ्या दोन पत्रकारांना 7 वर्षांची शिक्षा

रोहिंग्या प्रश्नाचे वार्तांकन करणाऱ्या दोन पत्रकारांना 7 वर्षांची शिक्षा

यांगोन- रोहिंग्यांच्या स्थितीबद्दल वार्तांकन करणाऱ्या रॉयटर्स समूहाच्या दोन पत्रकारांना 7 वर्षांचा कारावास ठोठावण्यात आला आहे. कार्यालयीन गुप्तता कायद्याचा भंग केल्याचा आरोप त्यांच्यावर ठेवण्यात आला होता. आज यांगोन येथील न्यायालयाने त्यांना शिक्षा ठोठावली.
वा लोन (32) आणि क्याव सोए ऊ  (28) अशी त्या दोघांची नावे आहेत. गेल्या वर्षी डिसेंबर महिन्यामध्ये त्यांना पकडण्यात आले होते. रखाईन प्रांतातील रोहिंग्यांचे हत्याकांड झाल्यावर या दोघांनी त्याचे वार्तांकन केले होते. कारावासाची शिक्षा सुनावल्यावर क्याव याने आपण दोघेही निर्दोष असल्याचा पुनरुच्चार केला आणि या निर्णयाने धक्का बसला नाही असे सांगितले.



'' हा त्या दोघांसाठी, आमच्या संस्थेसाठी आणि सर्वच प्रसारमाध्यमांसाठी एक दुःखाचा दिवस आहे'',असे मत रॉयटर्सचे एडिटर इन चिफ स्टीफन अॅडलर यांनी व्यक्त केले. ह्युमन राइटस वॉचचे आशिया विभागाचे उपसंचालक फिल रॉबर्टसन यांनीही या निर्णयावर दुःख व्यक्त केले आणि म्यानमारच्या मुक्त अभिव्यक्तीवर हा आघात असल्याचे मत मांडले.
या दोघांना ज्या कायद्यांतर्गत शिक्षा झाली आहे तो कायदा ब्रिटिशांनी वसाहतीच्या काळात तयार केला होता. यामध्ये जास्तीतजास्त 14 वर्षांच्या कारावासाच्या शिक्षेची तरतूद आहे. गेल्या सोमवारीच या दोघांच्या खटल्याचा निर्णय येणार होता मात्र न्यायाधीशांनी आपण आजारी असल्यामुळे न्यायालयात येऊ शकत नाही असे सांगून एक आठवडा निर्णय पुढे ढकलला होता.



गेल्या वर्षी ऑगस्ट महिन्यापासून 7 लाख रोहिंग्यांनी म्यानमारच्या रखाईन प्रांतातून स्थलांतर केले आहे आणि त्यांनी बांगलदेशात प्रवेश केला आहे.  कुतापलाँग-बालुखाली या छावणीमध्ये 6 लाख 26 हजार लोक राहात असून जगातील सर्वात मोठी छावणी म्हणून ती ओळखली जात आहे. येथे अत्यंत कमी जागेत जास्त लोक सामावले असून प्रत्येक व्यक्तीला 10.7 चौ. मी इतकी जागा राहाण्यासाठी मिळत आहेत. मात्र आंतरराष्ट्रीय मापदंडानुसार प्रत्येक व्यक्तीसाठी किमा 45 चौ. मी जागा उपलब्ध असली पाहिजे. यातील 2 लाख रोहिंग्यांना पूर आणि दरडींचा त्रास सहन करावा लागू शकतो.



 



 

Web Title: Myanmar: Reuters journalists investigating Rohingya killings sentenced to 7 years in prison

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.