लंडन : कुंभकर्ण सलग सहा महिने झोपत असे हे आपण रामायणात वाचले आहे. सकाळी लवकर न उठणाऱ्याला आपण कुंभकर्ण म्हणून चिडवतो. लहानपणी वाटायचे कुंभकर्णासारखी व्यक्ती असेल का? त्या कोड्याचे उत्तर सापडले आहे. हो कुंभकर्णासारखे सहा महिने झोपणारी व्यक्ती आजही आहे. स्टॉकपोर्ट येथील बेथ गुडियर ही १६ वर्षांची मुलगी गाढ झोपल्यानंतर सहा महिन्यांच्या आधी उठत नाही. ब्रिटनमधील तिला लोक स्लीपिंग ब्युटी म्हणतात.
बेथच्या रुग्णालयात सर्व प्रकारच्या चाचण्या करण्यात आल्या; परंतु त्यातून काहीही निष्पन्न झाले नाही, असे बेथची आई जाईने यांनी सांगितले. बेथचा आतापर्यंतचा ७५ टक्के वेळ झोपेत गेला आहे. एका दिवसात ती २२ तास झोपते आणि केवळ दोन तासच उठते. झोपेतून उठल्यानंतर ती आहार घेते. बेथला स्लीपिंग ब्युटी सिंड्रोम नावाचा आजार आहे. सहा महिने झोपणाऱ्या बेथची कथा इतर लोकांना परिकथेसारखी वाटते; मात्र आईला तिच्या भवितव्याची चिंता सतावत आहे.
ती उद्या झोपेतून उठेल; मात्र वेळेसोबत चालावे लागेल तेव्हा तिचे कसे होईल, अशी चिंता बेथच्या आईला वाटते. तिला पुन्हा कधी झोप येईल हे सांगता येत नाही. त्यामुळे ती मित्र-मैत्रिणींना भेटू इच्छित नाही. मी तिच्या पुढच्या जीवनाविषयी विचार करते तेव्हा मला खूप दू:ख होते, असे बेथच्या आईने सांगितले. जाईने यांनी तिच्या देखभालीसाठी केअर टेकरची व्यवस्था केली आहे. बेथला केवळ बोलतानाही प्रचंड थकवा येतो. त्यामुळे तिला व्हिलचेअरची गरज भासते.