Malaysia: Police raid former PM Najib Razak's residences | नजीब रजाक यांच्या निवासस्थानांवर छापे, भ्रष्टाचाराच्या प्रकरणांची चौकशी सुरु

क्वालालंपूर- भ्रष्टाचाराचे आरोप झालेल्या आणि नुकतेच सत्तेतून जावे लागलेल्या मलेशियाचे माजी पंतप्रधान नजीब रजाक यांच्या दोन निवासस्थांनावर छापे टाकण्यात आले आहेत. 12 तासांच्या अवधीत पोलिसांनी दोनवेळा त्यांच्या घरावर छापे टाकल्याचे किनी न्यूज या मलेशियन वृत्तवाहिनीने स्पष्ट केले आहे.
मलेशियन वर्तमानपत्र न्यू स्ट्रेट्स टाइम्समध्ये नजीब यांचे वकिल दातुक हरपाल सिंग गरेवाल यांचे विधान प्रसिद्ध झाले आहे. पोलिसांनी नजीब यांच्या हँडबॅग्ज, कपडे, भेटवस्तू पुरावा म्हणून जप्त केले आहेत, मात्र कोणतीही कागदपत्रे जप्त केलेली नाहित असे गरेवाल यांनी सांगितले आहे. तसेच नजीब आणि त्यांच्या कुटुंबीयांनी तपासाला मदत केल्याचेही त्यांनी सांगितले.

मलेशियामध्ये नुकत्याच झालेल्या निवडणुकीत रजाक यांच्या पक्षाचा दारुण पराभव झाला. त्याबद्दल बोलताना रजाक म्हणाले होते, ' जे झालं ते अत्यंत दुःखदायक आहे मात्र लोकशाहीच्या तत्वांना अनुसरुन एक पक्ष म्हणून हा निकाल स्वीकारावा लागेल'. नजीब आणि त्यांची पत्नी रोस्माह मॅन्सोर यांना देश सोडण्यास मनाई करण्यात आलेली आहे.

नजीब यांचा पराभव 92 वर्षांचे मलेशियन नेते महाथिर मोहंमद यांनी केला. ते लोकशाही पद्धतीने निवडून येणारे जगातील सर्वात वयोवृद्ध नेते आहेत. नजीब यांनी मलेशियात 1 मलेशिया डेव्हलपमेंट बर्हार्ड (1एमडीबी ) योजनेत कोट्यवधी डॉलर्सचा भ्रष्टाचार केला असे सांगण्यात येते. महाथिर याबाबत बोलताना म्हणाले होते, ''आम्ही नजीब यांचा राजकीय सूड वगैरे घेण्याच्या विचारात नाही तर आम्ही कायद्याचे राज्य स्थापन करणार आहोत, जर नजीब यांनी काहीतरी चुकीचं केल्याचं कायद्याद्वारे सिद्ध झालं तर त्यांना परिणाम भोगावेच लागतील.''  नजीब आणि त्यांच्या पत्नीवर देश सोडण्याची मनाई केल्यानंतर नजीब यांनी ट्वीट करुन आपण सरकारच्या निर्णयाचा आदर करतो असे म्हटले आहे.


Web Title: Malaysia: Police raid former PM Najib Razak's residences
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.