india will lose special privileges if it cuts import of iranian oil says tehran | ...तर 'तेल का खेल' भारताला महागात पडेल; इराणचा इशारा
...तर 'तेल का खेल' भारताला महागात पडेल; इराणचा इशारा

तेहरान- गेल्या काही दिवसांपासून इराणकडून इतर देशांनी तेल आयात करू नये, त्यासाठी अमेरिकेनं आंतरराष्ट्रीय पातळीवर दबाव निर्माण केला आहे. त्यामुळे भारतही इराणकडून तेल आयातीमध्ये कपात करण्याची शक्यता आहे. परंतु आता तेल आयातीवरून इराणनं भारताला गंभीर इशारा दिला आहे. सामरिकदृष्ट्या चाबदार बंदर हे दोन्ही देशांसाठी महत्त्वाचे आहे. चाबहार बंदर विकासातील गुंतवणूक भारतानं कमी केल्यास त्याचा दोन्ही देशांतील संबंधांवर परिणाम होणार असल्याचं इराणनं म्हटलं आहे.

भारतानं चाबहार बंदर विकासातील गुंतवणूक कमी केली आणि आमच्याकडून घेण्यात येणा-या तेल आयातीत भारतानं कपात केल्यास त्यांना दिलेले विशेष अधिकार काढून घेऊ, अशी धमकीही इराणनं भारताला दिली आहे. इराणचे उपराजदूत मसूद रेजवानियन राहागी म्हणाले, जर भारतानं इराणकडून तेल आयात कमी करून सौदी अरेबिया, रशिया, इराक, अमेरिका आणि इतर देशांकडून तेल आयात वाढवण्याचा प्रयत्न केल्यास त्यांना दिलेले विशेषाधिकार काढून घेऊ. ग्लोबल डिप्लोमसीतील आव्हानं आणि भारतासोबतचे द्विपक्षीय संबंधांवर प्रभाव या कार्यक्रमात राहागी बोलत होते. भारतानं चाबहार बंदर विकास आणि त्यांच्या कनेक्टिव्हिटी प्रोजेक्टमध्ये गुंतवणूक करण्याच्या दिशेनं अद्यापही योग्य पावलं टाकलेली नाहीत. चाबहार बंदरावरून भारत धोरणात्मक भागीदारी करू इच्छित असल्यास त्यांनी तात्काळ त्यावर लक्ष्य केंद्रित केलं पाहिजे, असा सल्लाही त्यांनी भारताला दिला आहे.

चाबहार बंदर हे भारत, इराण आणि अफगाणिस्तानसाठी सामरिकदृष्ट्या महत्त्वाचं आहे. अशातच इराणकडून भारताला असा इशारा देण्यात आल्यानं भारताच्या चिंता वाढल्या आहेत. भारतासाठीही चाबहार बंदर महत्त्वाचं आहे. कारण पाकिस्ताननं स्वतःच्या भागातून भारताला पश्चिम आणि मध्य आशियात व्यापार करण्यास बंदी केली आहे. भारताने चाबहार बंदराच्या विकासासाठी 50 कोटी डॉलर्सची गुंतवणूक करण्याचे निश्चित केले आहे. चाबहार हे मध्यपूर्वेत अत्यंत महत्त्वाच्या ठिकाणी आहे. तसेच भारताला व्यापारामध्ये या बंदरामुळे मोठा फायदा होणार आहे.

चाबहारमधील गुंतवणूक अमेरिकेचे लक्ष वेधून घेऊ शकते. चाबहारप्रमाणे दुसरा सर्वात काळजीचा मुद्दा आहे तो तेलाचा. भारत हा तेलाचा वापर करणारा जगातील तिसऱ्या क्रमांकाचा देश आहे. तर सौदी अरेबिया आणि इराक यांच्यानंतर भारताला कच्चे तेल पुरवणाऱ्या देशांमध्ये इराण आघाडीवर आहे. भारत इराणकडून कच्चे तेल खरेदी करण्यासाठी युरोपियन बँकामार्फत युरोचा वापर करत आहे, जोपर्यंत ते थांबवले जात नाही तोपर्यंत इराणकडून मिळणाऱ्या तेल आयातीत अडथळा येणार नाही.

English summary :
Iran gave warning to India that it will lose "All Other Privileges" If It Cuts Oil Imports.


Web Title: india will lose special privileges if it cuts import of iranian oil says tehran
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.