Incidents of firing, law firms, offices in South California in the United States | अमेरिकेत दक्षिण कॅलिफोर्नियामध्ये गोळीबार, कायदा कंपन्यांची ऑफीसेस असलेल्या भागात घडली घटना

ठळक मुद्देनोकरीच्या ठिकाणी झालेल्या वादातून हा गोळीबार झाल्याचे तपास यंत्रणांनी सांगितले.

वॉशिंग्टन - अमेरिकेत दक्षिण कॅलिफोर्नियात झालेल्या गोळीबारात दोन जण ठार झाले असून एक जण जखमी झाला आहे. भारतीय प्रमाणवेळेनुसार शनिवारी पहाटेच्या सुमारास ही घटना घडली. गोळीबार करणा-याचाही मृत्यू झाला आहे. नोकरीच्या ठिकाणी झालेल्या वादातून हा गोळीबार झाल्याचे तपास यंत्रणांनी सांगितले. हा गोळीबार का करण्यात आला त्याची चौकशी सुरु असल्याचे लाँग बीच पोलिसांनी सांगितले. 

जखमी व्यक्तीला रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्याची प्रकृती स्थिर असल्याचे लाँग बीचचे महापौर रॉबर्ट गारसिया यांनी सांगितले. हल्लेखोराने स्वत:वर गोळी झाडून घेतली कि, पोलिसांनी त्याला मारले ते अजून स्पष्ट झालेले नाही.  कार्यालयीन वादातून झालेली हिंसाचाराची ही घटना आहे असे टि्वट लाँग बीच पोलिसांनी केले आहे. 

दक्षिण कॅलिफोर्नियात लाँग बीच येथील दोन मजली इमारतीत ही घटना घडली. गोळीबार झाल्यानंतर लोक सैरावैरा पळत असल्याचे व्हिडीओमध्ये दिसत आहे.  या दोन मजली इमारतीमध्ये अनेक कायदेशीर कंपन्यांची ऑफीसेस आहेत. नेमक्या कुठल्या कार्यालयात गोळीबार झाला ते पोलिसांनी स्पष्ट केलेले नाही. गोळीबाराची माहिती मिळताच पोलिस लगेचच घटनास्थळी दाखल झाले आणि कारवाई केली. मागच्या दोन-तीन वर्षात अमेरिकेमध्ये गोळीबाराच्या अनेक घटना घडल्या आहेत. वर्दळीच्या रस्त्यावर, पब, शाळेमध्ये झालेल्या गोळीबारात अनेक  निष्पाप नागरिकांना आपल्या प्राणाला मुकावे लागले आहे.