कुआलालंपूर : धार्मिक प्रवचनांच्या नावाखाली कट्टर इस्लामचा प्रचार करत तरुणांची डोकी भडकविण्यासह इतर आर्थिक गुन्ह्यांसाठी भारतातील तपास यंत्रणांना हवा असलेला वादग्रस्त धर्मप्रचारक डॉ. झाकिर नाईक याला कायम वास्तव्याचा परवान्याद्वारे मलेशियाने आसरा दिला आहे.
पाच वर्षे मलेशियात राहात असलेल्या झाकिर नाईकने येथे बस्तान बसविले आहे. पंतप्रधानांसह बड्या मंडळींसोबत ऊठबस असलेला नाईक स्वत:हून भारतात परतण्याची किंवा त्याला पाठविले जाण्याची शक्यता नाही. गेल्याच आठवड्यात भारताच्या अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) नाईकविरुद्ध ‘मनी लाँड्रिंग’च्या गुन्ह्याबद्दल आरोपपत्र दाखल केले होते.
ब्रिटन व बांगलादेशने प्रवेशबंदी घातलेल्या नाईकला मलेशियाने आसरा दिल्याने या बहुधर्मी देशात कट्टर इस्लामी विचारांचा पगडा वाढत असल्याचे जाणकारांना वाटते. पंतप्रधान नजिब रझ्झाक यांच्या सत्ताधारी आघाडीला सन २०१३च्या निवडणुकीत मोठा धक्का बसल्यानंतर त्यांनी बहुसंख्येने असलेल्या मुस्लिमांचे तुष्टिकरण करण्यासाठी कट्टरपंथी विचारसरणीशी सलगी केल्याचे दिसते.
पंतप्रधान रझ्झाक व इतर मंत्री जेथे नमाज पढतात, त्या कुआलालंपूरमधील मशिदीत नाईक प्रवचने देतो. अंगरक्षकासह मशिदीतून बाहेर पडल्यावर त्याच्यासोबत सेल्फी काढण्यासाठी भाविकांची झुंबड उडाल्याची छायाचित्रे गेल्या महिन्यात झळकली होती. त्याआधी पंतप्रधान रझ्झाक व उपपंतप्रधान अहमद झाहिद हमिदी यांनी नाईकसोबतचे फोटो फेसबूकवर टाकले होते.
नाईक महिनाभर नियमित प्रवचने देत असल्याचे मशिदीच्या प्रशासकांनी सांगितले. त्याची अन्य मशिदींतील प्रवचने ऐकल्याचे व त्याला इस्पितळे व उपाहारगृहांमध्ये फिरताना पाहिल्याचे लोक सांगतात. नाईकने भारतातील न्यायालयांनी काढलेल्या समन्सना प्रतिसाद दिलेला नाही. मात्र अन्य माध्यमांतून आरोपांचे खंडन केले आहे. पुत्रा मशिदीतून बाहेर
पडल्यावर एका वृत्तसंस्थेच्या महिला प्रतिनिधीने भारतातातील खटल्यांविषयी विचारता नाईकने, ‘एका स्त्रीशी असे जाहीरपणे बोलणे प्रशस्त वाटत नाही’, या शब्दांत उत्तर देण्याचे टाळले होते.
नाईकच्या प्रत्यार्पणासाठी औपचारिक प्रस्ताव भारताकडून मिळालेला नाही, असे मलेशियाचे सरकार म्हणते. नाईकच्या बाजूने सत्ताधारी आहेतच, पण प्रमुख विरोधी पक्षानेही नाईकच्या प्रत्यार्पणास विरोध केला आहे.
मलेशियात ४० टक्के लोकसंख्या मुस्लीम आहे आणि हिंदू, ख्रिश्चन व बौद्ध मोठी संख्या असलेले अल्पसंख्य आहेत. मलेशियाच्या बहुधर्मीय सहिष्णुतेस बट्टा लागू नये म्हणून नाईकला देशाबाहेर काढावे यासाठी काहींनी हायकोर्टात दावा दाखल केला आहे. पण त्यातून काही निष्पन्न होईल, असे दिसत नाही. (वृत्तसंस्था)

झुकते माप नाही
झाकिर नाईकना कायम वास्तव्याचा परवाना देताना झुकते माप दिलेले नाही. गेली पाच वर्षे ते मलेशियात राहात आहेत व त्यांनी कायदा व नियम मोडल्याचे एकही प्रकरण नाही. त्यामुळे त्यांना ताब्यात घेण्याचे किंवा अटक करण्याचे कारण नाही. दहशतवादाशी संबंधित खटल्यांतील आरोपी म्हणून नाईक याच्या प्रत्यार्पणाचा प्रस्ताव भारत सरकारकडून आलेला नाही.
- अहमद झाहिद हमिदी, उपपंतप्रधान, मलेशिया (संसदेतील निवेदन)


Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.