मुशर्रफ यांची २३ पक्षांची आघाडी; ‘पाकिस्तान अवामी इत्तेहाद’ची स्थापना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 12, 2017 05:05 AM2017-11-12T05:05:55+5:302017-11-12T05:05:55+5:30

पाकिस्तानचे माजी राष्ट्रपती आणि हुकूमशहा परवेज मुशर्रफ यांनी २३ राजकीय पक्षांची महाआघाडी स्थापन केली आहे. या महाआघाडीचे नाव ‘पाकिस्तान अवामी इत्तेहाद’ (पीएआय) असे असणार आहे. याच्या अध्यक्षपदी मुशर्रफ (७४) असतील तर, इकबाल डार यांची महासचिवपदी नियुक्ती करण्यात आली आहे.

Musharraf's 23 parties lead; Establishment of 'Pakistan Awami Ittehad' | मुशर्रफ यांची २३ पक्षांची आघाडी; ‘पाकिस्तान अवामी इत्तेहाद’ची स्थापना

मुशर्रफ यांची २३ पक्षांची आघाडी; ‘पाकिस्तान अवामी इत्तेहाद’ची स्थापना

Next

इस्लामाबाद : पाकिस्तानचे माजी राष्ट्रपती आणि हुकूमशहा परवेज मुशर्रफ यांनी २३ राजकीय पक्षांची महाआघाडी स्थापन केली आहे. या महाआघाडीचे नाव ‘पाकिस्तान अवामी इत्तेहाद’ (पीएआय) असे असणार आहे. याच्या अध्यक्षपदी मुशर्रफ (७४) असतील तर, इकबाल डार यांची महासचिवपदी नियुक्ती करण्यात आली आहे.
स्थानिक मीडियाने दिलेल्या माहितीनुसार, मुशर्रफ यांनी दुबईहून व्हिडीओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून मीडियाला संबोधित करताना म्हटले की, मुहाजीर समुदायाचे प्रतिनिधित्व करणा-या सर्व पक्षांनी एकजूट होण्याची आवश्यकता आहे. त्यांनी मुत्ताहिदा कौमी मूव्हमेंट (एमक्यूएम) आणि पाक सरजमी पार्टी (पीएसपी) यांना या नव्या राजकीय आघाडीत सहभागी होण्याचे निमंत्रण दिले. या आघाडीच्या स्वरूपाबाबत त्यांनी सांगितले की, सर्व सदस्य एकाच पक्षाच्या नावाने निवडणुका लढतील.
मुशर्रफ हे एमक्यूएमचे नेतृत्व करत असल्याचे वृत्त त्यांनी फेटाळून लावले. एखाद्या अल्पसंख्याक पक्षाचे नेतृत्व मी करणे हे हास्यास्पद असल्याचे सांगून ते म्हणाले की, एमक्यूएम-पाकिस्तानचे जे अस्तित्व मूळ स्वरूपात होते ते आता फक्त अर्ध्यावर आले आहे.
पक्षाच्या अंतर्गत समस्येबाबत मी चिंतित आहे. जर हा पक्ष एकजूट राहत असेल तर, फारुक सत्तार अथवा मुस्तफा कमाल यांना बदलण्यात मला काही स्वारस्य नाही. एमक्यूएमवर टीका करताना ते म्हणाले की, पक्ष आणि मुहाजिर समुदाय आदर हरवून बसले आहेत.
पाकिस्तान मुस्लीम लीग-कायदचे नेते चौधरी शुजात व चौधरी परवेज इलाही हेही महाआघाडीत सहभागी होतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. तर, पाकिस्तान तहरीक-ए-इंसाफचे अध्यक्ष इम्रान खान यांनीही या आघाडीत सहभागी व्हावे, असे आवाहन त्यांनी केले. (वृत्तसंस्था)

आरोपांचा सामना करू
मुशर्रफ यांच्यावर गतवर्षी विशेष न्यायालयाने देशद्रोहाचा आरोप लावला होता. या वर्षी आॅगस्टमध्ये बेनझीर भुट्टो हत्या प्रकरणात त्यांना फरार घोषित करण्यात आले होते. त्यांनी असा दावा केला की, सर्व आरोपांचा सामना करण्यासाठी आपण तयार आहोत. कारण, न्यायालये नवाज शरीफ यांच्या नियंत्रणात नाहीत.

Web Title: Musharraf's 23 parties lead; Establishment of 'Pakistan Awami Ittehad'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.