If Pakistan does not stop the terrorists from destroying terrorists, CIA | पाकिस्ताननं अतिरेक्यांना आश्रय देणं न थांबवल्यास दहशतवाद्यांची ठिकाणं उद्ध्वस्त करू- CIA

वॉशिंग्टन-  अमेरिकेनं दहशतवाद्याच्या मुद्द्यावर पाकिस्तानला पुन्हा एकदा खडे बोल सुनावले आहेत. पाकिस्ताननं दहशतवाद्यांना आश्रय देणं न थांबवल्यास आम्ही त्यांची ठिकाणं उद्ध्वस्त करू, अशा इशारा अमेरिकेच्या गुप्तचर यंत्रणे(CIA)नं पाकिस्तानला दिला आहे. अमेरिकेकडून हा इशारा सीआयए प्रमुख माइक पॉम्पे यांनी दिला आहे. तर दुसरीकडे अमेरिकेच्या संरक्षण विभागाचे सचिव जेम मॅटिस आज पाकिस्तानात दाखल झाले आहेत. यावेळी ते पाकिस्तानचे पंतप्रधान शाहिद खकान अब्बासी आणि लष्कर प्रमुख कमर जावेद बावजा यांचीही भेट घेणार आहेत.

अमेरिकेचे सेक्रेटरी ऑफ डिफेन्स या पदावर नियुक्ती झाल्यानंतर मॅटिस यांची पाकिस्तानला पहिली भेट आहे. अमेरिकेनं दक्षिण आशियासाठी नवी पॉलिसी बनवली आहे. त्यानंतरच पाकिस्तान आणि अमेरिकेच्या संबंधांत कटुता आली आहे. या पॉलिसीअंतर्गत पाकिस्तानवर दहशतवादी संघटना हक्कानी नेटवर्क आणि तालिबानवर कडक कारवाई करण्याचा दबाव आहे. CIA चीफ माइक पॉम्पे यांनी रिगन नॅशनल डिफेन्स फोरमच्या एका कार्यक्रमात पाकिस्तानला सरळ सरळ इशारा दिला आहे. पॉम्पे म्हणाले, मॅटिस यांनी पाकिस्तानला सांगितलं की, राष्ट्राध्यक्ष ट्रम्प आणि अमेरिकेला पाकिस्तानकडून काय अपेक्षित आहे. आम्हाला वाटतं की पाकिस्ताननं आमचं म्हणणं ऐकावं. आम्हाला अफगाणिस्तानच्या मुद्द्यावर पाकिस्ताननं मदत करावी. पाकिस्ताननं आमच्या अपेक्षेप्रमाणे दहशतवाद्यांवर कारवाई न केल्यास आम्ही दहशतवाद संपवण्यासाठी शक्य असलेली कडक पावलं उचलू. त्यामुळे पाकिस्तान जास्त काळ दहशतवाद्यांना आश्रय देऊ शकणार नाही.

13 वर्षांपासून ड्रोन हल्ले करतोय अमेरिका
पाकिस्तानचं वृत्तपत्र डॉनच्या माहितीनुसार, अमेरिकेनं 2004पासून पाकिस्तानच्या फाटा भागात ड्रोन हल्ले केले आहेत. परंतु ट्रम्प प्रशासन हे हल्ले आता पाकिस्तानच्या अंतर्गत भागातही करू शकते. पॉम्पे यांच्या आधी लियोन पेनेटा हे सीआयए अध्यक्ष होते. लियोन पेनेटा म्हणाले, पाकिस्तान आमच्यासाठी नेहमीच एक त्रासदायक देश राहिला आहे. त्या देशात अनेक दहशतवादी संघटनांना आश्रय दिला जातोय. पाकिस्तानातील दहशतवादी अफगाणिस्तानात येऊन हल्ले करत आहेत. आणि पुन्हा पाकिस्तानातील स्वतःच्या सुरक्षित ठिकाणी परत जात आहेत. ओबामा सरकारच्या कार्यकाळातही आम्ही पाकिस्तानी दहशतवाद्यांच्या या कुरापती वारंवार रोखण्याचा प्रयत्न केला. परंतु पाकिस्तानकडून आम्हाला योग्य प्रतिसाद मिळत नसल्यामुळे ते शक्य झालं नाही. 

एकीकडे पाकिस्तान बोलतो आम्हाला दहशतवाद आवडत नाही. तर दुसरीकडे पाकिस्तानमधलेच दहशतवादी भारत आणि अफगाणिस्तानमध्ये दहशतवादी हल्ले करतात. त्यामुळेच पाकिस्तान अमेरिकेसाठी एक डोकेदुखी ठरला आहे. पाकिस्तानच्या वर्तणुकीत अद्याप कोणताही बदल झालेला नाही. अमेरिका पाकिस्तानला आणखी एक संधी देईल. आमच्या नव्या दक्षिण आशियायी पॉलिसींतर्गत आम्ही तालिबानला नेस्तनाबूत करण्यासाठी पाकिस्तानच्या मदतीची अपेक्षा करतो. पाकिस्ताननं दहशतवादासोबत लढण्यासाठी जे दावे केले आहेत, त्यांचं नक्कीच तो पालन करेल, असंही मॅटिस म्हणाले आहेत.