किम जोंग उन स्वतःचं शौचालय घेऊन जाणार चर्चेला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 27, 2018 12:03 AM2018-04-27T00:03:49+5:302018-04-27T00:03:49+5:30

उत्सर्जित केलेल्या मलातूनही त्यांच्या प्रकृतीबाबत अंदाज लावता येऊ शकतो

Kim Jong-un will bring his own toilet with him to the Koreas summit | किम जोंग उन स्वतःचं शौचालय घेऊन जाणार चर्चेला

किम जोंग उन स्वतःचं शौचालय घेऊन जाणार चर्चेला

googlenewsNext

सेऊल- दक्षिण कोरिया आणि उत्तर कोरिया, म्हणायला शेजारी देश पण या दोन्ही देशांमध्ये सहा दशकांपूर्वी तुटलेला विश्वासाचा पूल पुन्हा जुळलाच नाही. एकमेकांच्या नेत्यांच्या हत्येचे प्रयोग, सततचा तणाव आणि कायम शीतयुद्धाची स्थिती या दोन्ही देशांनी कित्येक वर्षे जोपासली आणि सहनही केली.   प्रदीर्घ काळानंतर उद्या शुक्रवारी या दोन्ही देशांचे नेते एकमेकांशी चर्चा करणार आहेत मात्र तरिही अविश्वासाचे वातावरण कायमच आहे. या परिषदेसाठी उत्तर कोरियाचे हुकुमशहा किम जोंग उन दक्षिण कोरियात जाणार आहेत. मात्र परिषदेच्या पहिल्या सत्रानंतर ते जेवायला पुन्हा मायदेशात जातील तसेच आपल्याबरोबर स्वतःचे एक शौचालयही ते घेऊन जाणार आहेत.

याबाबत ली क्यून युएल या पूर्वी उत्तर कोरियाच्या अध्यक्षांचे संरक्षण करणार्या चमूतील व्यक्तीने वाँशिंग्टन पोस्टला माहिती दिली आहे. ली म्हणाले, किम जोंग उन सार्वजनिक स्वच्छतालय वापरत नाहीत. त्यांनी उत्सर्जित केलेल्या मलातूनही त्यांच्या प्रकृतीबाबत अंदाज लावता येऊ शकतो त्यामुळे "तसे काहीही" मागे ठेवून जाण्याचा धोका किम पत्करणार नाहीत. याआधीही किम उत्तर कोरियातच इतरत्र जाताना अशीच व्यवस्था करुन भेटींना गेले आहेत. हे शौचालय एका वाहनातच असल्यामुळे त्या वाहनाचा किम यांच्या शिष्टमंडळाच्या ताफ्यात समावेश करण्यात येईल. 

1953 नंतर उत्तर कोरियाची सीमा ओलांडून दक्षिण कोरियामध्ये जाणारे किम जोंग उन हे पहिले उ.कोरियन नेते असतील.नव्याने जाहीर झालेल्या माहितीनुसार दक्षिण कोरियाचे राष्ट्राध्यक्ष मून जाए-इन आणि उत्तर कोरियाचे राष्ट्राध्यक्ष किम यांची सकाळी स्थानिकवेळेनुसार सकाळी 9.30 वाजता (भारतीय वेळेनुसार 6 वाजता) भेट होणार आहे. उत्तर कोरिया आपल्या अण्वस्त्रांचा भविष्यात त्याग करू शकेल का या संपूर्ण जगासाठी महत्त्वाच्या विषयावर यामध्ये चर्चा होऊ शकते. तसेच या दोन्ही शेजारी देशांमधील तणाव निवळण्यासाठीही या परिषदेचा उपयोग होऊ शकतो. यापूर्वी 2000 आणि 2007 साली अशाच प्रकारची परिषद झाली होती. या बैठकीमुळे किम जोंग उन आणि अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनल्ड ट्रम्प यांच्या चर्चेसाठीही आशादायक प्रगती होणार आहे.

कशी असेल ही ऐतिहासिक परिषद-
किम आणि त्यांच्या नऊ अधिकाऱ्यांच्या शिष्टमंडळाची दोन्ही देशांच्या सीमेजवळ मून जाए-इन भेट घेतील. त्यानंतर साऊथ कोरियन रक्षकदल दोन्ही देशांच्यामध्ये असणाऱ्या लष्करमुक्त प्रदेशामध्ये असणाऱ्या पॅन्मुन्जोम येथे दोन्ही नेत्यांना घेऊन जाईल. दोन्ही देशांच्या नेत्यांमध्ये स्थानिक वेळेनुसार सकाळी 10.30 वाजता चर्चेला सुरुवात होईल. ही चर्चा पॅन्मुन्जोम येथे पीस हाऊस या इमारतीत होणार आहे. पहिल्या सत्रानंतर भोजनासाठी उत्तर कोरियन शिष्टमंडळ व किम पुन्हा आपल्या देशात जातील. जेवणानंतर ते पुन्हा चर्चेसाठी सीमा ओलांडून द. कोरियात येतील. दुपारच्या सत्रात दोन्ही देशांची माती आणि पाणी वापरुन एका पाईनच्या रोपाचे रोपण दोन्ही नेते करतील. शांतता आणि समृद्धीचे प्रतीक म्हणून या दोन्ही देशांमधील माती व पाण्याचा वापर करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या परिषदेसाठी किम जोंग उन यांच्या शिष्टमंडळात त्यांची बहिण किम यो-जोंगचाही समावेश आहे. किम योंग-नाम हे उत्तर कोरियाचे नामधारी प्रमुख आहेत तेसुद्धा या चर्चेत सहभागी होतील.

Web Title: Kim Jong-un will bring his own toilet with him to the Koreas summit

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.