Malawi is distant from India? Envoy sent to China, Pakistan |  भारतापासून दुरावला मालदीव? चीन, पाकिस्तानला पाठवले दूत 

नवी दिल्ली - मालदीवमध्ये निर्माण झालेले राजकीय संकट अद्यापही कायम आहे. दरम्यान, मालदीव सरकार आणि भारत सरकारमधील तणाव विकोपाला गेल्याचे संकेत मिळत आहेत. देशात सुरू असलेल्या घडामोडींच्या पार्श्वभूमीवर मालदीवच्या राष्ट्राध्यक्षांनी सौदी अरेबिया, चीन आणि  पाकिस्तानसाठी आपले दूत रवाना केले आहेत. मात्र मालदीवच्या राष्ट्रपतींनी भारतात आपला दूत पाठवलेला नाही. 
मालदीव सरकारच्यावतीने सांगण्यात आले की, राष्ट्रपतींनी दिलेल्या आदेशांनुसार मालदीवच्या कॅबिनेटमधील सदस्य मालदीवच्या मित्र राष्ट्रांच्या दौऱ्यावर जात आहेत. हे दूत देशांतर्गत घडामोडींविषयी आपल्या मित्र देशांना माहिती देतील. मालदीवचे परराष्ट्र मंत्री पाकिस्तानमध्ये गेले आहेत. तर वित्तविकास मंत्री चीनच्या दौऱ्यावर गेले आहेत. दरम्यान, मालदीवचे कृषीमंत्री सौदी अरेबियाला जाणार आहेत. मात्र देशात आणीबाणी घोषित ढाल्यानंतर परिस्थितीची माहिती देण्यासाठी मालदीवकडून भारतात कोणताही दूत पाठवण्यात आल्याची माहिती देण्यात आलेली नाही. काही दिवसांपूर्वी मालदीवच्या राष्ट्रपतींचे विशेष प्रतिनिधी भारतात आले होते. तेव्हा त्यांनी भारत हा आमच्या मित्रांच्या यादीत पहिल्या क्रमांकावर असल्याचे सांगितले होते. मात्र देशातीत सध्याच्या परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर भारताला डावलण्यात आल्याचे वृत्त मालदीवच्या दूतावासाने फेटाळले आहे.  
दरम्यान, मालदीवच्या प्रश्नावर मंगळवारी अखेर भारताने आपले मौन सोडताना आणीबाणी जाहीर करण्याच्या राष्ट्राध्यक्ष अब्दुल्ला यामीन यांच्या निर्णयावर नाराजी व्यक्त केली होती. मालदीवच्या सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती आणि विरोधी पक्ष सातत्याने भारताने याविषयी काहीतरी ठोस भूमिका घ्यावी, अशी मागणी करत आहेत. मालदीवचे माजी राष्ट्राध्यक्ष आणि मुख्य विरोधी पक्ष एमडीपीचे नेते मोहम्मद नाशीद यांनी भारताने लष्करी हस्तक्षेप करावा अशी मागणी केली आहे.   
 तसेच  मालदीवमध्ये आपातकालीन परिस्थिती उदभवल्यास त्याचा सामना करण्यासाठी भारताने लष्कराला सज्ज ठेवले आहे. मालदीवमधून भारतीय पर्यटकांची सुखरुप सुटका असो किंवा लष्करी हस्तक्षेप कुठल्याही परिस्थितीचा सामना करण्यासाठी भारतीय सुरक्षा पथके पूर्णपणे सज्ज आहेत. लष्कराला कृती करण्यासाठी अद्यापपर्यंत कोणतेही राजकीय निर्देश मिळालेले नाहीत. 
 


Web Title: Malawi is distant from India? Envoy sent to China, Pakistan
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.